‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’, असे समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटले आहे. समर्थांच्या या बोधवचनाचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्यक्ष कृतीत रूपांतर केले. त्यांनी मोगलांचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली; मात्र समर्थांच्या ‘दासबोधा’चे पारायण करण्याविना समर्थांनी सांगितलेल्या गोष्टींचे हिंदूंनी प्रत्यक्ष कृतीत रूपांतर केले नाही. तसेच लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदूंचे संघटन, हिंदु राष्ट्र यांसाठी सांगितलेल्या गोष्टी हिंदूंनी आचरणात आणल्या नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु धर्म, संत, देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे चित्रपट, नाटक, लेखन या माध्यमांतून पुरोगामी, बुद्धीवादी, नास्तिकवादी मंडळी यांच्याकडून सर्रास विडंबन होत आहे.
काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित दैनिकाने पुरोहितांच्या विरोधात विडंबनात्मक लेखन प्रसिद्ध केले, असे अनेक वेळा झाले आहे. त्यानंतर ब्राह्मण पुरोहित संघटनांसह ब्राह्मण समाजातील इतर संघटनांनी लेखक राजन खान आणि त्या दैनिकाच्या विरोधात आवाज उठवला. त्या दैनिकावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले. दैनिकाच्या संपादकांनी क्षमा मागितली असली, तरी लेखकावर काय कारवाई झाली ?, हे हिंदु समाजाला कळले नाही. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना लेखक अन् दैनिक यांच्यावर कारवाई होण्यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदन जरी दिले, तरी पुन्हा अशा घटना होणार नाहीत, याची शाश्वती देता येत नाही. याचे कारण पोलीस केवळ निवेदन स्वीकारतात आणि त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई केल्याचे ऐकिवात येत नाही. त्यामुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार विडंबन केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून काही तथाकथित पुरोगामी लेखक, नाटककार, दिग्दर्शक, कलाकार, ‘पीके’, ‘ओ माय गॉड’ यांसारखे चित्रपट, ‘यदा कदाचित्’सारखे नाटक यांतून हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष, पुरोहित यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका आणि विडंबन करत आहेत; मात्र याविरोधात वैध मार्गाने आवाज उठवून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी सर्वच हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
चित्रपट आणि विज्ञापने यांतून अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे विडंबन होते, तेव्हा पोलीस, प्रशासकीय अधिकारी अन् लोकप्रतिनिधी संबंधितांवर तात्काळ कारवाई करतात; कारण त्यांना पुढील गंभीर परिणामांची आणि कायदा सुव्यवस्थेची जाणीव असते. नेमके याच्या उलट परिस्थिती हिंदूंची आहे. म्हणूनच हिंदु समाज जागृत झाला, तरच पोलीस आणि प्रशासन यांना नोंद घ्यावी लागेल, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !
– श्री. सचिन कौलकर, पनवेल
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात