रशियाचा चीनला झटका !
चीन हेरगिरी करत असल्याचा रशियाचा आरोप
भारत आणि अमेरिका यांचे नाव न घेता रशियाने दबावापोटी निर्णय घेतल्याचा चिनी वृत्तपत्राचा थयथयाट !
चीन हेरगिरी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या विरोधात कठोर भूमिका घेणार्या रशियाकडून भारताने शिकणे आवश्यक !
मॉस्को (रशिया) : रशियाने चीनला देण्यात येणार्या ‘एस् ४००’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे वितरण करणे रोखले आहे, असे वृत्त रशियाची वृत्तसंस्था ‘यूएवायर’ने दिले आहे; मात्र याचे वितरण नंतर कधी करण्यात येणार आहे, हे रशियाने स्पष्ट केलेले नाही. नुकतेच रशियाने चीन हेरगिरी करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच हे वितरण रहित केल्याचे म्हटले जात आहे. चीनला गोपनीय सामग्री सोपवल्याविषयी रशियातील ‘सेंट पीटर्सबर्ग आर्कटिक सोशल सायन्स अकॅडमी’चे अध्यक्ष वॅलेरी मिटको यांना रशियाने अटक केली आहे.
या वृत्तानंतर चीनच्या वृत्तपत्रांनी भारत आणि अमेरिका यांचे नाव न घेता, ‘रशियाने दबावापोटी हा निर्णय घेतला’ असे म्हटले आहे. रशियाला असे पाऊल उचलण्यास भाग पाडण्यात आले आहे; कारण कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे त्यावरून लक्ष विचलित होईल, असा दावा चीनच्या वृत्तपत्राने केला आहे.
‘एस ४००’ क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा काय आहे ?
एस्. ४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ही ‘एस् ३००’ची अद्ययावत आवृत्ती आहे. हे क्षेपणास्त्र ४०० किलोमिटरच्या परिघात येणारी कोणतीही विमान किंवा शस्त्रे नष्ट करू शकते. यातून एकाच वेळी ७२ क्षेपणास्त्रे डागू शकतो. अण्वस्त्र असलेल्या ३६ क्षेपणास्त्रांनाही एकाच वेळी लक्ष्य करता येते. चीनने त्याच्या खरेदीसाठी वर्ष २०१४ मध्ये रशियासमवेत करार केला होता. यापूर्वीच चीनने रशियाकडून ‘एस् ३००’ क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतलेली आहे. तुर्कस्तानकडेही ही यंत्रणा असून भारतानेही याच्या खरेदीसाठी रशियाशी करार केला असून या वर्षाच्या शेवटी ती भारताला मिळणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात