तासगाव (जिल्हा सांगली) : भारतातील पुरोगामी वारंवार हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करत आहेत. हिंदूंच्या देवता, संत यांना अपकीर्त करत आहेत. अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांना नावे ठेवणारे, तसेच हिंदु धर्माला अडगळ म्हणणारे तथाकथित साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना देशातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे दुर्दैवी आहेे.
नेमाडे यांनी श्रीकृष्णाची व्यभिचारी ड्रायव्हर अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाचा अवमान करणारे भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून घेऊन त्यांना कारागृहात डांबावे, ही आताच्या भाजप शासनाकडून आमची सर्व हिंदूंच्या वतीने अपेक्षा आहे, असे मनोगत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी व्यक्त केले. ते १३ एप्रिल या दिवशी चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिराच्या मैदानावर झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते.
या सभेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख आणि रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिभा तावरे यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह २ सहस्र ५०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन कु. प्रियांका भोपळे यांनी केले, तर हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय श्री. प्रशांत चव्हाण यांनी करून दिला. श्री. अभय वर्तक आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मिरज येथील वेदमूर्ती सर्वश्री कुश आठवले गुरुजी, श्रीधर जोशी, आशिष कुलकर्णी, विश्वेश बेडगकर यांनी वेदमंत्रपठण केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात