नवी देहली : वर्ष २०१५ मध्ये ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट’ने नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीच्या नियोजनासाठी पोलिसांच्या मागणीनुसार ६६ लाख ५५ सहस्र ९९७ रुपयांचे साहित्य खरेदी केले. या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले होते. या घोटाळ्याच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका नुकतीच प्रविष्ट करण्यात आली आहे. ही याचिका हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी प्रविष्ट केली आहे.
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पिठाकडे वरील घोटाळ्याच्या प्रकरणी याचिका प्रविष्ट करण्यात आली; पण न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. या प्रकरणी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितले की, ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट’ कायदा २००४ नुसार ट्रस्टची स्थापना झाली आहे. त्या कायद्यानुसार मंदिराचे व्यवस्थापन बघितले जाते. ट्रस्टला आलेले अर्पण, दान आदींद्वारे आलेल्या धनाचा व्यय करतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पिठाची अनुमती घेणे आवश्यक आहे. असे असतांना वर्ष २०१५ मध्ये ट्रस्टने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जे साहित्य खरेदी केले आहे, त्यात घोटाळा झाला आहे.
काय आहे घोटाळा ?
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी यांनी वर्ष २०१५ च्या झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पोलीस विभागाच्या मागणीनुसार गर्दीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षा साहित्य खरेदी केले. हे साहित्य खरेदी करतांना अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या अंदाजित दरांपेक्षा प्रत्येक साहित्य चढ्या दराने खरेदी करण्यात आले. उदाहरणार्थ १० सहस्र मीटर लांबीचा मनीला रोप (दोर)चा अंदाजे दर ६० सहस्र रुपये असतांना तो १८ लक्ष ५० सहस्र रुपये, रिचार्जेबल टॉर्चेस ४०० रुपये प्रती नग असतांना त्या ३ सहस्र रुपये प्रती नग, २ सहस्र रुपयांचा साईन बोर्ड ९ सहस्र २०० रुपये, ५ सहस्र रुपयांची ताडपत्री २२ सहस्र ५७५ रुपये इतक्या प्रचंड चढ्या दराने वस्तू खरेदी केल्या. नमूद करण्यात आलेल्या काही वस्तूंची अशी अतिरिक्त रक्कम ६६ लक्ष ५५ सहस्र ९९७ रुपये इतकी प्रचंड आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात