भारत सरकारने काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये आणून त्यांचे पुनर्वसन करण्याचा दृढ निश्चय करणे आवश्यक ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, युथ फॉर पनून कश्मीर
काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले ३७० कलम हटवल्यावर आम्हाला वाटले होते की, येथील जिहादी कारवाया आणि काश्मीरचे इस्लामीकरण बंद होईल. या कालावधीत येथील स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यामुळे तेथील आतंकवादी कारवाया तात्पुरत्या थांबल्या; मात्र त्यांच्या सुटकेनंतर या कारवाया पुन्हा चालू झाल्या आहेत. भारत सरकार काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये आणून त्यांचे पुनर्वसन करण्याचा दृढ निश्चय करत नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये वसवणे, हे एक स्वप्नच राहिल, असे प्रतिपादन ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी केले. ते ‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीच्या सत्रात बोलत होते. त्यांनी ‘काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यानंतरची स्थिती’ या विषयावर त्यांचे विचार मांडले.
ते म्हणाले, ‘‘काश्मीरमध्ये मागील ३० वर्षांमध्ये काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला; मात्र भारत सरकारने अद्याप हा नरसंहार असल्याचे मान्य केले नाही. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाल्याचे मान्य केले असते, तर भारतात अन्य ठिकाणी होत असलेला हिंदूंचा नरसंहार टाळता आला असता. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार विसरल्यामुळे आज देशात ५०० हून अधिक ‘छोटे पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत. काश्मिरी हिंदूंचा नरसंहार सर्व देशवासियांना कळायला हवा. यासाठी वर्ष २०१९ मध्ये आम्ही ‘पनून कश्मीर अत्याचार आणि नरसंहार विधेयक २०२०’ सिद्ध केले. हे विधेयक संसदेमध्ये संमत करण्यासाठी आम्ही सरकारला दिले आहे; मात्र अद्याप हे विधेयक संमत झालेले नाही. काश्मीरमध्ये जी स्थिती निर्माण झाली, तशी भारतात अन्यत्र निर्माण होऊ नये, यासाठी हे विधेयक संमत करून कायदा करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक हिंदु संघटनेने या विधेयकासाठी आवाज उठवायला हवा.
सामाजिक माध्यमांद्वारे विश्वव्यापक अशा सनातन धर्माचा अधिकाधिक प्रचार व्हायला हवा ! – नीरज अत्री, अध्यक्ष, राष्ट्रीय इतिहास अनुसंधान आणि तुलनात्मक अध्ययन केंद्र, हरियाणा
अनेक पत्रकार आणि प्रसारमाध्यमे खोटा प्रचार करतात. कर्नाटकमधील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर अशाच प्रकारे खोट्या वृत्तांचा प्रचार करण्यात आला. सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) प्रसारित होणारे लिखाण हे सत्य आणि असत्य यांमधील युद्ध आहे. ‘नेहमी सत्याचा विजय होतो’, हे आपण ऐकले आहे; मात्र सध्या सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात असत्य पसरवले जात आहे. असत्य सत्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी आपण सत्याला सशक्त करण्यासाठी सनातन धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्य माहिती सांगणारी अधिकाधिक ‘यू ट्यूब’सारखे ‘चॅनेल’ निर्माण करणे आवश्यक आहे. जिहादी आणि नक्षलवाद यांचा प्रचार करण्यासाठी सामाजिक माध्यमांना मोठ्या प्रमाणात धन मिळते; मात्र सनातन धर्माची बाजू समोर ठेवण्यासाठी धनाची अडचण येते. मी जेव्हा माझा पहिला ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमावर प्रसारित केला, तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र काही कालावधीनंतर त्याला ‘लाईक’ करणार्यांपेक्षा विरोध करणार्यांची संख्या अचानक वाढली. मला ‘मोदी भक्त’, ‘पैसे घेऊन काम करत आहे’, असे ठरवण्याचा प्रयत्न झाला. याचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, जिहादी किंवा माओवादी यांनी अशी यंत्रणा सिद्ध केली आहे. ही यंत्रणा तुम्हाला काम करू देत नाही. त्यानंतर मी याच क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला. आज माझे ‘यू ट्यूब चॅनेल’ ८५ सहस्र नागरिकांनी ‘सबस्क्राईब’ केले आहे. आपला सनातन धर्म व्यापक आहे. तो विश्वाच्या कल्याणाचा संदेश देतो. सामाजिक माध्यमातून त्याचा अधिकाधिक प्रचार करायला हवा.
‘पूर्व अन् पूर्वोत्तर भारतात हिंदूंचे वाढते धर्मांतर आणि त्यावरील उपाय’ या विशेष परिसंवादात मान्यवरांचा सहभाग
या परिसंवादामध्ये केंद्रशासनाने धर्मांतरासाठी विदेशातून येणार्या निधीला प्रथम अटकाव करून राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी झारखंड मधील ‘तरुण हिंदू’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नील माधव दास यांनी केली. त्रिपुरा येथील शांती काली आश्रमाचे पू. स्वामी चित्तरंजन महाराज यांनी हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी अधिकाधिक शिक्षण संस्था उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले, तर बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. कौशिकचंद्र मल्लिक यांनी बंगालमध्ये धर्मांतर बंदीसह घुसखोरी रोखणे, नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणे आणि धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता प्रतिपादिली. या वेळी मेघालयातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती इस्टर खरबामोन यांनी ‘मेघालयात हिंदूंना शाळा, रुग्णालय, सरकारी नोकरी, निवास, विवाह, विदेशी प्रवास आदींपासून उपेक्षित ठेवले जाते; मात्र ख्रिस्ती अन् मुसलमान यांना सर्व सुविधा मोठ्या प्रमाणात दिल्या जातात; म्हणून हिंदू धर्मांतर करत असल्या’चे वास्तव मांडले.