नवी देहली : सर्व भाषांची जननी असणारी संस्कृत ही वैज्ञानिक आणि शास्त्रीय भाषा असल्यानेच आज अनेक देशात संस्कृतचे शिक्षण दिले जात आहे. जशी संस्कृत ही संगणकासाठी अत्यंत उपयुक्त भाषा आहे, त्याहून अधिक समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे. अनेक शारीरिक आणि मानसिक रोगांच्या उपचारासाठी संस्कृत भाषा उपयुक्त आहे. संस्कृत भाषेसारखे विपुल वाङ्मय आणि संपदा अन्य कोणत्याही भाषेत नाही. दुर्दैवाने आज संस्कृतला अत्यंत कनिष्ठ दर्जा दिला जात आहे. संस्कृत आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आज सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ३ ऑगस्ट या दिवशी ‘संस्कृत दिना’च्या निमित्ताने ‘संस्कृत का उदय’ या प्रसिद्ध ‘फेसबूक पेज’वर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना उद्बोधन करण्यासाठी निमंत्रित केले होते. त्या वेळी ते वरील मार्गदर्शन करत होते. सामाजिक माध्यमाद्वारे परिचय झालेले धर्मप्रेमी श्री. धर्मेंद्र दुबे यांनी या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. या वेळी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘संस्कृतचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व सोदाहरण विशद केले.
क्षणचित्र
मार्गदर्शनाला अनेक जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे मार्गदर्शन ५ सहस्र ५०० हून अधिक लोकांनी ‘फेसबूक’द्वारे प्रत्यक्ष पाहिले आणि २४ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत विषय पोचला (रिच). ‘संस्कृत का उदय’ या ‘फेसबूक पेज’ला ५ लाख ५० सहस्रांहून अधिक संस्कृतप्रेमी नियमित भेट देतात.
वैशिष्ट्यपूर्ण
१. या कार्यक्रमासाठी श्री. धर्मेंद्र दुबे यांच्या मातोश्री हिमाचल प्रदेशमधून जोडल्या होत्या. त्यांना ‘सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे मार्गदर्शन ऐकतच रहावे’, असे वाटत होते. तसेच मातोश्रींनी श्री. दुबे यांना ‘सद्गुरु डॉ. पिंगळे किती शालीन आहेत’, असे सांगितले.
२. मार्गदर्शन झाल्यावर श्री. दुबे पहिल्यांदाच सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्याशी भ्रमणभाषवर बोलले, तेव्हा ते कृतज्ञताभावात होते आणि भावविभोर झाले होते.