सोलापूर येथे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन
सोलापूर : लोकमान्य टिळक यांंनी भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी ४० वर्षे कार्य केले. त्यांची राष्ट्राप्रती तळमळ, त्याग आणि समर्पण अत्युच्च होते. आपल्याला इतिहासाची पुस्तके एखाद्या गोष्टीच्या पुस्तकाप्रमाणे शिकवली गेली. त्यामुळे आता हिंदूंचा खरा इतिहास आणि शौर्य जाणून घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सिद्ध होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. ते २३ जुलै या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त समितीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाच्या वेळी बोलत होते.
श्री. सुमित सागवेकर पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यांतून भारतीय जनतेला संघटित करण्याचे यशस्वी कार्य केले. स्वातंत्र्यदेवतेची पूजा, हीच लोकमान्य टिळक यांच्यासांठी देवपूजा होती. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये सर्व युवकांनी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत. ‘हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी आपण शिवरायांचा मावळा होऊ. व्याख्यानाच्या शेवटी समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी स्फूर्तीदायी घोषणा दिल्या.
धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
श्री. ज्ञानेश्वर राठोड, माजलगाव, बीड – लोकमान्य टिळक यांच्याविषयी जाणून घेतल्यानंतर आता राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात आणखी जोमाने सहभागी व्हावे, असे वाटत आहे.
श्री. धनंजय बोकडे, सोलापूर – लोकमान्य टिळक यांच्याविषयीचा गौरवशाली इतिहास माहिती नव्हता. व्याख्यानातील शब्द हृदयापर्यंत पोचले. महापुरुषांचा असा इतिहास प्रत्येकाने वाचून त्यांचे गुण आचरणात आणायला हवेत.
श्री. तुळशीदास चिंताकिंदी, सोलापूर – देव, देश आणि धर्म यांसाठी त्याग करायला हवा अन् या कार्यामध्ये खारीचा वाटा प्रत्येकाने उचलायला हवा. आजचे व्याख्यान ऐकून डोळ्यांमध्ये पाणी आले आणि ‘हिंदूंनी संघटितपणे कार्य करायला हवे’, असे प्रकर्षाने वाटले.
कु. संजना चारी, सोलापूर – अशा महान राष्ट्रपुरुषांच्या मातीमध्ये जन्म लाभला, यासाठी कृतज्ञता वाटते. या व्याख्यानामुळे ‘गीतारहस्य’ ग्रंथ वाचण्याची इच्छा निर्माण झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात