कोल्हापूर : येथील श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात प्रवेश करण्याऐवजी तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केली. पुरुषांनी सोवळे आणि महिलांनी साडी नेसून गाभार्यात जाण्याची परंपरा आहे. त्यासाठी कुणाची अनुमती काढण्याची आवश्यकता नाही. मंदिर प्रवेशासाठी अनुमती असतांना फेरी काढूनच मंदिरात जाणार, असे सांगत देसाई यांनीच वाद वाढवला. कोल्हापूर हे शांत शहर असतांना येथील नागरिकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरला अपकीर्त करण्याचा त्यांचा डाव होता, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन्. पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केला. त्यांनी पुढे म्हटले आहे की, वेळप्रसंगी आम्ही परंपरा जपण्यासाठी जनहित याचिकाही प्रविष्ट करू.
तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हे नोंद
कोल्हापूर : तृत्पी देसाई यांना मारहाण केल्याप्रकरणी ४ श्री पूजकांसह २ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सर्वश्री केदार मुनीश्वर, शिरीष मुनीश्वर, चैतन्य अष्टेकर, निखिल शानभाग या श्री पूजकांसह श्री. जयकुमार शिंदे आणि श्री. किसन कल्याणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात