मंदिरांच्या भूमीच्या रक्षणासाठी कायदा करून केंद्रीय स्वायत्त ‘धार्मिक परिषदे’ची स्थापना करावी ! – टी.एन्. मुरारी
फोंडा (गोवा) : आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे ‘एण्डोवमेंट अॅक्ट’च्या माध्यमातून मंदिरांच्या संपत्तीची लूट चालू आहे. मंदिरांची लाखो एकर भूमी गायब झाली आहे किंवा काही भूमी सरकारी कामांसाठी वापरली गेली आहे. मंदिर समित्या राजकारणांच्या हातात गेल्या आहेत. केंद्र सरकारने संसदेत कायदा करून मंदिरांच्या भूमीच्या रक्षणासाठी एखाद्या केंद्रीय स्वायत्त ‘धार्मिक परिषदे’ची स्थापना करावी. या परिषदेमध्ये धर्माचार्य, पीठाधिपती, धर्मरक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शास्त्रांचे जाणकार, पुजारी यांचा समावेश करावा. अशाने मंदिरांमध्ये राज्य सरकारचा मनमानी हस्तक्षेप होणार नाही, अशी सूचना तेलंगाणा येथील शिवसेनेचे राज्य प्रमुख श्री.टी.एन्. मुरारी यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ६ ऑगस्ट या दिवशी ‘मंदिर रक्षण अभियान’ या विषयावरील उद़्बोधन सत्रात ते बोलत होते. या वेळी ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर, नवी देहली येथील ‘इटर्नल हिंदु फाऊंडेशन’चे श्री. संजय शर्मा, तसेच राजस्थान येथील ‘वानरसेना’ या संघटनेचे अध्यक्ष श्री. गजेंद्र भार्गव यांनीही मार्गदर्शन केले. उत्तरार्धात ‘मंदिररक्षण’ या विषयावर परिसंवादही पार पडला.
श्री. मुरारी पुढे म्हणाले, ‘एण्डोवमेंट अॅक्ट’च्या नावाखाली सरकारने ३२ सहस्र मंदिरे कह्यात घेतली. यांपैकी २७ सहस्र मंदिरांमध्ये देवाला धूप-दीप-नेवैद्यही दाखवला जात नाही, अशी स्थिती आहे. भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सर्वाधिक धाडी या ‘एण्डोवमेंट विभागा’वर पडल्या आहेत. माहिती अधिकाराच्या अंतर्गतही या विभागाकडून काही तरी कारणे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. हिंदु भाविक श्रद्धेने मंदिरांमध्ये अर्पण करतात; मात्र त्याचा हिंदुहितासाठी विनियोग केला जात नाही. प्राचीन काळी मंदिरे ही समाजजीवनाचा केंद्रबिंदू होती; मात्र परकीय आक्रमकांनी मंदिरे उद़्ध्वस्त करून हिंदु संस्कृतीवर घाला घातला. स्वातंत्र्योत्तर काळात सरकार मंदिरे कह्यात घेऊन मंदिरांच्या संपत्तीची लूट करत आहे, हे दुर्दैव आहे.’’
मंदिर समित्यांनी युवा पिढीला मंदिरांशी जोडायला हवे ! – गजेंद्र भार्गव, अध्यक्ष, ‘वानरसेना’, राजस्थान
आज भारतात अशी अनेक मंदिरे आहेत की, ज्या मंदिरांच्या भवताली अन्य पंथियांची वस्ती अथवा वास्तू आहेत. मंदिर व्यवस्थापन समित्या केवळ मंदिरांच्या अंतर्गत कारभारामध्ये लक्ष घालतात; पण ‘मंदिराच्या बाहेर काय परिस्थिती आहे’, याकडे लक्ष देत नाहीत. प्रत्येक व्यक्तीची कुठल्या तरी देवतेवर किंवा मंदिरावर श्रद्धा असते. ते पाहून युवा पिढीला मंदिरांशी जोडण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. हनुमान मंदिरांमध्ये व्यायामशाळा चालू करून, युवकांना जोडण्याचा प्रयत्न करता येईल. तसे झाले, तर युवकांमध्ये धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती निर्माण होईल. मग कोणत्याही आक्रमकाची मंदिराकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही.
धार्मिक स्थळांच्या विकासाच्या नावाखाली प्राचीन मठ-मंदिरे यांचा विध्वंस ! – अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच, ओडिशा
धार्मिक स्थळांच्या विकासाच्या नावाखाली प्राचीन मठ-मंदिरे यांचा विध्वंस होत आहे. सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर जगन्नाथपुरी मंदिराभोवती प्रदक्षिणामार्ग करण्याच्या प्रकल्पांतर्गत ओडिशा सरकारने कित्येक प्राचीन मठ-मंदिरे भुईसपाट केली. त्यामुळे शेकडो वर्षांचा सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक ठेवा उद़्ध्वस्त झाला. धार्मिक स्थळांचा विकास नाही, तर केवळ परिसराचे सौंदर्यीकरण चालू आहे. एखाद्या तीर्थक्षेत्राला सहलीचे ठिकाण बनवण्याचा हा प्रकार आहे. तो थांबवायचा असेल, तर धार्मिक स्थळांच्या संदर्भात कोणताही प्रकल्प राबवण्यापूर्वी स्थानिक समिती स्थापन करून स्थानिकांची त्या प्रकल्पासाठी संमती घ्यावी, अशी मागणी ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी ‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या अंतर्गत ‘मंदिररक्षण’ या विषयावर उद़्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ‘जगन्नाथपुरी येथील मठ-मंदिरांची भूमी हडपण्याचे सरकारी षड्यंत्र’ या विषयावर ते बोलत होते.
श्री. अनिल धीर यांनी मांडलेली अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे
ओडिशा सरकारने जगन्नाथपुरी येथील मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाच्या अंतर्गत प्राचीन लांगोडी, मंगू, बडा आखाडा यांसारखे मोठे मठ हिंदूंचा विरोध डावलून उद़्ध्वस्त केले. याशिवाय शेकडो लहान मठही तोडून टाकले. मठांमधील संपत्तीचे कोणत्याही प्रकारचे दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करण्यात आलेले नाही. ‘तेथे समाजविघातक कारवाया चालतात’, असा बहाणा सरकारने केला. या कारवाईमध्ये एम्.आर्. मठाच्या येथील प्राचीन आणि मोठे रघुनंदन ग्रंथालयही उद़्ध्वस्त झाले. या ग्रंथालयात ३५ सहस्र ग्रंथ होते. त्यांपैकी कारवाईनंतर आता केवळ ५ सहस्र ग्रंथ शिल्लक आहेत. उरलेले ग्रंथ कोठे आणि कशा स्थितीत आहेत, याचा कुणालाच थांगपत्ता नाही. अशा प्रकारे हा अमूल्य ठेव लुप्त झाला. विशेष म्हणजे पुरी येथील जे मठ तोडून टाकण्यात आले, त्या मठांकडे जगन्नाथाच्या धार्मिक उपचार किंवा विधी यांचे दायित्व होते. एखादा मठ जगन्नाथाला फूले द्यायचा, एखादा मठ औषध किंवा अलंकार इत्यादी. भुवनेश्वर, तसेच वाराणसी येथेही अनेक प्राचीन मंदिरे अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात आली. राजकीय कारणाने होणार्या अशा प्रकारच्या कारवायांमधून हिंदूंची प्राचीन सभ्यता, संस्कृती, वास्तूकला मोडकळीस येत आहे. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी आम्ही मागणी केली होती.
एखादी वास्तू धोकादायक झाली असेल, तर नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूळ स्वरूप तसेच ठेवत त्याची पुनर्बांधणी करणे शक्य आहे. पण त्याचा उपयोग न करता सरळ ती वास्तू पाडली जाते, हे दुर्दैवी आहे.
मंदिरांमध्ये २ घंटे वेळ देऊन आपले कौशल्य आणि ज्ञान दान करा ! – श्री. संजय शर्मा, ‘इटर्नल हिंदु फाऊंडेशन, नवी देहली
मंदिर हे केवळ हिंदूंच्या धार्मिक आस्थेचे केंद्र नाही, तर ते समाजाच्या सभ्यतेचे प्रतीक आहे. हिंदूंचा इतिहास आणि संस्कृती यांची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. त्या दृष्टीने ‘राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी, २ घंटे मंदिरांना द्या’ (‘राष्ट्रनिर्माण के काम, २ घंटे मंदिर के नाम), अशी मोहीम ‘इटर्नल हिंदु फाऊंडेशन’च्या वतीने आम्ही राबवत आहोत. यामध्ये आपण आठवड्यातून किंवा मासातून २ घंटे मंदिरांसाठी द्यावेत. आपण आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन आपले जे कौशल्य आहे, ते दान करा. शेतकरी, परिचारिका, शिक्षक, सैनिक असे विविध समाजघटक या मोहिमेत सहभागी झाले आणि त्यांनी त्यांचे ज्ञान आणि कौशल्य यांचा इतरांना लाभ करून दिला, तर समाजजागृती होऊन मंदिरे ही समाजजीवनाचे केंद्र बनतील. त्यातून भारताची आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल होईल. ‘मंदिरांसाठी वेळ देणे’, हे आपले सामूहिक दायित्व आहे.