Menu Close

नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या दुसर्‍या दिवशी हिंदूंवरील आघातांवर विचारमंथन !

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनातील दुसर्‍या दिवशीचे पहिले सत्र

फोंडा (गोवा) : पहिल्‍या सत्रात ‘हिंदुजागृती तथा हिंदु समाजाला साहाय्‍य करणे’ या विषयावर मान्‍यवरांनी त्‍यांचे विषय मांडले. नवी देहलीतील ‘प्रज्ञता’ संस्‍थेचे सहसंस्‍थापक श्री. आशिष धर यांनी ‘हिंदु समाजाला जागृत करण्‍यासाठी केलेले प्रयत्न’; ‘शरणार्थी पाकिस्‍तानी हिंदूंच्‍या पुनर्वसनासाठी केलेले प्रयत्न’ या विषयावर मीनाक्षी शरण, तर ‘शरणार्थी पाकिस्‍तानी हिंदूंची वर्तमान स्‍थिती आणि त्‍यावर उपाय’ या विषयावर राजस्‍थानमधील जयपूर येथील ‘निमित्तेकम’ या संस्‍थेचे अध्‍यक्ष श्री. जय आहूजा यांनी मार्गदर्शन केले.

पाकिस्‍तानातील हिंदूंना भारतीय नागरिकत्‍व मिळवून देण्‍याच्‍या कार्यात प्रत्‍येक हिंदूने आपले योगदान देण्‍याची आवश्‍यकता ! – श्री. जय आहुजा, अध्‍यक्ष, निमित्तेकम, जयपूर, राजस्‍थान

श्री. जय आहुजा, अध्‍यक्ष, निमित्तेकम, जयपूर, राजस्‍थान

‘निमित्तेकम’ ही संस्‍था शरणार्थी पाकिस्‍तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्‍व प्राप्‍त करून देण्‍यासाठी साहाय्‍य करते. आतापर्यंत संस्‍थेच्‍या वतीने पाकमधील २ सहस्रांहून अधिक हिंदूंना भारतीय नागरिकत्‍व प्राप्‍त करून देण्‍यात आले आहे. पाकिस्‍तानातील हिंदूंना भारतीय नागरिकत्‍व मिळवून देण्‍याचा कार्यात प्रत्‍येक हिंदूने स्‍वतःचे योगदान देण्‍याची आवश्‍यकता आहे, असे वक्‍तव्‍य राजस्‍थानमधील निमित्तेकम या संस्‍थेचे अध्‍यक्ष श्री. जय आहुजा यांनी केले.

वर्ष २०१६ ला केंद्र सरकारने अशा पाकिस्‍थानमधून विस्‍थापित हिंदूंना भारतीय नागरिकत्‍व देण्‍याची अनुमती दिली. भारताच्‍या ऐतिहासिक चुकीमुळे आजही ७० लाख हिंदू पाकिस्‍तानात अडकले आहेत. तेथील हिंदूंना प्रतिदिन अमानवीय अत्‍याचार सहन करावे लागत आहेत. कोरोना महामारीच्‍या कालावधीत तेथील हिंदूंना काम नव्‍हते. जेवण मिळत नव्‍हते. अशा स्‍थितीत भोजनाच्‍या पाकिटांच्‍या बदल्‍यात १५ लाख हिंदूंचे धर्मांतर करण्‍यात आले. हिंदु तरुणी जिहादींच्‍या शिकार बनत आहेत. त्‍यांचे पालक राजकीय नेते, पोलीस, न्‍यायालय यांची दारे ठोठावत आहेत. तरीही त्‍यांना न्‍याय मिळत नाही. त्‍यांचा एकच दोष आहे की, त्‍यांचा जन्‍म पाकिस्‍तानात झाला. तरीही तेथील हिंदूंना विश्‍वास आहे की, एक दिवस आम्‍हाला भारताचे नागरिकत्‍व मिळेल.

पाकिस्‍तानी हिंदूंना त्‍यांचा कल आणि कौशल्‍य यांच्‍या आधारावर काम मिळावे ! – मीनाक्षी शरण, सामाजिक कार्यकर्त्‍या, मुंबई

मीनाक्षी शरण, सामाजिक कार्यकर्त्‍या, मुंबई

पाकिस्‍तानातील हिंदूंची अवस्‍था दयनीय आहे. पाकमध्‍ये राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रांत हिंदूंना अन्‍यायकारक वागणूक मिळते. हिंदु मुलींचे अपहरण किंवा बलात्‍कार यांसारख्‍या घटना घडल्‍या, तरी न्‍यायालयांमधून धर्मांध अपराधींच्‍या बाजूने निर्णय मिळतो. त्‍यामुळे तेथील पीडित हिंदू भारतात आश्रय घेतात; पण येथे मुख्‍य प्रवाहात ते अजूनही सामावलेले नाहीत, ही वस्‍तूस्‍थिती आहे. पाकिस्‍तानी हिंदूंना थोडेफार कौशल्‍य शिकवून त्‍यांना छोटे-मोठे व्‍यवसाय चालू करून दिले जातात; पण त्‍यांंचा कल शेतीकडे अधिक आहे. ते शेती आणि बागकाम यांमध्‍ये रमतात. पाकिस्‍तानी हिंदु महिला हस्‍तकलेमध्‍ये निपुण आहेत. जवळपास संपुष्‍टात आलेल्‍या काही प्राचीन कलांमध्‍ये त्‍या पारंगत आहेत. पाकिस्‍तानी हिंदूंना त्‍यांचा कल आणि कौशल्‍य यांच्‍या आधारावर काम मिळवून दिले, तर ते येथे लवकर रुळू शकतील. मी तसे प्रयत्न करत आहे. पाकिस्‍तानी हिंदु ‘आपले’ आहेत. कष्‍टाळू आहेत. त्‍यांना भारतीय हिंदूंच्‍या आधाराची आवश्‍यकता आहे.

समाजजागृती करून काशी विश्‍वनाथ मंदिरामध्‍ये बंद केलेली आरती चालू करण्‍यासाठी सरकारला भाग पाडले ! – श्री. आशिष धर, सहसंस्‍थापक, प्रज्ञता, नवी देहली

श्री. आशिष धर, सहसंस्‍थापक, प्रज्ञता, नवी देहली

काशी विश्‍वनाथ मंदिरात गेल्‍या १ सहस्र वर्षांपासून प्रतिदिन ‘सप्‍तर्षी’ आरती करण्‍याची परंपरा आहे. कोरोना महामारीच्‍या काळात ही प्रथा नियुक्‍त सरकारी कर्मचार्‍यांनी रहित करण्‍याचा निर्णय घेतला. ही प्रथा औरंगजेबाच्‍या काळातही खंडित झाली नाही, ती सरकारच्‍या नियंत्रणामुळे रहित झाली. याविषयी आम्‍ही व्‍हिडिओ प्रसारित केला. त्‍यातून समाजजागृती झाल्‍याचे लक्षात येताच सरकारने त्‍यावरील बंदी उठवली गेली. मंदिरातील आरती पुन्‍हा नियमित चालू झाली. सरकारच्‍या वतीने केवळ मंदिरांचेच सरकारीकरण करण्‍यात आले. मशीद आणि चर्च यांचे का नाही ?, असा प्रश्‍न नवी देहलीतील ‘प्रज्ञता’ या संस्‍थेचे सहसंस्‍थापक श्री. आशिष धीर यांनी उपस्‍थित केला. ते (ऑनलाईन) नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या दुसर्‍या दिवशीच्‍या पहिला उद़्‍बोधन सत्रात बोलत होते.

ते पुढे म्‍हणाले, ‘‘आमच्‍या संस्‍थेच्‍या वतीने समाजातील सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीपर्यंत राष्‍ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयीची माहिती पोचवण्‍याच्‍या हेतूने व्‍हिडिओ बनवून प्रसारित केले जातात. आतापर्यंत आम्‍ही ‘विस्‍थापित काश्‍मिरी पंडित’, ‘राममंदिराची उभारणी’, ‘बांगलादेशी हिंदूंची व्‍यथा’, ‘जोगेंद्रनाथ मंडल (पाकिस्‍तानचे पहिले कायदेमंत्री) यांचा जीवनपट’, ‘काशी विश्‍वनाथ मंदिरात आरती करण्‍यास घालण्‍यात आलेली बंदी’ या विषयांवर व्‍हिडिओ बनवून सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित केले आहेत. त्‍यांस उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभत आहेे.’’ दुसर्‍या दिवशीच्‍या पहिल्‍या सत्रात सामाजिक कार्यकर्त्‍या मीनाक्षी शरण, तसेच राजस्‍थानमधील ‘निमित्तेकम’ संस्‍थेचे अध्‍यक्ष जय आहूजा   यांनी मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात ‘तमिळनाडूतील जिहादी आणि ख्रिस्‍ती शक्‍तींचे वाढते वर्चस्‍व’ या विषयावर हिंदु मक्‍कल कत्‍छीचे अध्‍यक्ष अर्जुन संपथ यांनी मार्गदर्शन केले.

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनातील दुसर्‍या दिवशीचे दुसरे सत्र

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने चालू असलेल्‍या ‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या दुसर्‍या दिवशीच्‍या दुसर्‍या  सत्रात ‘जिहादी आतंकवादाचा प्रतिकार’ या विषयावर उद़्‍बोधन झाले. या सत्रात ‘तामिळनाडू येथील ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’चे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनीही संबोधित केले.

तामिळनाडूमध्‍ये हिंदुद्वेष्‍ट्यांकडून होणार्‍या आघातांच्‍या विरोधात रस्‍त्‍यावर उतरू ! – जी. राधाकृष्‍णन्, शिवसेना राज्‍य अध्‍यक्ष, तामिळनाडू

जी. राधाकृष्‍णन्, शिवसेना राज्‍य अध्‍यक्ष, तामिळनाडू

तामिळनाडूमध्‍ये पेरियार, तसेच द्रमुकचे कार्यकर्ते यांनी भाषणस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली हिंदु धर्म, परंपरा, संस्‍कृती, स्‍तोत्र, तसेच ब्राह्मण समाज यांना अपमानित करून हिंदुद्वेष जोपासला. अजूनही तामिळनाडूमध्‍ये हिंदु धर्मावर आघात करण्‍याच्‍या घटना घडत आहेत; मात्र आता पूर्वीसारखी परिस्‍थिती राहिली नाही. हिंदू जागृत होऊन हिंदु धर्मावरील आघातांना विरोध करत आहेत. कोरोना महामारीच्‍या काळात तामिळनाडू सरकारने कोरोनाविरुद्धच्‍या लढाईसाठी मंदिरांना १० कोटी रुपये देण्‍याचा आदेश दिला. हा आदेश मशिदी आणि चर्च यांना लागू नव्‍हता. या विरोधात धर्मप्रेमींनी मद्रास उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली. त्‍यावर न्‍यायालयाने सरकारचा आदेश अवैध असल्‍याचे सांगितले. जेथे जेथे हिंदु धर्मावर आघात होतील, तेथे आम्‍ही रस्‍त्‍यावर उतरू, तसेच कायदेशीर लढाईही लढू, असे प्रतिपादन तमिळनाडूतील शिवसेनेचे अध्‍यक्ष जी. राधाकृष्‍णन् यांनी केले. ‘तमिळनाडूमध्‍ये जिहादी आणि धर्मांध ख्रिस्‍ती यांचे वाढते वर्चस्‍व आणि त्‍यावरील उपाय’, या विषयावर बोलतांना त्‍यांनी वरील विचार मांडले.

नास्‍तिकतावाद्यांचा केवळ हिंदु धर्माला विरोध का ? – जी. राधाकृष्‍णन्, शिवसेना राज्‍य अध्‍यक्ष, तामिळनाडू

तामिळनाडूमध्‍ये द्रमुकचे कार्यकर्ते स्‍वतःला नास्‍तिकवादी म्‍हणवून घेतात; मग त्‍यांचा केवळ हिंदु धर्माला विरोध का ? अन्‍य पंथावर टीका करण्‍याची ते धाडस करत नाहीत; कारण त्‍याचे परिणाम त्‍यांना ठाऊक आहेत; म्‍हणून ते केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करतात.

‘सेक्युलर’ भारतातील ‘हलाल सर्टिफिकेशन’ व्यवस्था, हा हिंदूंवर लादलेला ‘जिझिया कर’च ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती 

हलाल म्‍हणजे इस्‍लामच्‍या दृष्‍टीने खाण्‍यासाठी वैध मांस. या अंतर्गत ‘कसाई मुसलमान असणे’, ‘प्राण्‍यावर सुरी चालवण्‍यापूर्वी कसायाने कुराणमधील आयत म्‍हणणे’, ‘पशूची मान मक्‍केच्‍या दिशेने करणे’ आदी संकल्‍पना आहेत. पश्‍चिमी देशांमध्‍ये ‘हलाल’ या संकल्‍पनेला अनेक पशूप्रेमी संघटना विरोध करत आहेत. सध्‍या ‘हलाल’ ही संकल्‍पना केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून सौंदर्यप्रसाधने, औषधे, गृहनिर्माण संकुल अशा प्रकारे त्‍याची व्‍याप्‍ती वाढली आहे. हलालची अर्थव्‍यवस्‍था जवळपास २.४ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स (१ ट्रिलियन म्‍हणजे १ वर १२ शून्‍य म्‍हणजे १ सहस्र अब्‍ज) म्‍हणजे जवळपास भारताच्‍या सध्‍याच्‍या अर्थव्‍यवस्‍थेएवढी मोठी आहे. या माध्‍यमातून भारताची पुन्‍हा एकदा गुलामीच्‍या दिशने वाटचाल चालू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी शरीयत कायद्यानुसार चालणार्‍या इस्‍लामी बँकांवर बंदी घातली होती. सध्‍या हलाल प्रमाणपत्राच्‍या माध्‍यमातून होणारे भारताचे इस्‍लामीकरण आणि जिहादला आर्थिक बळ देण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे. त्‍याला वैध मार्गाने विरोध व्‍हायला हवा. ‘सेक्‍युलर’ भारतामध्‍ये इस्‍लामी अर्थकारणाला चालना मिळणारी हलाल प्रमाणपत्राची व्‍यवस्‍था कार्यरत असणे, हा ‘सेक्‍युलर’वादाचा पराभव आहे, असे वक्‍तव्‍य हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

श्री. रमेश शिंदे पुढे म्‍हणाले की,

१. मुसलमान देशांनी त्‍यांच्‍या देशात व्‍यापार करण्‍यासाठी हलाल प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. भारतात हे प्रमाणपत्र ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘हलाल इंडिया’ यांसारख्‍या मुसलमानांच्‍या खासगी संस्‍था देतात.

२. भारतातील अनेक आस्‍थापने आज व्‍यापारासाठी म्‍हणून पैसे देऊन हलाल प्रमाणपत्रे देत आहेत. यातून मिळणारा पैसा इस्‍लामच्‍या प्रसारासाठी वापरला जातो.

३. हलाल प्रमाणपत्र हा आधुनिक काळातील ‘जिझिया कर’च आहे. धक्‍कादायक गोष्‍ट म्‍हणजे ‘एअर इंडिया’, ‘अपेडा’ (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्‍न निर्यात विकास प्राधिकरण), ‘आय.आर्.सी.टी.सी.’ (रेल्‍वे) यांसारख्‍या शासकीय यंत्रणाही हलाल मांसाला मान्‍यता देतात.

४. खाद्यपदार्थाला प्रमाणपत्र देण्‍यासाठी ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ (भारतीय अन्‍न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण), ‘एफ्.डी.ए.’ (अन्‍न आणि औषध प्रशासन) या सरकारी संस्‍था अस्‍तित्त्वात असतांना हलाल प्रमाणपत्राची समांतर व्‍यवस्‍था कशासाठी ?

५. लाल व्‍यवसायामुळ खाटिक हिंदु समाजाच्‍या व्‍यापारावर मर्यादा आली आहे. मांस व्‍यापार हा मुसलमानांच्‍या कह्यात गेला आहे. हे एकप्रकारे हिंदु खाटिक समाजावर बहिष्‍कार करण्‍याचाच प्रकार आहे. हा ‘अनुसूचित जाती, जनजाती अत्‍याचार निवारण संशोधन अधिनियमा’नुसार गुन्‍हा ठरतो.

६. हलालचच्‍या माध्‍यमातून ‘सेक्‍युलर’ भारतामध्‍ये हिंदूंवर अन्‍याय होऊन इस्‍लामी अर्थव्‍यवस्‍थेला चालना मिळत आहे. या विरोधात सर्वांनी आवाज उठवायला हवा.’’

तामिळनाडू सरकारकडून मुसलमानांचे लांगूलचालन, तर हिंदूंशी भेदभाव ! – श्री. अर्जुन संपथ, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदु मक्‍कल कत्‍छी, तामिळनाडू

श्री. अर्जुन संपथ, संस्‍थापक अध्‍यक्ष, हिंदु मक्‍कल कत्‍छी, तामिळनाडू

‘कोरोना वाहका’ची भूमिका निभावणार्‍या तबलीगी जमातच्‍या देहलीतील कार्यक्रमाला तामिळनाडूमधून २ सहस्र ५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. ते राज्‍यात परतल्‍यानंतर त्‍यांना पुष्‍कळ वैद्यकीय सुविधा देण्‍यात आल्‍या. कोरोनातून बरे झाल्‍यावर प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्‍यांचे रुग्‍णालयात जाऊन स्‍वागत केले. त्‍यांना कुराण देण्‍यात आले. हा प्रकार अनाकलनीय आहे. याउलट हिंदूंशी वैद्यकीय साहाय्‍य पुरवण्‍यात भेदभाव केला जात आहे. मंदिरांची भूमी असलेल्‍या तामिळनाडूतील सर्व मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. या मंदिरांची अक्षरशः लूट चालू आहे. दुसरीकडे तामिळनाडू सरकारने मुसलमानांचे लांगूलचालन करत त्‍यांना रमझानच्‍या काळात ४ सहस्र ५०० मेट्रिक टन तांदूळ दिले. याचे वाटप सरकारी यंत्रणांकडून नव्‍हे, तर मशिदींमधून करण्‍यात आले.

तामिळनाडूमध्‍ये ख्रिस्‍ती अनुमाने ६ टक्‍के, तर मुसलमान १० टक्‍के आहेत. राज्‍यात हिंदू बहुसंख्‍य असूनही राजकारणामध्‍ये ख्रिस्‍ती आणि मुसलमान यांचे वर्चस्‍व आहे. तेथे हिंदु देवतांच्‍या मूर्ती आणि भारतमातेचा पुतळा यांना उघडपणे विरोध केला जातो. हिंदु नेत्‍यांच्‍या हत्‍या केल्‍या जातात. नक्षलवाद्यांच्‍या कारवायाही चालू आहेत. जिहादी, धर्मांध ख्रिस्‍ती, साम्‍यवादी, तसेच नक्षलवादी यांच्‍या कार्यपद्धती वेगळ्‍या असल्‍या, तरी ‘हिंदुद्वेष आणि भारतविरोध’ हा त्‍यांच्‍यातील समान धागा आहे. आज तामिळनाडूमध्‍ये काश्‍मीरसारखा जिहादी आतंकवाद फोफावत आहे. राज्‍यात शिक्षण आणि वैद्यकीय साहाय्‍य या माध्‍यमांतूनही धर्मांतराच्‍या कारवाया केल्‍या जात आहेत. तामिळनाडूमध्‍ये चालू असलेल्‍या या हिंदुविरोधी कारवायांना हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करायला हवा.

अधिवेशनाला ‘ऑनलाईन’ उपस्‍थित असणार्‍या काही धर्मप्रेमींच्‍या प्रतिक्रिया

१. ‘हिंदु जनजागृती समिती धर्मजागृतीचे करत असलेले कार्य अतिशय स्‍तुत्‍य आहे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्‍ट्राच्‍या मागणीचे समर्थन करणे आवश्‍यक.’ – श्री. विवेक मित्तल

२. अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनता वक्‍ते देत असलेली माहिती अतिशय योग्‍य आहे. हिंदूंना जागरूक करणे अतिशय आवश्‍यक.’ – श्री. भरत तोमर

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *