वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात हिंदु धर्माची बाजू प्रभावीपणे घेत हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती
फोंडा (गोवा) : कोरोना महामारीच्या काळात तबलिगी जमातने ‘कोरोना वाहका’ची भूमिका निभावली, तर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘कोरोना योद्धे’ बनून समाजसेवा केली. या काळात संपूर्ण जगाने अभिवादनाची नमस्काराची पद्धत, योग, शाकाहार, प्राणायाम आदी हिंदु धर्मातील तत्त्वे उचलून धरली. कोरोनाच्या निमित्ताने संपूर्ण जग तिसर्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे. भारतातही अंतर्गत विरोध उफाळून येत आहे. काही मासांपूर्वी सरकारने इस्लामी देशांतील पीडित हिंदूंसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला; पण त्याला देशविरोधी शक्तींनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. देशातील मंदिर संस्कृतीवर घाला घातला जात आहे. आगामी काळात देशाला जिहादी, साम्यवादी आणि ‘सेक्युलर’ शक्तींचा सामना करावा लागणार असल्याचे यातून स्पष्ट होते. एकंदरीत सध्याच्या काळात राजकारण, शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, कलाक्षेत्र आदी सर्वच क्षेत्रांत देशभक्त आणि धर्मप्रेमी विरुद्ध देशद्रोही अन् धर्मविरोधी असे ध्रुवीकरण होत आहे. या वैचारिक ध्रुवीकरणाच्या काळात हिंदु धर्माची बाजू प्रभावीपणे घेत हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू झालेल्या ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद़्घाटन समारंभामध्ये ते बोलत होते.
शंखनाद आणि वेदमंत्रपठण करून अधिवेशनाला आरंभ झाला. सनातन पुरोहित पाठशाळेचे पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी शंखनाद केला, तर पुरोहित श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अधिवेशनाच्या निमित्ताने सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद़्गुरु सत्यवान कदम यांनी वाचन केले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अधिवेशनाचा उद्देश अवगत केला. ‘१०० कोटी हिंदूंचे जगभरात एकही अधिकृत राष्ट्र नाही. भारत आणि नेपाळ हे अधिकृतरित्या हिंदु राष्ट्र व्हावे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित केले जात आहे. हिंदु राष्ट्राचा विचार घराघरांत, मनामनांत पोचवण्यासाठी कृतीशील व्हा’, असे ते म्हणाले.
प्रतीवर्षी फोंडा, गोवा येथे होणारे अधिवेशन कोरोना महामारीमुळे ‘ऑनलाईन’ पद्धतीने होत आहे. असे असले, तरी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचा उत्साह तसूभरही अल्प झाला नाही. उलट देशस्तरावर या अधिवेशनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. अधिवेशनाच्या निमित्ताने ट्वीटरवरही #We_Want_Hindu_Rashtra हा हॅशटॅगद्वारे हिंदु राष्ट्राची चर्चा चालू असल्याचे दिसून आले.
* ठळक चौकट
‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ होण्यामध्ये समितीचाही वाटा !
वर्ष २०१४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी ‘पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे’, असा प्रस्ताव एकमुखाने संमत करण्यात आला होता. हा प्रस्ताव केंद्र सरकारला मिळाल्यानंतर एका मासात केंद्र शासनाने पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी कार्य करणार्या संघटनांची देहली येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजक या नात्याने हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीमध्ये समितीने शरणार्थी पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, अशी ठोस भूमिका मांडली. ही बैठक पुढे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मसुद्याची बैठक म्हणून सिद्ध झाली. ‘नागरिकत्व कायदा-१९५५’ यामध्ये बांगलादेशाचा उल्लेख नव्हता; कारण त्या वेळी बांगलादेश हा स्वतंत्र देश नव्हता. या बैठकीमध्ये समितीने बांगलादेशी शरणार्थी हिंदूंनाही भारताचे नागरिकत्व मिळावे, अशी भूमिका मांडली. त्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शासनाने बांगलादेशी हिंदूंसाठी कार्य करणार्या संघटनांची माहिती समितीकडे मागितली. त्यानंतर पुढील ६ वर्षांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये बांगलादेश, तसेच अफगाणिस्तान यांचाही समावेश झाल्याचे आपण पाहिले. एकंदरीत, ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ ही एकप्रकारे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची फलश्रुती म्हणता येईल.
– सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
३० जुलै ते २ ऑगस्ट आणि ६ ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ‘ऑनलाईन अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ होणार असून ते सर्वांसाठी खुले असेल. खालील ‘लिंक्स’वर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
YouTube Channel : HinduJagruti
Facebook page : /HinduAdhiveshan
Twitter : @HinduJagrutiOrg