‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या शेवटच्या दिवशीचे समारोपीय सत्र !
फोंडा (गोवा) : तिहेरी तलाकवर बंदी, कलम ३७० रहित होणे आणि श्रीराममंदिर या ३ गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. आता अजून ३ शिल्लक आहेत. त्या म्हणजे काशी आणि मथुरा येथे अनुक्रमे विश्वनाथ आणि श्रीकृष्ण मंदिर यांची उभारणी आणि शेवटी अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना ! अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ बोलण्याने होणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष वैध मार्गाने कृती करावी लागेल. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा मार्ग अनुसरावा लागेल. हिंदु राष्ट्रामध्ये गोहत्या, ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात असणार नाहीत. हिंदूंनी जागृत आणि संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे, असे आवाहन प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा तेलंगाणा येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या समारोप सत्रात ते बोलत होते. या प्रसंगी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा त्रिकालदर्शीपणा’ या विषयावर सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद़्गुरु नंदकुमार जाधव आणि ‘भावी कार्याची दिशा’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनीही मार्गदर्शन केले.
श्री. टी. राजासिंह यांनी त्यांच्या परिसरात गेल्या वर्षभरात झालेल्या धर्मरक्षणाच्या कार्याविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘बकरी ईदच्या दिवशी होणार्या गोहत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून यंदा एकाही गोमातेची हत्या होऊ शकली नाही. काही वासरांच्या हत्या झाल्या; मात्र त्याही पूर्णपणे थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील अंबरपेठ परिसरात काही धर्मांधांनी एका जागेला अवैधपणे मशिदीमध्ये रुपांतरित करण्याचा प्रयत्न चालवला होता. तो आम्ही बंद पाडला. त्याशिवाय आंध्रप्रदेश येथे १०० गायींना मारून टाकण्याची घटना घडली. घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पहाणी करून आम्ही या घटनेचे अन्वेषण करण्याची मागणी केली. या गायी जे गवत चरायला जातात, त्यावर विषाची फवारणी करण्यात आल्याचे अन्वेषणात उघडकीला आले. या जोडीला तरुणांना हिंदु राष्ट्राच्या कार्याला जोडण्याचे प्रयत्नही निरंतर चालू आहेत.’’
‘ऑनलाईन’ खाद्यपदार्थ पोचवण्याच्या माध्यमातून हिंदूंना नपुंसक करण्याचे षड्यंत्र ! – टी. राजासिंह
हिंदू दिवसेंदिवस आळशी बनत चालले आहेत. ते खाण्यापिण्याचे पदार्थ ‘ऑनलाईन’ मागवतात. हे पदार्थ घरपोच पोचवतांना मागवणारी व्यक्ती हिंदू असेल, तर खाद्यपदार्थांमध्ये एक रसायन मिसळले जाते, ज्यामुळे हिंदूंची मुले जन्माला घालण्याची शक्ती क्षीण होते. असे धक्कादायक प्रकार उघडकीला आले आहेत. हे हिंदूंना नपुंसक बनवण्याचे षड्यंत्र आहे.
हिंदु धर्मावरील वैचारिक आक्रमण परतवून लावण्यासाठी ‘वैचारिक’ क्षत्रियांची नितांत आवश्यकता ! – पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या
आपल्या देशाची परंपरा हिंदुत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदु साम्राज्याची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर मात्र सत्तेवर येणार्यांनी मात्र हिंदुविरोधी विचारधारा जपली. ‘धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदुत्वाला विरोध’ या भूमिकेने त्यांनी काम केले. हिंदूंनी कधीही कुणावर आक्रमण केले नाही. कुणाच्या पूजाविधीला विरोध केला नाही; मात्र आक्रमकांनी हिंदु धर्माचा विध्वंस करण्यासाठीच भारतावर आक्रमण केले. त्यामुळे यापुढे हिंदु राष्ट्र अबाधित राखणे, हे प्रत्येक हिंदूचे दायित्व आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे राजनीतीचे हिंदूकरण होणे आवश्यक आहे. हिंदूंचे हित जपणारेच सत्तेत असायला हवेत. देशाचा राज्यकारभार करतांना हिंदुहिताचा दृष्टीकोन असला पाहिजे; कारण हिंदू कुणावर आक्रमण करत नाहीत. ते स्वभावत: न्यायप्रिय आणि समानतेचे पालन करणारे आहेत; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या म्हणण्यानुसार ‘सद़्गुण विकृती’ या दोषाला ते बळी पडले. आक्रमकांनी याचाच लाभ घेऊन देशावर आक्रमण केले. केवळ ‘हिंदुत्व’ हेच समानता राखणारे आहे. त्यामुळे हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण करणारे शासक असणे नितांत आवश्यक आहे. हिंदुत्वाचे रक्षण करणार्यांना राजकारणात स्थिर ठेवायला हवे. अशाच लोकांना बळ दिले पाहिजे. यासाठी राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण होणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आक्रमण होईल, त्याप्रमाणे उत्तर देण्यासाठी आपण समर्थ असायला हवे. लेखणीने आक्रमण झाले, तर लेखणीने उत्तर देण्याची क्षमता आपणामध्ये विकसित करणे आवश्यक आहे. आज हिंदूंवर वैचारिक आक्रमण होत आहे. यासाठी आज ‘वैचारिक’ क्षत्रियांची आवश्यकता आहे. या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी सावधान आणि संघटित रहायला हवे, असे प्रतिपादन श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले. ते ‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी हिंदूंना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘आपणाला प्रत्येक आक्रमणाचे उत्तर द्यायला हवे. त्यासाठी हिंदूंची बौद्धीक क्षमता जागृत करायला हवी. तशी क्षमता जागृत केली नाही, तर ‘अन्य धर्मियांवर अन्याय होत आहे’, अशा खोट्या प्रचाराला आपण बळी पडू. ही बौद्धिक क्षमता निर्माण करण्याचे काम हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत आहे, याचा मला आदर आहे.’’ या प्रसंगी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा त्रिकालदर्शीपणा’ या विषयावर सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद़्गुरु नंदकुमार जाधव आणि ‘भावी कार्याची दिशा’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनीही मार्गदर्शन केले.
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या जयघोषात संमत करण्यात आले धर्म आणि राष्ट्र हिताचे ठराव !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पार पडलेल्या ‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्म आणि राष्ट्र हिताचे विविध ठराव ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’च्या जयघोषात एकमुखाने संमत करण्यात आले. अधिवेशनाच्या ७ व्या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी या प्रस्तावांचे वाचन केले. धर्मावरील आघात आणि ते रोखण्यासाठीच्या उपाययोजना या दृष्टीने ७ दिवसांच्या या अधिवेशनामध्ये विचारमंथन करण्यात आले.
अधिवेशनात पारित करण्यात आलेले काहीही महत्त्वपूर्ण ठराव
1. अयोध्येत निर्माण होणारे श्रीराममंदिर हे हिंदूंसाठी धर्मशिक्षण देणारे व्हावे. येथील अन्य मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणेही आक्रमणमुक्त करून त्यांचा जीर्णोद्धार करावा. धार्मिक असंतोष टाळण्यासाठी अयोध्येत अन्य धर्मियांच्या धार्मिक बांधकामास अनुमती देऊ नये.
2. हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट 1991’ हा कायदा त्वरित रहित करून राममंदिराप्रमाणेच काशी, मथुरा आदींसारखी मोगल आक्रमकांनी बळकावलेली हिंदूंची हजारो मंदिरे आणि त्यांची भूमी हिंदूंच्या ताब्यात द्यावी.
3. सर्वांना समान अधिकार देण्यासाठी संविधानातील ‘सेक्युलर’ शब्द वगळून तेथे ‘स्पिरिच्युअल’ शब्द घालावा आणि भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे.
4. ‘नेपाळ हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, या नेपाळ येथील हिंदूंच्या मागणीचे हे अधिवेशन संपूर्ण समर्थन करते.
5. हिंदु समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन केंद्रशासनाने ‘संपूर्ण देशात गोवंश हत्या बंदी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ यांच्या संदर्भात निर्णायक कायदे संमत करावेत.
6. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंवरील अत्याचारांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि भारत शासन यांच्याद्वारे चौकशी करून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंना सुरक्षा द्यावी.
7. काश्मीर खोर्यात स्वतंत्र ‘पनून कश्मीर’ या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करून विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनश्च पुनर्वसन करण्यात यावे.
8. तामिळनाडूतील श्री नटराज मंदिराचे अधिग्रहण रहित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरातील मंदिरांचे शासकीय अधिग्रहण तत्काळ रहित करून मंदिरे भक्तांच्या हाती सोपवावीत.
9. केंद्रशासनाने तत्काळ ‘केंद्रीय नामकरण आयोगा’ची स्थापना करून देशभरातील नगरे, वास्तू, रस्ते, संग्रहालये इत्यादींना असलेली परकीय आक्रमकांची नावे बदलून त्यांचे मूळ नावानुसार नामकरण करावे.
10. ‘वेबसिरीज’च्या माध्यमातून हिंदु धर्म, देवता, संत आदींचा सातत्याने होत असलेला घोर अवमान, मोठ्या प्रमाणावर होणारा अश्लीलता आणि हिंसा यांचा प्रसार लक्षात घेऊन शासनाने ‘वेबसिरीज’ना ‘सेन्सॉर’ करावे. तसेच या माध्यमातून हिंदु धर्म आणि देवता यांच्या होणार्या अवमानाच्या विरोधात कठोर कारवाईसाठी विशेष कायदा त्वरित संमत करावा.
11. राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने भारतात आश्रय दिलेल्या रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवण्यासाठी सरकारने कायदा करावा.
12. देहली दंगलीचे सूत्रधार आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसेन, तसेच ‘सीएए’ आणि ‘एन्आर्सी’ या कायद्यांच्या विरोधात शाहीनबागसारखी हिंसक आंदोलने करणारे यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा.
13. गेल्या काही वर्षांत अहिंदूंच्या लोकसंख्येचा विस्फोट पहाता सर्व धर्मियांच्या लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी देशात त्वरित ‘जनसंख्या नियंत्रण कायदा’ लागू करण्यात यावा.
14. भारतात ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ आणि ‘एफ्.डी.ए.’ यांसारख्या शासकीय संस्था असतांना धार्मिक आधारावर ‘समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण करणारी ‘हलाल सर्टिफिकेशन’ची व्यवस्था त्वरित बंद करावी.
15. विरोधात कोणतेही पुरावे नसतांना कारागृहात खितपत पडलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठांवरील खटले चालवण्यासाठी ‘विशेष जलदगती न्यायालया’ची स्थापना करावी आणि निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना न्याय द्यावा.