नवी देहली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्यासाठी भूमीपूजन केल्याच्या काही दिवसांनंतर मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करण्यासाठी साधूंनी आता ‘श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या धर्तीवर ‘श्रीकृष्णजन्मभूमी निर्माण न्यास’ स्थापन केला आहे.
‘श्रीकृष्णजन्मभूमी निर्माण न्यासा’चे प्रमुख आचार्य देवमुरारी बापू यांनी सांगितले की,
१. २३ जुलै या दिवशी ‘हरियाली तीज’ या सणाचे निमित्त साधून या न्यासाची नोंदणी केली आहे. न्यासात १४ राज्यांतील जवळपास ८० संत सहभागी आहेत. ज्यात वृंदावनमधील ११ संत आहेत.
२. श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी लवकरच इतर संत आणि साधू यांना जोडण्यासाठी स्वाक्षरी मोहीम चालू केली जाईल. आम्ही या विषयावर देशव्यापी चळवळ चालू करू. आम्ही फेब्रुवारी मासातच ही मोहीम चालू केली होती; परंतु दळणवळण बंदीमुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही.
३. श्रीकृष्णजन्मभूमीवर शाही ईदगाह मशीद उभी आहे. औरंगजेबाने वर्ष १६६९ मध्ये प्राचीन केशवनाथ मंदिर उद्ध्वस्त करून तेथे शाही इदगाह मशीद बांधली होती.
४. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा पूर्वीच्या काळात इस्लामी आक्रमणांमुळे नष्ट झालेल्या हिंदूंच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळांवर पुन्हा अधिकार सांगण्यातील मुख्य अडथळा ठरत आहे. हा वादग्रस्त कायदा चर्च, मशिदी आणि मंदिरे यासारखी उपासनास्थळे वेगळ्या धर्माच्या उपासनास्थळांमध्ये पालटण्यास प्रतिबंधित करते.
५. हे किरकोळ अडथळे आहेत आणि जेव्हा आम्ही पुढे जाऊ, तेव्हा आम्ही हे अडथळेही पार करू. श्रीकृष्णाजन्मभूमीला स्वतंत्र करण्याचा आमचा संकल्प ठाम आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात