Menu Close

उदयोन्मुख खलिफाचा भारतद्वेष !

काश्मीरच्या सूत्रावरून तुर्कस्तानच्या विश्‍वविद्यालयांमध्ये भारतविरोधी प्रचार चालू असल्याचे समोर आले आहे. तुर्कस्तान म्हटले की, आपल्याला आठवतात, ते घोरी, गझनवी, कुतुबुद्दीन ऐबक इत्यादी इस्लामी आक्रमक. ते तुर्कस्तानातून भारतात आले आणि त्यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून येथील धन लुटून नेले. त्यामुळे याच इस्लामी आक्रमकांच्या भूमीवर सध्या भारतविरोधी कारवाया चालत असल्याचे पुढे आल्यास आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. तुर्कस्तानशी निगडित आणखी एक कटू आठवण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात चालवलेली खिलाफत चळवळ. तुर्कस्तानचा सुलतान हा जगातील सर्व मुसलमानांचा प्रमुख म्हणून ओळखला जायचा; मात्र पहिल्या महायुद्धात त्याचा पराभव झाला आणि त्याचे साम्राज्य धुळीला मिळाले. याचा भारतातील मुसलमानांना राग आला आणि त्यांनी खिलाफत चळवळ राबवली. वास्तविक ही इस्लामिक चळवळ; मात्र मुसलमानांचा पुळका आलेल्या गांधींनी त्याला पाठिंबा दिला आणि समस्त हिंदूंनाही मुसलमानांना साहाय्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी या चळवळीला हिंदू-मुसलमान ऐक्याचा रंग देण्याचा खुळचट प्रयत्न केला. हे कधीच साकार झाले नाही उलट धर्मांधांमधील धर्मांधता आणखी बोकाळली. या खिलाफत चळवळीची स्मृती जागवण्याचा प्रयत्न करण्यास कारण की, तुर्कस्तानमध्ये आणखी एक स्वयंघोषित खलिफा उदयास येऊ पहात आहे. तो म्हणजे तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान. पाकला हाताशी धरून एर्दोगान यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भारतविरोधी खेळ चालवला आहे. हा खेळ त्यांच्यावर उलटवून त्यांना अद्दल घडवणे अपरिहार्य आहे.

एर्दोगान यांचा स्वार्थ !

तुर्कस्तानशी निगडित सर्व स्मृती हिंदूंना क्लेश देणार्‍या आणि नकोशा आहेत. ओटोमन साम्राज्यात झालेले पाशवी अत्याचार जगजाहीर आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधींच्या अहंकारापायी या साम्राज्याच्या सुलतानाचा खिलाफत चळवळीच्या वेळी भारताच्या भूमीत उदो उदो करण्यात आला. आज त्या खलिफाची जागा एर्दोगन घेऊ पहात आहेत. या साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर मुस्तफा कमाल पाशा यांनी तुर्कस्तानला ‘सेक्युलर’ बनवण्याचा प्रयत्न केला; मात्र मागील काही काळापासून तेथे धर्मांध कारवायांना ऊत आला आहे. यास एर्दोगन कारणीभूत आहेत. जगभरातील मुसलमानांचे नेतृत्व करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरवणे, तितकेसे सोपे नाही; कारण सध्या जगभरातील मुसलमानांच्या ‘श्रद्धा’ सौदी अरेबियाच्या राजघराण्यावर आहे. जगातील बर्‍याच जिहादी आतंकवाद्यांच्या संघटनांना अर्थपुरवठा करण्याचे कामही सौदी अरेबियातील धनाढ्य करत असतात. त्यातही तेलसाठ्यांमुळे सौदी अरेबिया श्रीमंत देश आहे. त्यामुळे सध्या तरी इस्लामी राष्ट्रांतील त्याचे स्थान अढळ आहे. या स्थानावर आरूढ व्हायचे असेल, तर एर्दोगान यांना प्रथम जगभरातील धर्मांध आणि जिहादी कारवाया करणार्‍यांना हाताशी धरावे लागणार आहे. पाक हे अशा लोकांचे माहेरघर. त्यात सौदी अरेबिया पाकला म्हणावे तसे साहाय्य करत नसल्यामुळे पाक बिथरला आहे. अशा पाकला जवळ करणे एर्दोगान यांना सोपे गेले. त्यात काश्मीर हा पाकचा ‘आवडता’ विषय. त्याला अनुसरून एर्दोगान यांनी पाकला जवळ करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून काश्मीरच्या सूत्रावरून पाकची बाजू घेतली. अलीकडेच एर्दोगान यांनी पाकचा दौरा केला. त्या वेळी काश्मीरसाठी लढणार्‍यांची तुलना त्यांनी ओटोमन साम्राज्याच्या बाजूने लढणार्‍या सैनिकांशी केली. सध्या तुर्कस्तानमधील विश्‍वविद्यालये ही भारतद्वेषाची केंद्रे बनली आहेत. प्रथम भारतातील मुसलमान तरुणांना शिष्यवृत्त्यांद्वारे पुढील शिक्षणासाठी तुर्कस्तानला बोलावले जाते. तेथे गेल्यावर त्यांना भारतविरोधी आणि पाकप्रेमी संस्थांशी जोडून त्यांचे ‘ब्रेनवॉश’ केले जाते. यांतील बर्‍याच संघटना या एर्दोगान यांच्या कुटुंबियांशी संबंधित आहेत. थोडक्यात भारतविरोधी कारवाया करण्यात एर्दोगान आणि कुटुंबीय रंगले आहे.

इतिहासातून शिका !

एर्दोगान यांच्या भारतद्वेषी कारवायांमुळे भारतानेही तुर्कस्तानच्या विरोधात आघाडी उघडली आहे. भारताने तुर्कस्तानचा कट्टर शत्रू असलेल्या आर्मेनियाला शस्त्रे पुरवण्याचा करार केला आहे. आर्मेनिया, ग्रीस आणि सायप्रस या तिन्ही देशांशी संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. या तिन्ही देशांचे तुर्कस्तानशी वाकडे असून त्याला रक्तरंजित युद्धाची पार्श्‍वभूमी आहे. भारताने तुर्कस्तानशी केलेले काही करारही मागे घेतले आहेत. तुुर्कस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारत काही पावले उचलत आहे, हे चांगलेच आहे; मात्र ते पुरेसे आहे का ? एर्दोगान यांचे सरकार भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनांना पैसे पुरवत होते, तसेच जमात-ए-इस्लामी यासारख्या भारतातील संघटनांनाही निधी पुरवत आहे. एका माहितीनुसार इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनाही तुर्कस्तान आर्थिक साहाय्य करत आहे. भारतात तुर्कस्तान अशा प्रकारे भारतविरोधी कारवाया करत असतांना भारतीय सुरक्षायंत्रणा झोपल्या होत्या का ? वास्तविक एका देशाचे सरकार भारतविरोधी कारवाया करण्यात गुंतले असतांना अशा देशाला जेरीस आणून सळो कि पळो करून सोडणे आवश्यक होते. तसे होत नसल्यामुळे तुर्कस्तानसारखे भारतापेक्षा आकाराने लहान असणारे देश नंतर वरचढ होतात आणि भविष्यात त्यांच्या कारवाया हाताबाहेर जातात. पाक, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ यांच्या संदर्भातही असेच झाले. त्यांना वेळीच आवर न घातल्यामुळे आज ते भारताला वाकुल्या दाखवत आहेत. इतिहासातून आपण काही शिकणार आहोत कि नाही ?

भारताकडे वक्रदृष्टीने पहाणार्‍यांचे काय हाल होतात, हे उदयोन्मुख खलिफाला आणि त्याचा बगलबच्चा असणार्‍या पाकला समजायला हवे. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास इस्लामी देशांमध्ये भारताचा दरारा निर्माण होईल !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *