Menu Close

कणकवली आणि देवगड : युवा धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन शौर्यजागृती वर्ग अन् व्याख्यान’ यांच्या माध्यमातून प्रबोधन

सिंधुदुर्ग : हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जनजागृती करणे, युवकांमध्ये शौर्य जागृत करणे, धर्मप्रेमींवर आगामी आपत्काळाच्या दृष्टीने साधना आणि स्वरक्षण प्रशिक्षण यांचे जीवनातील महत्त्व बिंबवणे, या उद्देशाने देवगड अन् कणकवली येथील युवा धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्यजागृती वर्ग आणि व्याख्यान’ यांचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रमांमध्ये मिळून एकूण ७५ युवा धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

या वेळी श्री. राजेंद्र पाटील यांनी धर्मजागृतीचे महत्त्व आणि स्वभावदोष अन् अहंनिर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व विशद केले. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नितीन ढवण, श्री. आनंद मोंडकर आदी उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कु. लक्ष्मी राऊळ यांनी केले.

धर्मरक्षण करण्यासाठी साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम

या वेळी मार्गदर्शन करतांना सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु सत्यवान कदम म्हणाले, ‘‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ असेल, तरच आपण कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. स्वरक्षण प्रशिक्षणामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आपण साधना आणि धर्माचरण केले, तरच धर्मरक्षणाचे कार्य प्रभावीपणे करू शकतो.’’

‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’तील वक्त्यांचे मार्गदर्शन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्षमता वाढवण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आजच्या घडीला महिलांवर होणारे विविध अत्याचार थांबवायचे असतील, तर प्रत्येक हिंदु स्त्रीने स्वत:च्या मनगटात शक्ती एकटवली पाहिजे. तसेच त्यांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्षमता वाढवण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. आता देशाला वाचवण्यासाठी श्रीरामाच्या वानरसेनेची आवश्यकता आहे. श्रीरामाचा आदर्श आपल्याला शिकवला गेला नाही. इतिहास शिकवला तो मोगलांचा. छत्रपती शिवाजी महाराज, राणी पद्मिनी, झाशीची राणी, महाराणा प्रताप यांचा एक ओळीचा इतिहास आज शिकवला जातो. इतिहासाचे पुस्तक एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखे युवा पिढीला शिकवले जाते. यातून आपण काय बोध घेणार ? ही स्थिती पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे.

भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी धर्माचरण आवश्यक ! – श्री. निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आज संपूर्ण जग भारतीय संस्कृतीकडे आशेने पहात आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे ‘नमस्कार करणे’ ही धर्माचरणाची छोटीशी कृती संपूर्ण जगाला महान भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात आणून देणारी ठरली आहे. त्यामुळे भारतियांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी तिचे आचरण करणे आवश्यक आहे. आज आपल्यासमोर भीषण आपत्काळ येऊन ठेपला आहे. या काळाला सामोरे जाण्यासाठी साधना आणि धर्माचरण हे दोनच पर्याय आपल्यासमोर आहेत.

शौर्यजागृती वर्गात सहभागी युवा धर्मप्रेमींची मनोगते

१. कु. पूजा मांजरेकर, देवगड – वर्गामध्ये स्वरक्षण प्रशिक्षण शिकतांना भगवान श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता व्यक्त होत होती. ‘साक्षात् भगवान श्रीकृष्ण आणि आमची कुलदेवता आम्हाला पहात आहे’, असा भाव ठेवून प्रत्येक भाग समजून घेऊन शिकल्यामुळे शारीरिक त्रास जाणवला नाही.

२. कु. श्रीजय कोळसुलकर, खारेपाटण – वर्गाच्या माध्यमातून ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्षमता कशी वाढवायची ?’, हे शिकायला मिळाले. वर्गात सहभागी झाल्यापासून मला नामजपाचे महत्त्व समजल्याने मी नियमित कुलदेवता आणि भगवान श्रीकृष्ण यांचा नामजप करण्यास प्रारंभ केला आहे.

‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानात सहभागी झालेल्यांचे अभिप्राय

१. कु. सायली जयंत लळीत, देवगड – मी या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात प्रथमच सहभागी झाले. श्री. निरंजन चोडणकर यांनी आपल्या भारत भूमीविषयी, तसेच नैसर्गिक आपत्ती यांविषयी जे सांगितले, तसेच या आपत्कालीन काळात त्यांना आलेल्या अनुभवांविषयी जे सांगितले, त्यातून शिकायला मिळाले की, ‘कितीही संकटे आली, तरी आपण खचून न जाता देवाचे नामस्मरण आणि साधना चालू ठेवायला हवी.’

२. कु. प्राची शिंत्रे, कणकवली – देशातील सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. भावी पिढी सक्षम आणि निर्भीड व्हायला पाहिजे. स्वरक्षण प्रशिक्षणाचा सर्वांनाच लाभ व्हायला पाहिजे, यासाठी सर्वांनी शौर्यजागृती वर्गामध्ये सहभागी होऊया.

३. श्री. आनंद मोंडकर, तळेबाजार – या व्याख्यानाच्या माध्यमातून आतापर्यंत साधनेसंदर्भात ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टी समजल्या. आपण सर्वांनी ईश्वरी कार्यात सहभागी होऊया.

४. कु. दिव्या शिंत्रे, कणकवली – या कार्यक्रमातून नवी उमेद मिळाली. मी या शौर्यजागृती शिबिरांमध्ये सहभागी होईन.

५. सौ. मधुरा पारकर, कणकवली – आजच्या मार्गदर्शनातून प्रेरणा मिळाली आणि उत्साह निर्माण झाला. साधनेविषयी दिशा मिळाली.

६. कु. अरुणा पवार, कणकवली – मैत्रिणीच्या माध्यमातून मला या अमूल्य व्याख्यानाचा लाभ घेण्याची संधी मिळाली. मी अशा शौर्यजागृती शिबिरांमध्ये सहभागी होणार आहे.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी मातृभूमीचा, देवतांचा जयजयकार करण्यात आला. व्याख्यानास जोडलेल्या धर्मप्रेमींनी या घोषणांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सर्वांनी ‘चॅट बॉक्स’ (संदेश लिहिण्याच्या ठिकाणी) मध्ये ‘वन्दे मातरम्’ ही घोषणा लिहून आपला उस्फूर्त सहभाग दर्शवला.

२. वीर सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रार्थना केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *