खासदार इम्तियाज जलील यांचे उद्दाम वक्तव्य
संभाजीनगर येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. कोरोनाचे महाभयंकर संकट सर्वत्र असतांना केवळ हट्टासाठी खासदार इम्तियाज जलील शासनाला वेठीस धरून बकरी ईद साजरी करण्याची भाषा करत आहेत. असे करून जलील मुसलमान समाजासह सर्वच लोकांचा जीव धोक्यात आणत आहेत. त्यांची मागणी शासनाच्या नियमांना मूठमाती देणारी असल्याने शासनाने बकरी ईदविषयी घालून दिलेले नियम तसेच लागू करावेत. नियमांचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाई करावी, हीच सर्व जनतेची अपेक्षा आहे.
संभाजीनगर : बकरी ईद कशी साजरी करायची हे आम्ही ठरवू. ते गृह विभागाने ठरवू नये. रमझान ईद आम्ही घरात साजरी केली. शासनाच्या सर्व सूचना आणि नियम यांचे पालन केले; मात्र बकरी ईदचे स्वरूप वेगळे आहे. यामध्ये कुर्बानीला महत्त्व असून राज्यशासनाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम यांच्या अधीन राहून ते शक्य नाही, असे एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी येथील उलेमांच्या बैठकीत सांगितले. यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (कोरोनाचे संकट असल्याने शासनाने धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठी जे नियम इतर सर्व धर्मांतील लोकांना लागू केले आहेत, तेच नियम मुसलमान समाजातील लोकांना लागू केले आहेत. अनेक गावांतील हिंदु देवतांचे उत्सव, जत्रा रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून बकरी ईद साजरी करणे हेच योग्य आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. ज्या गोष्टींचे पालन करणे शक्य आहे, ते निश्चित करू; मात्र प्रतिकात्मक कुर्बानी आम्हाला मान्य नाही, असा पवित्रा उलेमांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत राज्यशासनाला निवेदन देऊन ईदगाह मैदानात अल्प संख्येने का होईना, सामूहिक नमाज अदा करण्याची अनुमती द्यावी, तसेच कुर्बानीसाठी शहरातील काही ठिकाणांवर जनावरांचा बाजार भरवून कुर्बानीची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (जनावरांचा बाजार भरल्यास तेथे सामाजिक अंतराचे पालन होत नाही. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होईल, हे जलील यांच्या लक्षात येत नाही का ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
२. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साध्या पद्धतीने आणि शक्य झाल्यास प्रतिकात्मक कुर्बानी देऊन साजरी करण्याचे आवाहन राज्यशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ‘ऑनलाईन’ बकरींची खरेदी-विक्री करून गर्दी टाळण्याचा पर्यायही सुचवण्यात आला आहे; मात्र इम्तियाज जलील यांनी हे नियम जुमानणार नसल्याचे सांगितले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात