अफगाणिस्तानची कमर गुल नावाची एक १६ वर्षीय युवती सध्या चर्चेत आहे. मध्यरात्री तिच्या घरी येऊन २ तालिबानी आतंकवाद्यांनी तिच्या आई-वडिलांची हत्या केली. त्या वेळी तिने तिच्या वडिलांच्या ‘एके ४७’ रायफलने एका आतंकवाद्याला ठार केले, तर तिच्या गोळीबारात दुसरा आतंकवादी घायाळ झाला. त्या दुसर्या आतंकवाद्याने गोळीबार चालू केला असता कमर गुल हिच्या १२ वर्षीय भावाने त्याच्याकडून रायफल ओढून घेत त्यालाही ठार केले. ती युवती आणि तिचा भाऊ यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. कमर गुलचे आई-वडील सरकारचे समर्थक होते; म्हणून तालिबानी आतंकवाद्यांनी त्यांना लक्ष्य बनवले होते. त्या आतंकवाद्यांना या १६ वर्षीय युवतीने प्रत्युत्तर दिले आहे. अर्थात् ते अफगाणिस्तान असल्यामुळे त्यांच्या घरात ‘एके ४७’ होती. ती मुले तशाच सामाजिक स्थितीत वाढल्यामुळे तिला कदाचित् हे वातावरण नवीन नसेल. हे सर्व जरी असले, तरी स्वतःचे आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतांना मध्यरात्री त्या २ मुलांनी जे धैर्य दाखवले आहे, त्याला तोड नाही. तिच्या घरात सहजच हातात आली, तशी ‘एके ४७’ भारतियांकडे सापडणार नाही; मात्र त्या दोघा भावंडांनी दाखवलेले प्रसंगावधान, सतर्कता आणि प्रतिकार करण्याची वृत्ती हे सारे कौतुकास्पद आहे.
‘दुर्बलाचे देवही रक्षण करत नाही’, अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे. भारतीय समाजाला शौर्याचा इतिहास आहे. असे असले, तरी गेली काही वर्षे त्या तेजाला ग्रहणच लागले आहे. कुठे झुरळ दिसल्यावरही किंचाळणार्या सध्याच्या पोशाखी महिला आणि कुठे ‘एके ४७’ घेऊन आतंकवाद्यांना ठार करणारी कमर गुल ! पोलीस, सुरक्षादले यांच्यावरील अवलंबित्व वाढल्यामुळेही असेल; मात्र ज्या गोष्टी आपण स्वतः प्रसंगावधान राखून करायला हव्यात, त्याही करण्यासाठी समाज प्रशिक्षित नाही. रस्त्यावर गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांची होणारी चोरी, पाकीटमारी, महिलांचा विनयभंग यांसारख्या अनेक प्रसंगांमध्ये जो प्रतिकार होणे आवश्यक असते, तोही होतांना दिसत नाही. प्रत्येक वेळी बंदूक घेऊन सामोरे जावे असे नाही; मात्र स्वरक्षणार्थ केलेली एखादी प्रतिकारात्मक कृतीही समाजकंटकांवर वचक निर्माण करत असते. जो समाज इतकेही करत नाही, तो समाज मोठ्या संकटांमध्ये हतधैर्य होतो. शारीरिक सामर्थ्यासह मानसिक सामर्थ्याचीही जाणीव विसरतो. अशा अनेक व्यक्तींचाच समाज बनलेला असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःला येणार्या अडचणींचा, स्वतःवर होणार्या अन्यायाचा स्वतःच्या क्षमतेनुसार धैर्याने प्रतिकार करण्याचे ठरवले की, समाजाचीही प्रतिकारक्षमता वाढते. एकदा स्वतःवर होणार्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची ऊर्जा निर्माण झाली की, कालांतराने आपल्या प्रांतातील इतर चुकीच्या घटना लक्षात येऊ लागतात. समाजातील अयोग्य घटना मनाला अन्यायाच्या विरोधात वैध मार्गाने लढण्यासाठी कृतीप्रवण करतात. त्यातूनच एक व्यापक सामाजिक दृष्टीकोन निर्माण होतो. अशा सजग, कृतीशील समाजात अयोग्य घटनांना स्थान नसते.
सामाजिक प्रतिकारक्षमता वाढावी !
भारतही गेली २ दशके पाकपुरस्कृत आतंकवादाशी लढत आहे. त्याही पूर्वीपासून आपण इस्लामी आक्रमणे झेलत आलो आहोत. इस्लामी आक्रमकांना पाणी पाजणारे अनेक तेजस्वी राजे आपल्याकडे होऊन गेले. त्या काळी जनताही प्रतिकारक्षम होती. अगदी इंग्रजांच्या काळातही भारतात अनेक बाल क्रांतीवीर झाले. वर्ष १९९० च्या दशकात जेव्हा काश्मिरी हिंदूंवर इस्लामी अत्याचार होत होते, तेव्हा उर्वरित समाजाने त्यांच्या व्यथा समजून घेतल्या नाहीत. गेली २ दशके काश्मिरी हिंदू अत्यंत कठीण जीवन जगत आहेत. कमर गुलसारख्या घटना घडतात, तेव्हा विशेषतः काश्मीर खोर्यातील हिंदूंचा आक्रोश डोळ्यांसमोर दिसतो. त्या वेळी जर अशा कमर गुल निर्माण झाल्या असत्या, तर कदाचित् चित्र वेगळे असले असते. गेल्या मासातच आतंकवाद्यांनी काश्मीर खोर्यातील एकमेव हिंदु सरपंचाची हत्या केली. पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना तेथील स्थानिकच मिळालेले असतात. त्यामुळे सेना दलांवरही तेथे सातत्याने आक्रमणे होत असतात. अशा स्थितीत स्थानिकांच्या आश्रयाला येणार्या आतंकवाद्यांचा अशा प्रकारे घराघरांतून ‘पाहुणचार’ झाला, तर काश्मीर खोरे नक्कीच शांतता अनुभवेल.
आज कमर गुल हिची तुलना पाकिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांच्या गोळ्यांना सामोरे जाणार्या मलाला युसुफजाई हिच्यासमवेत होत आहे. मलालाने तालिबानी आतंकवाद्यांच्या विरोधाला सामोरे जात पुढे शिक्षण चालू ठेवले. आता ती तिचे उच्च शिक्षण घेण्यात मग्न आहे. आता कमर गुल हिचेही अफगाणिस्तान सरकारकडून कौतुक होत आहे. तिलाही कदाचित् पुरस्कार मिळतील आणि काही वर्षांनी पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ होईल. मलाला हिला नोबेल पुरस्कार मिळाला; म्हणून पाकिस्तानमधील परिस्थिती पालटलेली नाही. त्यामुळेच या घटनांतून शिकून सरकारने आतंकवाद्यांचा बंदोबस्त करणे, तसेच सामान्यांनीही प्रतिकारक्षम होणे, हाच धडा घेणे आवश्यक आहे.
सध्याचा काळ कठीण आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध टोकाला पोचले आहेत. भारतातही चीनशी युद्ध लढण्याची मागणी जोर धरत आहे. पाक चीनच्या ताटाखालचे मांजर बनल्यामुळे दोन्ही सीमांवर तणाव आहे. पाकच्या सीमेवरून आतंकवादी देशात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे सारे जग हतबुद्ध झाले आहे. अशात मनोधैर्य ढळू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा स्थितीत केवळ आतंकवाद्यांशी दोन हात करण्याचीच नव्हे; तर जीवनातील सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी जे मनोबळ आवश्यक आहे, ते कमर गुल हिच्या कृतीतून नक्कीच मिळेल !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात