युद्धाचा केवळ एकमात्र नियम असतो, तो म्हणजे विजय ! युद्धशास्त्र सांगते, ‘येन-केन प्रकारेण युद्धात विजय प्राप्त करायला हवा. तोच खरा पुरुषार्थ आहे.’’ लडाखमध्ये आगळीक करणार्या चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवला आहे. भारत हा वीर योद्ध्यांचा देश आहे. चीनमधून कोरोनाचा प्रकोप झाल्यानंतर तिसर्या महायुद्धाचे बिगुल वाजले आहे. यामध्ये भारताची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. त्या दृष्टीने भारताने आता बचावात्मक पवित्र्यातून आक्रमक पवित्र्यामध्ये येणे आवश्यक आहे. चीनने गिळकृंत केलेल्या तिबेटला ‘स्वतंत्र देश’ म्हणून समर्थन देऊन भारताने त्याचा आरंभ करावा.
तिबेट हे प्राचीन हिंदु भारताचे अंग
तिबेटला भारतीय संस्कृतीमध्ये ‘त्रिविष्टप’ या नावाने ओळखले जाते. महाभारत काळात या क्षेत्राची सेना कुरुक्षेत्रावर युद्ध लढली होती. तिबेटमध्ये असलेला कैलास पर्वत आणि मानससरोवर आजही हिंदूंसाठी श्रद्धास्थान आहेत. सातव्या शतकापर्यंत तेथील ब्राह्मण पूजाअर्चा करतांना ‘जम्बुद्विपे भरतखंडे त्रिविष्टपे…’ असा संकल्प करत असत. सातव्या शतकापर्यंत तिबेटचे राजे हिंदु धर्मीय होते. तात्पर्य, तिबेट हे प्राचीन हिंदु भारताचेच अंग होते. तिबेटच्या सातव्या शतकातील सम्राट नरदेव यांचा विवाह चिनी राजकन्येशी झाल्यानंतर चीनमध्ये बौद्ध धर्म प्रचारित झाला. तेव्हापासून चिनी शासनकर्त्यांचा तिबेटच्या राजकारणात हस्तक्षेप वाढला.
आश्चर्यकारक तथ्य म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी चीनची सीमा भारताला लागून नव्हती. वर्ष १९५९ मध्ये जेव्हा साम्राज्यवादी चीनने तिबेटवर आक्रमण करून तिबेट हे चीनचे अंग असल्याचे घोषित केले, तेव्हापासून चीनची सीमा भारताशी जोडली गेली. चीन साम्राज्यवादी देश आहे. ‘हिंदी चिनी भाई-भाई’ असे म्हणत चीनने वर्ष १९६२ मध्ये भारताशी युद्ध करून मोठा भूप्रदेश बळकावला. अरुणाचल प्रदेशवरही चीनने दावा सांगितला आहे. तिथल्या लोकांना चीनकडून ‘स्टेपल्ड व्हिसा’ दिला जातो. आता चीनची कुदृष्टी लडाखवर पडली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने चीनची वक्रदृष्टी पडलेले भूप्रदेश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याला तिबेटचे विस्थापित सरकारही निश्चितपणे पाठिंबा देईल. चीन काश्मीरमधील फुटीरतावादी शक्तींना बळ देतो. भारतानेही चीनविरोधी देशांना आधार दिला पाहिजे.
चीनचा आसुरी विस्तारवाद
चीन दडपशाही करून आशियामध्ये वर्चस्व प्रस्थापित करू पहात आहे. अमेरिकेचे सध्याचे स्थान हिसकावून चीनला महासत्ता व्हायचे आहे. वास्तविक कोरोनाच्या साथीचा चीनलाही फटका बसला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग चीनमधून बाहेर पडत आहेत. जागतिक पातळीवरही अनेक देश चीनच्या विरोधात एकवटले आहेत. तेथील जनतेच्या मनातही उद्रेकाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर चिनी जनतेचे लक्ष अंतर्गत सूत्रावरून दूर करण्यासाठी चीन युद्धाच्या गर्जना करत असणार. यापूर्वीही चीनच्या साम्यवादी सरकारने असेच केले होते. चीनचे माजी रणनीतीकार वांग जीसे यांनी वर्ष २०१२ मध्ये भारत-चीन युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सांगितले होते की, चीनचे त्या काळचे नेते माओ झेडांग यांनी कम्युनिस्ट पक्षावर त्यांचे पुन्हा नियंत्रण मिळवण्याठी भारताविरुद्ध वर्ष १९६२ मध्ये युद्ध केले. सध्याचा भारत-चीन सीमेवरील तणाव हा याच रणनीतीचा एक पैलू आहे.
चीनवर बहिष्कार घाला !
चीनच्या कुरापतीनंतर भारतात चीनविरोधी असंतोष निर्माण झाला आहे. चिनी मालावर बहिष्कार घालण्याची जनचळवळ उभी रहात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही क्रांतीकारकांनी विदेशी वस्तूंची होळी करत देशभक्तीची साद घातली होती. आताही तीच वेळ आली आहे. आता केवळ चिनी मालावर नाही, तर संपूर्ण चीनवर बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे. भारत चीनकडून प्रत्येक वर्षी जवळपास ६२.९ बिलियन अमेरिकी डॉलरचे सामान आयात करतो, तर केवळ २६.७ बिलियन अमेरिकी डॉलरचे सामान निर्यात करतो. चीन आर्थिकदृष्ट्या भारतापेक्षा बलवान असल्याने चीनवर संपूर्ण बहिष्कार घालणे अवघड आहे, असे काही जण म्हणतात; पण ही पराभवाची वाणी झाली. ‘एक वेळ आमची परवड झाली तरी चालेल; पण आम्ही चिनी माल विकत घेऊन शत्रूराष्ट्राला पैसा पुरवणार नाही’, असा निर्धार भारतियांनी केला पाहिजे. एवढेच नाही, तर भारतातील चिनी हस्तक अर्थात् साम्यवादी, भारतविरोधी विचारसरणीचे राजकीय पक्ष, संघटना यांवरही बहिष्कार घातला पाहिजे. भारतीय सैन्यामध्ये ‘शॉर्ट सर्व्हिस’ची नवी योजनाही लागू करण्यात आली आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी आवर्जून त्यामध्ये सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नागरी संरक्षण प्रशिक्षणाची व्यवस्था असते. जे लोक शरीर आणि मन यांनी सक्षम आहेत, त्यांनी आवर्जून हे प्रशिक्षण घ्यावे.
चीनला नामोहरम करण्याची शक्ती भारतामध्ये आहे. एवढेच नाही, तर जगाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्यही भारतामध्ये आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतियांना स्वसामर्थ्याची जाणीव करूनच देण्यात आली नाही. आता हळूहळू भारताच्या स्वसामर्थ्याच्या जाणिवा प्रगल्भ होत आहेत. यातूनच एक दिवस शत्रूराष्ट्रांवर वचक बसेल आणि भारत विश्वगुरुपदी विराजमान होईल.
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात