कोरोनाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांवर निर्बंध घालणारे प्रशासन अन्य धर्मियांना असे सल्ले देण्याचे धारिष्ट्य दाखवील का ? असा निर्णय घेण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने धर्मशास्त्र जाणणार्यांचे मत घेतले आहे का ? आपद्धर्म म्हणून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कसे करावे, हेही शास्त्रात सांगितले आहे. त्यानुसारही कृती करता येऊ शकते, हे प्रशासन जाणून घेईल का ?
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी स्थापन केलेल्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा वर्ष २०२१ च्या भाद्रपद मासात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करून ठेवता येईल, असे आवाहन मुंबई महापालिकेने भाविकांना केले आहे. (श्री गणेशमूर्ती विसर्जनाचे महत्त्व समजून न घेता, असे सांगणे कितपत योग्य आहे ? मूर्ती घरी ठेवतांना ती दुखावली जाण्याचीही शक्यता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
महापालिका प्रशासनाने सांगितले की,
१. या वर्षीच्या गणेशोत्सवात भाविकांनी सर्व घरगुती श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये. घरगुती श्री गणेशमूर्तींच्या आगमनाला मिरवणुका न काढता केवळ पाच व्यक्तींनी एकत्रित जाऊन मूर्ती आणावी.
२. घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी आणि या मूर्तीची उंची २ फुटांपेक्षा अधिक असू नये किंवा शक्य असल्यास या वर्षी पारंपरिक शाडूच्या श्री गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू किंवा संगमरवर अशा मूर्तींचे पूजन करावे. (शाडूमातीच्या मूर्तीत अधिक चैतन्य ग्रहण केले जाते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. आगमनप्रसंगी मास्क, शिल्ड, सॅनिटायझर, सुरक्षित वावर आणि स्वरक्षणाची साधने काटेकोरपणे वापरण्यात यावीत.
४. श्री गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाणे शक्यतो टाळावे. (मूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केल्याने त्याचा मानवाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो, तसेच पर्यावरणाचीही कोणतीही हानी होत नाही. धर्मशास्त्रातही वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास सांगितले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी कोणतीही कृती उत्सवप्रसंगी करू नये अन्यथा अशा व्यक्तींवर साथरोग कायदा, आपत्ती निवारण कायदा आणि भारतीय दंड संहिता कायदा यांनुसार कारवाई केली जाईल. (अशा कारवाईच्या सूचना बकरी ईदच्या निमित्तानेही दिल्या गेल्या आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात