Menu Close

श्रीराममंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर HJS चे श्री. सुनील घनवट यांनी मुलाखतीद्वारे केलेले मार्गदर्शन

५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमीपूजन पार पडले. कोट्यवधी जनतेच्या मनातील राममंदिराचे स्वप्न आता साकार होणार आहे. राममंदिराच्या उभारणीचा लढा हा भारताच्या न्यायालयीन आणि सामाजिक जीवनातील मोठा अध्याय आहे. या भूमीपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर एका मुलाखतीच्या माध्यमातून राममंदिर आणि मंदिराच्या लढ्याचा इतिहास, न्यायालयीन संघर्ष, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने राममंदिराचे महत्त्व आणि हिंदु समाजाचा सहभाग यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदू आणि रामभक्त यांना मार्गदर्शन केले आहे. ते आपण जाणून घेऊया.

१. रामजन्मभूमीवरील राममंदिराच्या ठिकाणी मशिदीचा ढाचा निर्माण होण्यातील टप्पे

१ अ. इंद्रलोकासमान असणारी रामजन्मभूमी आणि अनेक पिढ्यांनंतरही श्रीरामाच्या कृपेमुळे टिकून राहिलेले अयोध्यानगरीचे अस्तित्व : त्रेतायुगामध्ये श्रीविष्णूचा सातवा अवतार अर्थात् प्रभु श्रीरामचंद्र पृथ्वीवर अवतरित झाले. श्रीरामाच्या जन्माच्या वेळी सध्याच्या रामजन्मभूमीचे क्षेत्र म्हणजे दशरथ राजाचा एक संपन्न राजमहाल होता. महर्षि वाल्मीकि यांनी रामायणामध्ये रामजन्मभूमीची तुलना इंद्रलोकाशी केली आहे. इतकी ही भूमी ऐश्‍वर्यसंपन्न होती ! प्रभु श्रीरामाच्या जलसमाधीनंतर अयोध्येची रया पूर्वीसारखी राहिली नाही; मात्र रामजन्मभूमी सुरक्षित होती. श्रीरामाचे पुत्र कुश याने राजधानी अयोध्येचे पुनरुत्थान केले. सूर्यवंशाच्या पुढील ४४ पिढ्यांपर्यंत अयोध्येचे स्थान उच्च पातळीवर होते. सूर्यवंशाचा शेवटचा राजा बृहद्वल हा महाभारताच्या युद्धात मारला गेल्यानंतर अयोध्या नगरी उजाड झाली; मात्र रामरायाच्या कृपेने श्रीरामजन्मभूमीचे अस्तित्व टिकून होते.

१ आ. उज्जैनचे सम्राट विक्रमादित्य यांच्याकडून रामजन्मभूमीवर राममंदिराची उभारणी : अलीकडच्या काळातील इतिहास पहायचा झाला, तर उज्जैनचे सम्राट विक्रमादित्य अयोध्येत आल्यानंतर त्यांना तोपर्यंत विदीर्ण अवस्था प्राप्त झालेल्या रामजन्मभूमी अयोध्येचा उद्धार करून तेथे राममंदिर उभारण्याची दैवी प्रेरणा झाली. विक्रमादित्यांच्या काळात म्हणजे अनुमाने २ सहस्र वर्षांपूर्वी राममंदिराची उभारणी केली गेली, अशी मान्यता आहे. ११ व्या शतकात कनोजचा नरेश जयचंद याने मंदिराच्या ठिकाणी असलेला शिलालेख उखडून त्याचा शिलालेख बसवल्याची इतिहासात नोंद आढळते. पानिपतच्या युद्धानंतर जयचंदचाही अंत झाला आणि पुन्हा भारतावर धर्मांध मोगल आक्रमकांची आक्रमणे चालू झाली.

१ इ. बाबराचा सेनापती मीरबांकी याने राममंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशिदीचा ढाचा बांधणे आणि त्या युद्धात पावणेदोन लाख हिंदूंनी राममंदिराच्या रक्षणासाठी त्यांच्या प्राणांची आहुती देणे : १५ व्या शतकात जेव्हा परकीय मोगल आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, तेव्हा त्यांनी हिंदूंची श्रद्धास्थाने आणि मंदिरे यांना लक्ष्य करत भारत काफीरमुक्त करायचा प्रयत्न केला. त्यांनी लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या, सहस्रो गावे जाळली, तसेच मंदिरे उद्ध्वस्त करून देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. वर्ष १५२८ मध्ये पहिला मोगल शासक बाबर याचा सेनापती मीरबांकी याने श्रीरामजन्मभूमीवरील राममंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशिदीचा ढाचा बनवला. तो ढाचा म्हणजेच बाबरी मशीद ! इतिहासकारांच्या अभ्यासानुसार राममंदिरासाठी हिंदू आणि मीर बाकी यांच्यामध्ये १५ दिवस घनघोर युद्ध झाले; पण मीरबांकी याने हिंदूंचा विरोध चिरडून टाकला. या युद्धात जवळपास पावणेदोन लाख हिंदूंनी राममंदिराच्या रक्षणासाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली.

२. राममंदिराच्या उभारणीसाठीचा संघर्ष

२ अ. वर्ष १५२८ ते १९४९ पर्यंत राममंदिरासाठी ७२ हून अधिक लढाया केल्या जाणे : प्राचीन काळापासून राममंदिराच्या रक्षणासाठी आणि तेथे बाबरी मशीद उभारली गेल्यानंतर राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंनी प्रदीर्घ संघर्ष केला आहे. हा संघर्ष हिंदूंची रामरायावरील श्रद्धेचे प्रतीक आहे. बाबरीचा ढाचा झाल्यापासून म्हणजे वर्ष १५२८ ते वर्ष १९४९ या जवळपास ४२१ वर्षांच्या काळात राममंदिराच्या मुक्तीसाठी ७२ युद्धे झाली. बाबरच्या काळात ४ वेळा, हुमायूनच्या काळात १० वेळा, अकबराच्या कालखंडात २० वेळा, औरंगजेबाच्या कालखंडात ३० वेळा, शहादत अलीच्या काळात ५ आणि नसिरूद्दीन हैदरच्या काळात ३ वेळा राममंदिराच्या मुक्तीसाठी हिंदूंनी लढा दिला.

२ आ. इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’ या तत्त्वाने निर्णय देणे : वर्ष १८५३ मध्ये या जागेवरून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला अन् इंग्रजांचे लक्ष या जागेकडे गेले. इंग्रजांनी ‘फोडा अणि राज्य करा’ या तत्त्वाने आतील भागांत मुसलमानांना, तर बाहेरील भागांत हिंदूंना पूजाप्रार्थनेची अनुमती दिली.

२ इ. वर्ष १९४९ मध्ये बाबरीच्या घुमटाच्या आत रामललाच्या मूर्ती अवतीर्ण होणे : २३ डिसेंबर १९४९ या दिवशी एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली. बाबरीच्या ढाच्याच्या घुमटाच्या आत रामाच्या मूर्ती आढळून आल्या. ‘हिंदूंनी त्या मूर्ती गुपचूप ठेवून दिल्या’, असा मुसलमानांनी आरोप केला, तर काही हिंदूंनी ‘त्या मूर्ती आधीपासूनच तेथे होत्या’, असे सांगितले; पण बहुसंख्य भाविकांच्या श्रद्धेनुसार त्या मूर्ती तेथे प्रकट झाल्या होत्या. त्या दिवशी तेथील सुरक्षारक्षकाला दिव्य प्रकाश दिसला आणि छोट्या बालकाच्या रूपातील श्रीरामाच्या मूर्तींचे दर्शन झाले. तोच रामलला ! हा विषय सर्वत्र पोचल्यानंतर तत्कालीन नेहरू सरकारने त्या जागेला वादग्रस्त ठरवून सरकारच्या कह्यात घेतले आणि तेथे सरकारी कुलूप लावले.

२ ई. हिंदूंनी पूजेचा अधिकार मागितल्यानंतर ‘सुन्नी वक्फ बोर्डा’ने न्यायालयात धाव घेणे : त्यानंतर रामललाच्या पूजेचा अधिकार मिळण्यासाठी वर्ष १९५० मध्ये हिंदूंनी न्यायालयात धाव घेतली. वर्ष १९५९ मध्ये निर्मोही आखाड्यानेही पूजेचे अधिकार आणि जागेची मालकी असे मागितले. हिंदू पक्षकार न्यायालयात गेल्यानंतर वर्ष १९६१ मध्ये सुन्नी वक्फ बोर्डानेही त्या जागेवर त्यांचा दावा सांगितला.

२ उ. राममंदिर उभारणीसाठी जनआंदोलन उभे रहाणे : वर्ष १९८९ मध्ये राममंदिराच्या भूमीविषयीचा विवाद जिल्हा न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे आला. याच काळात राममंदिराच्या निर्मितीसाठी विश्‍व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच देशातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, धार्मिक हिंदू यांच्या सहभागातून देशव्यापी जनआंदोलन उभे राहिले. याच काळात हिंदूंनी संकल्पित केलेल्या राममंदिराचा शिलान्यास करण्यात आला. कोट्यवधी हिंदू राममंदिराच्या निर्माणासाठी कृतीशील झाले.

२ ऊ. शासकीय आणि प्रशासकीय दमन सहन करत हिंदूंनी बाबरीचा ढाचा भुईसपाट करणे : ६ डिसेंबर १९९२ या दिवशी देशभरातील सहस्रो कारसेवकांनी अयोध्येला एकत्र येऊन रामनामाचा जयघोष करत बाबरीचा ढाचा पाडला. या काळात त्यांना शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर अनेक त्रास सहन करावे लागले. कित्येकांनी पोलिसांच्या लाठ्या आणि बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. कित्येक जणांनी कारावास सहन केला. त्यानंतर ठिकठिकाणी धर्मांधांनी दंगली केल्या.

३. पुरातत्व खाते आणि न्यायालय यांची भूमिका

३ अ. पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात बाबरीच्या ढाच्याखाली प्राचीन मंदिराचे अवशेष सापडणे : वर्ष १९९६ मध्ये अयोध्या विवादाशी सर्व दावे अलाहबाद उच्च न्यायालयाने एकाच न्यायालयाकडे वर्ग केले. वर्ष २००२ मध्ये उच्च न्यायालयाने या विवादित जागेची मालकी नक्की कोणाची, हे ठरवण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याला आदेश दिले. वर्ष २००३ मध्ये पुरातत्व खात्याला या उत्खननात प्राचीन मंदिराचे दगडी अवशेष आढळून आले.

३ आ. अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त २.७७ एकर भूमीची तीन पक्षकारांमध्ये समान वाटणी करणे : त्यानंतर ३० सप्टेंबर २०१० या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने राज्य सरकारने अधिग्रहित केलेली २.७७ एकर जागा रामलला विराजमान, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांना समसमान म्हणजे एक तृतीयांश वाटली. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

३ इ. ४० दिवसांच्या युक्तीवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी रामललाची असल्याचा स्पष्ट निर्वाळा देणे : या विषयावर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंनी सलग ४० दिवस युक्तीवाद झाले. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने ती भूमी रामललाचीच असल्याचे शिक्कामोर्तब केले आणि त्या ठिकाणी राममंदिर बांधण्याचा मार्ग प्रशस्त केला.

३ ई. प्रभु श्रीराम हे केवळ श्रद्धास्थान नाही, तर राष्ट्रपुरुषही ! : मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान तर आहेतच; पण ते राष्ट्रपुरुष आहेत. देशाच्या राज्यघटनेच्या पहिल्या प्रतीवरही पुष्पक विमानात विराजमान सीतामाता आणि श्री लक्ष्मण यांच्यासहित अयोध्याधिपती श्रीराम यांचे रेखाचित्र काढण्यात आले होते.

४. विरोधासाठी विरोध करणे, हा श्रीरामरायांप्रतीचा द्वेषच !

राममंदिराच्या भूमीपूजनाच्या संदर्भात काही नेत्यांनी अनावश्यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने ‘राममंदिरामुळे कोरोना पळून जाईल’, असे सरकारला वाटते’, अशी खोचक टिपणीही केली. अशा प्रकारची वक्तव्ये म्हणजे हिंदुद्वेषाचेच उमाळे आहेत. या नेत्यांनी देशात कोरोनाचे वाहक बनलेल्या तबलिगी जमातीला कधी असा सल्ला दिला नाही; मात्र हिंदू किंवा हिंदूंच्या श्रद्धा यांचा विषय आला की, त्यांना लगेच कोरोनाच्या साथीची चिंता भेडसावते. ५ ऑगस्टला भूमीपूजनाचा कार्यक्रम प्रशासनाचे सर्व नियम पाळूनच करण्याचे नियोजन केले होते. असे असतांना विरोधासाठी विरोध करत रहाणे, हा श्रीरामरायांप्रती द्वेष दर्शवणारा आहे. हिंदुद्वेष्ट्यांनी कितीही थयथयाट केला, तरी आज कोट्यवधी हिंदू जनता राममंदिराच्या उभारणीसाठी आतुर आहे. अशांवर अशा हिंदुद्वेषी विधानांचा परिणाम होणार नाही, ही वस्तूस्थिती आहे.

५. परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे आणि ठिकाणे यांचे पुनर्निर्माण अन् जीर्णोद्धार होणे आवश्यक !

राममंदिराची निर्मिती होणे, हा संपूर्ण हिंदु समाजासाठी गौरव आहे. आज केवळ रामजन्मभूमी मुक्त होत आहे; पण अयोध्येत आजही लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मंदिरांसह ३६० हून अधिक मंदिरे परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त करून त्यावर मशिदी अन् कब्रस्ताने बांधली आहेत. काशीचे विश्‍वनाथ मंदिर आणि मथुरेचे श्रीकृष्णमंदिर हेही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. देशभरात अशी सहस्रो मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाणे आहेत की, परकीय आक्रमकांनी ती उद्ध्वस्त केली आहेत. त्यांचे पुनर्निर्माण आणि जीर्णोद्धार व्हायला हवा. भारताला खर्‍या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ व्हायचे असेल, तर भारताच्या उरावर असलेल्या गुलामीच्या खुणा पुसून टाकायला हव्यात. त्यासाठी सरकारने कृती करण्यासह हिंदु समाजानेही त्यांच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी सजग असणे आवश्यक आहे.

६. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीकोनातून राममंदिराची उभारणी होत आहे !

हिंदु राष्ट्र आणि रामराज्य या वेगळ्या संकल्पना नाहीत. श्रीरामाचे रामराज्य स्थापण्यासाठी पुष्कळ संघर्ष केला आहे. त्यामुळे राममंदिराची उभारणी आणि रामराज्याची स्थापना यांसाठी आपल्यालाही संघर्ष करावा लागेल. हिंदूंचा ५०० वर्षांचा वनवास संपून राममंदिराची निर्मिती होत आहे. यामुळे राष्ट्राची आध्यात्मिक चेतना वाढेल. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या आशीर्वादाने हे कार्य चालू आहे. यातूनच पुढे रामराज्याच्या स्थापनेला म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला आरंभ होईल, अशी आमची भावना आहे.

७. महंमद फैज खान यांनी सर्वप्रथम हिंदु समाजाच्या भावनांचा आदर करावा !

आक्रमणकर्त्या बाबराच्या प्रतिकांना तिलांजली देऊन भारतीय मुसलमानांनी प्रभु श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी यापूर्वीच सहकार्य केले असते, तर राममंदिरासाठीचा संघर्ष टाळता आला असता. उलट मुसलमान समाजाने विरोधाचाच पवित्रा घेतला. आजवर राममंदिराला मुसलमानांनी केलेल्या विरोधामुळे या कृतीविषयी हिंदूंच्या मनात विरोधाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. महंमद फैज खान यांनी राममंदिराच्या भूमीपूजनासाठी कौसल्या माता मंदिराची माती आणण्याचा आग्रह धरला होता. त्यांच्या भावना पवित्र असतील, ते रामभक्त असतील, असे जरी एक वेळ मानले, तरी ‘त्यांनी या वेळी सर्वप्रथम हिंदु समाजाच्या भावनांना आदर करायला हवा आणि भूमीपूजनासाठी माती आणण्याचा अट्टाहास सोडून माघार घ्यावी’, असे आम्हाला वाटते.

खान यांनी ‘सोशल मिडिया’वरील एका पोस्टमध्ये प्रभु श्रीरामाचा ‘इमाम-ए-हिंद’ असा उल्लेख केला आहे. ‘इमाम’चा अर्थ काहीही असला, तरी तो प्रभु श्रीरामांसाठी वापरणे, हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक आदी सर्वदृष्ट्या चुकीचे आहे. त्यामुळे या उल्लेखाविषयीही इमाम यांनी जाहीर क्षमायाचना करावी, अशी आमची मागणी आहे.

८. रामराज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्नरत रहाणे, ही आपली धर्मसेवा आहे, हे लक्षात घ्या !

जवळपास ५०० वर्षांच्या संघर्षानंतर हिंदूंनी त्यांचे एक श्रद्धास्थान मुक्त केले आहे. जिहादी आक्रमकांनी केवळ एक राममंदिर उद्ध्वस्त केले नाही, तर लक्षावधी मंदिरे उद्ध्वस्त केली. आजही स्वतंत्र भारतामध्ये काशीचे विश्‍वनाथ मंदिर, मथुरेतील श्रीकृष्णमंदिर येथे इस्लामी अतिक्रमणे झाली आहेत. त्यांच्या मुक्ततेसाठीही आपण वैध मार्गाने प्रयत्न करायला हवेत. ज्यांना शक्य आहे, त्यांनी जनजागृती करावी, त्यांनी प्राचीन मंदिरांच्या उत्थानासाठी निवेदने द्यावीत, न्यायालयीन लढाई लढावी. आपले कौशल्य आणि वेळ धर्मसेवेसाठी उपयोगात आणावा.

ज्या पवित्र भूमीवर प्रभु श्रीरामाने जन्म घेतला, त्या ठिकाणी श्रीरामाचे भव्य मंदिर उभे रहाण्याचा संघर्ष किती प्रदीर्घ आहे, हे आपण पाहिले. श्रीरामचंद्राच्या कृपेने राममंदिर निर्माण होतच आहे, आता प्रत्यक्ष रामराज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्नरत रहाणे, ही आपली धर्मसेवा असेल. ५०० वर्षांच्या राममंदिर निर्माणाच्या संघर्षाच्या काळात न जाणो कित्येक रामभक्तांनी, जिहादी आक्रमकांनी हिंदु संस्कृतीवर केलेला आघात पुसून टाकण्यासाठी प्राणपणाने संघर्ष केला असेल ! राममंदिराच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने सर्व ज्ञात-अज्ञात रामभक्तांचे स्मरण करत मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धर्मरक्षणासाठी प्राणपणाने झुंजणार्‍या या वीर भक्तांचा आदर्श समोर ठेवून आपणही धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी समर्पित व्हायला हवे. त्यासाठी कार्य करण्याची शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा हिंदु समाजाला मिळो, अशी प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो.

राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समितीचे योगदान

राममंदिर उभारणीच्या दृष्टीने जनजागृती करण्याकडे हिंदु जनजागृती समितीने अधिक भर दिला; कारण जनमताचा रेटा निर्माण झाला की, सर्व काही साध्य होते. ‘संङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ म्हणजे संघटनात शक्ती आहे, असे म्हणतात. समितीच्या वतीने आयोजित केली गेलेली अनेक अधिवेशने, शेकडो सभा, मेळावे, परिषदा यांमध्ये आम्ही ‘श्रीरामजन्मभूमीवर शीघ्रातीशीघ्र राममंदिराची उभारणी व्हावी’, याविषयी जनजागृती केली, त्यासंदर्भात प्रस्ताव पारित करून ते सरकारकडे पाठवले. केवळ आंदोलनाच्या स्तरावरच नव्हे, तर हिंदु मनातही श्रीरामाचा वास निर्माण व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणात ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात आले. राममंदिर निर्माणासाठीच्या महत्त्कार्यात आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला, थोडीफार सेवा घडली, याविषयी आम्ही कृतज्ञ आहोत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *