देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
भारत अद्याप अशा वस्तू बनवण्यावर आत्मनिर्भर का होऊ शकला नाही ?
नवी देहली : भारत सरकारने चीनसारख्या देशांकडून रंगीत दूरचित्रवाणी संच आयात करण्यावर बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि अनावश्यक उत्पादनांची आयात न्यून करणे, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
‘विदेश व्यापार महासंचालनालया’कडून (डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड’कडून) याविषयीची अधिसूचना काढण्यात आली आहे. या सूचनेनुसार रंगीत दूरचित्रवाणी संचाच्या आयातीला मुक्त श्रेणीतून हटवून प्रतिबंधित केले आहे. याचाच अर्थ आयातदारांना आता आयात करण्यासाठी विदेश व्यापार महासंचालनालय आणि वाणिज्य मंत्रालय यांच्याकडून अनुज्ञप्ती (परवाना) घ्यावी लागेल.
१. भारतात प्रामुख्याने व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलंड, जर्मनी आणि चीन या देशांमधून रंगीत दूरचित्रवाणी संचाची आयात होते. सरकारने लादलेल्या निर्बंधांचा ३६ से.मी. ते १०५ से.मी.चे संच आणि ६३ से.मी.पेक्षा अल्प एल्.सी.डी. संच यांच्यावर परिणाम होईल.
२. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ५ सहस्र ८३६ कोटी रुपयांच्या रंगीत दूरचित्रवाणी संचांची आयात केली होती. यामध्ये व्हिएतनाममधून ३ सहस्र १९९ कोटी रुपये आणि चीनमधून २ सहस्र १९० कोटी रुपयांचे रंगीत दूरचित्रवाणी संच आयात केले गेले.
३. ‘पॅनासॉनिक इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनीष शर्मा म्हणाले की, ‘या निर्णयाचा देशांतर्गत उत्पादनांवर सकारात्मक परिणाम होईल आणि ग्राहकांना उच्च प्रतीचे एकत्रित संच मिळतील.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात