राजधानी देहलीतील भीषण दंगलीच्या प्रकरणी दोन प्रमुख गोष्टी एकाच शहरात रहाणार्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून एकाच दिवशी उघड झाल्या, हा एक योगायोग म्हणावा लागेल. या दंगलीच्या प्रकरणी अटकेत असलेला देहलीतील सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक ताहिर हुसेन याने तो स्वतःच या दंगलीचा सूत्रधार असल्याची स्वीकृती पोलिसांकडे दिली. याशिवाय त्याने अनेक धक्कादायक आणि तितक्याच गंभीर गोष्टीही उघड केल्या. दुसरीकडे याच आपचे देहलीतील माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नेते कपिल मिश्रा यांनीही हिंदु जनजागृती समिती आयोजित अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलतांना देहली दंगलीमागे जिहादी आतंकवादी आणि शहरी नक्षलवादी यांचा हात असल्याचे नमूद केले. त्यामुळे एकूणच देहली दंगलीचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ही दंगल झाली तेव्हा ती करण्याची पद्धत, त्यात वापरली गेलेली साधनसामुग्री आदी पहाता ही दंगल धर्मांधांनीच केल्याचे आरंभीपासूनच सांगितले जात होते. तथापि त्यावर विश्वास ठेवला गेला नाही. उलट ‘ही दंगल हिंदूंनीच घडवली’, असे सांगण्यापर्यंत हिंदुद्वेष्ट्यांची मजल गेली. आता ताहिरच्या कबुलीजबाबानंतर अशांनी स्वतःची तोंडे कुलपे लावून बंद केली असतील.
हुसेनने या दंगलीमागील पटकथाच पोलिसांसमोर उलगडून सांगितली. त्याने अनेक धर्मांधांची आणि त्यांच्या संघटनांची पोलखोल केली आहे. हुसेनने केलेल्या खुलाशात आपसूकच जिहादी प्रवृत्तीचे प्रतिबिंब उमटलेले आढळून येते, जे मिश्रा यांनी सांगितले होते. ‘वर्ष २०१७ मध्ये मी जेव्हा नगरसेवक झालो, तेव्हापासूनच पैसे आणि राजकारण यांच्या जोरावर हिंदूंना धडा शिकवण्याचा विचार माझ्या मनात चालू होता’, अशी स्वीकृती हुसेनने आरंभीच दिली. यावरून ‘धर्मांधांना लोकप्रतिनिधी का व्हायचे असते ? आणि लोकप्रतिनिधी झाल्यावर ते कोणती कृत्ये करतात ?’, हे उघड झाले. धर्मांध नेहमी सत्तेचा आणि राजकारणाचा वापर स्वपंथासाठी करतात, तर स्वतःला हिंदु म्हणवून घेणारे पुढारी हिंदुहिताचा विचार न करता केवळ साचेबद्ध दृष्टीकोन ठेवतात. पुढे हुसेनने या दंगलीला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) या धर्मांध संघटनेने साहाय्य केल्याची माहिती दिली. मूळात या संघटनेचा इतिहासच वादग्रस्त आहे. दक्षिणेतील अनेक हिंसक घटनांत विशेषतः हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांत या संघटनेच्या सदस्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. या संघटनेच्या कारवाया ‘सीमी’ या जिहादी आतंकवादी संघटनेची आठवण करून देणार्या आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. त्यामुळे देहली दंगलीमागे पी.एफ्.आय.चा हात असल्याची माहिती समोर आल्यानंतर तसे फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते; कारण या दंगलीनंतर तसे आरोपही या संघटनेवर झालेच होते. या संघटनेने आर्थिक स्वरूपात साहाय्य केल्याचे समोर आल्याने हा पैसा या संघटनेने नेमका कुठून आणला ?, हे मात्र जनतेसमोर येणे महत्त्वाचे आहे. अशी पार्श्वभूमी असलेल्या या संघटनेवर यापूर्वीच बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली होती. तरीही सरकारने तिच्यावर अद्याप बंदी घातलेली नाही. ‘या दंगलीसाठी पी.एफ्.आय., ‘जामिया कॉर्डिनेशन कमिटी’, काही राजकीय नेते, अधिवक्ता आणि मुसलमान संघटना साहाय्य करत आहेत’, असेही हुसेनने पोलिसांना सांगितले. मग येथे प्रश्न असा पडतो की, ही दंगल घडवण्यासाठी इतकी मोठी यंत्रणा कार्यरत होती, तर त्याचा थांगपत्ता गुप्तचर यंत्रणांना कसा लागला नाही ? हे यंत्रणांचे घोर अपयशच होय. असेच चालू राहिले, नागरिकांच्या सुरक्षेचे काय ?, याचा विचार सरकारने करायला हवा. ताहिरने केलेला त्यापुढील खुलासा आणखी भयंकर आहे. तो म्हणाला, ‘आम्ही सीएएच्या विरोधात आंदोलन करणार्यांना ‘रस्ता बंद’ आंदोलनही करण्यास सांगितले आणि त्यास जर पोलीस आणि हिंदू यांनी विरोध केला, तर दंगल चालू करण्याचा आदेश दिला.’ यावरून या दंगलीचे किती तपशीलवार नियोजन करण्यात आले होते, तसेच ती किती सुनियोजित पद्धतीने अन् थंड डोक्याने करण्यात आली होती, हे लक्षात येते. दुर्दैवाने सरकारी यंत्रणा केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प होत्या.
आप गप्प का ?
या सगळ्यामध्ये आप मूग गिळून गप्प आहे. दंगल झाली तेव्हा ताहिर हुसेन हा त्यांच्या पक्षाचा नगरसेवक होता. त्या पदाचाच तर त्याने अपवापर केला होता. या दंगलीमागे त्याचा हात असल्याचे समोर आल्यानंतर ‘आप’ने त्याला पक्षातून निलंबित केले खरे; पण अनेक गोष्टींचा खुलासा सरकारने केला नाही. दंगलीचा एवढा मोठा कट शिजत असतांना केजरीवाल सरकार झोपा काढत होते का ? सरकारला याची जराही कुणकुण कशी लागली नाही ?, हे जनतेला समजले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पक्षाकडून उमेदवारांना तिकीट देतांना त्यांची पार्श्वभूमी पडताळली जात नाही का ? तसे असते, तर हुसेनला तिकीट दिलेच गेले नसते. त्याचाच अपलाभ ताहिरसारख्या लोकांनी अचूकपणे उठवला. हुसेनच ही माहिती पोलिसांनी दिली आहे. तो म्हणाला ‘माझ्यावर कुणालाही संशय येऊ नये; म्हणून खालिद सैफी याच्या सांगण्यावरून मी दंगलीच्या वेळी (नगरसेवक म्हणून) वारंवार पोलिसांना फोन करत होतो !’ यावरून राजकीय पक्षांकडून केल्या जाणार्या अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचा फटका हिंदूंना कसा बसतो ?, हे स्पष्ट होते.
हुसेनची ही स्वीकृती म्हणजे दंगलीच्या या पटकथेचा पूर्वाध आहे. याचा उत्तरार्ध अजून शेष आहे; कारण या दंगलीमागे आणखी कुणाकुणाचा हात आहे ? हुसेन ‘मीच या दंगलीचा सूत्रधार आहे’, असे का सांगत आहे ?, कि त्याला अजून कुणाला वाचवायचे आहे ? या दंगलीसाठी पैसा कुठून आला आणि तो कुणी दिला ? आदी गोष्टींची सखोल चौकशी पोलिसांनी करायला हवी. तो या पटकथेचा उत्तरार्ध असेल आणि सर्व सत्य बाहेर येईल. एकूणच हिंदूबहुल देशात हिंदूंविरुद्ध कशापद्धतीने कट शिजवला जातो आणि तो कसा कुणीही रोखू शकत नाही, हे प्रकर्षाने लक्षात येते. हे चित्र हिंदूंना संघटित होण्याची हाक देणारेच आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात