अखिल भारतीय हिंदू महासभेची निवेदनाद्वारे मागणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : परंपरा जोपासणार्या महाराजांवरील गुन्हे नोंद करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे सदर गुन्हे प्रशासनाने त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा हिंदू महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी अखिल भारतीय हिंदू महासभेचे शहराध्यक्ष श्री. बाळकृष्ण डिंगरे यांनी निवेदनाद्वारे केली. या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले. या वेळी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ता ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, तसेच श्री. गणेश लंके हेही उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. महाद्वार काला हा आषाढी यात्रेचा अविभाज्य घटक असून तो समारोप असतो. आषाढी यात्रेचे मुख्यमंत्र्यांच्या पूजेसह पालखी आदी सर्व कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपात पार पडले. त्याचप्रमाणे महाद्वार कालाही मोजक्या माणसांत विठ्ठल मंदिर सभामंडपात पार पडला होता. त्यानंतर नदीवर जातांना काही लोक वाढले. या वेळी पोलीस बंदोबस्त असल्याने याचे संपूर्ण दायित्व पोलिसांवर होते.
२. पंढरपूर येथे महाद्वार काल्याच्या निमित्ताने संत नामदेव महाराजांचे वंशज आणि हरिदास महाराज यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हे नोंद करणे हे दुर्दैवी असून पंढरपूर हिंदू महासभा याचा तीव्र निषेध करत आहे.
३. पंढरपूरचे सण, उत्सव यांविषयी पोलिसांना संपूर्ण माहिती आहे आणि त्याप्रमाणे बंदोबस्ताचे नियोजन केले जाते.
४. काही मंत्र्यांनीही पंढरपूर येथे सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार आहे का ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात