महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे प्रकरण
• पोलिसांवरही दगडफेक • २ पोलीस ठाण्यांची तोडफोड • पोलिसांच्या गोळीबारात २ दंगलखोर ठार
• काँग्रेस आमदाराच्या घरावर आक्रमण
• ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या नेत्यासह १५० जणांना अटक
• हिंसाचारामागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा सहभाग असल्याचा संशय
- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यास हिंदूंनी वैध मार्गाने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलीस त्याला वाटाण्याच्या अक्षता लावतात आणि गुन्हेगार मोकाट रहातो, तर दुसरीकडे धर्मांध त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर थेट कायदा हातात घेऊन पोलिसांवर आक्रमण करतात !
- स्वतःचे अन् पोलीस ठाण्याचेही रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? त्यामुळे जनतेने आता स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे !
- ‘भाजपच्या राज्यात धर्मांधांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असेल आणि पोलीस मार खात असतील, तर हिंदूंचे रक्षण कोण करणार ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात येत असल्यास आश्चर्य ते काय ?
- एरव्ही हिंदूंवर आगपखड करणारे तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, साम्यवादी धर्मांधांच्या या हिंसाचाराविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
बेंगळुरू (कर्नाटक) : ‘फेसबूक’वर महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे येथे धर्मांधांनी ११ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर प्रचंड हिंसाचार केला. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर आक्रमण करून घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली, तसेच २०० हून अधिक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न करणार्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले. येथील २ पोलीस ठाण्यांची तोडफोड करण्यात आली असून त्यात ६० हून अधिक पोलीस घायाळ झाले. अखेर पोलिसांनी हा हिंसाचार रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात २ दंगलखोर ठार झाले. या प्रकरणी पोलिसांनी ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या मुजम्मिल पाशा या नेत्यासह १५० जणांना अटक केली आहे, तसेच ही आक्षेपार्ह पोस्ट करणारे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या नवीन या नातेवाइकाला अटक करण्यात आली आहे. हिंसाचारामागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या हिंसाचारानंतर शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे. यानंतर परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
१. बेंगळुरू शहरातील डीजे हाल्ली आणि केजी हाल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा हिंसाचार झाला. पोलिसांच्या गोळीबारात घायाळ झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, अशी माहिती बेंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली.
२. फेसबूकवर पोस्ट प्रसारित झाल्यानंतर काँग्रेस आमदाराच्या घरावर शेकडोच्या संख्येने धर्मांधांनी दगडफेक केली. आमदाराच्या निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. येथे आग लावण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाची गाडी पोचू नये, यासाठी धर्मांधांनी गाडीचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. आक्रमणाच्या वेळी आमदार घरामध्ये नव्हते.
गेल्या २५ वर्षांत असे घडले नव्हते ! – मुख्यमंत्री येडियुरप्पा
‘११ ऑगस्टच्या रात्री हिंसाचारात पोलीस, पत्रकार आणि जनता यांच्यावर आक्रमण करण्यात आले. अशा चिथावणीखोर कृती आणि अफवा सरकार अजिबात सहन करणार नाही. गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल’, असे ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी केले. ‘मागच्या २५ वर्षांत असे घडले नव्हते’, असे सांगून त्यांनी जनतेला शांतता राखण्याचेही आवाहन केले आहे.
बेंगळुरू (कर्नाटक) येथील दंगल पूर्वनियोजित ! – कर्नाटकचे मंत्री रवि
बेंगळुरू (कर्नाटक) येथील हिंसाचाराचे प्रकरण
धर्मांधांकडून करण्यात येणार्या दंगली या नेहमीच पूर्वनियोजित असतात, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. धर्मांध दंगलीची सिद्धता करतात, तेव्हा गुप्तचर यंत्रणा झोपलेल्या असतात कि पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात ?
‘बेंगळुरू (कर्नाटक) येथे झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता. सार्वजनिक मालमत्तेची हानी करण्यासाठी पेट्रोल बॉम्ब आणि दगड यांचा वापर करण्यात आला. यात ३०० हून अधिक वाहने जाळण्यात आली’, अशी माहिती कर्नाटकचे मंत्री रवि यांनी दिली.
दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल करण्यात येईल ! – गृहमंत्री बोम्मई
गृहमंत्री बी.एस्. बोम्मई यांनी ‘या दंगलीची चौकशी करून दंगलखोरांकडून हानी भरपाई वसूल केली जाईल’, असे सांगितले.
काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांची गांधीगिरी
(म्हणे) ‘कुणाच्याही विरोधात तक्रार करणार नाही, देव त्यांना पाहून घेईल !’
धर्मांधांना वाचवण्यासाठी मूर्ती अशी विधाने करत आहेत, अशी शंका कुणालाही आल्यास चुकीचे काय ? कारण तक्रार केली, तर धर्मांध दुखावतील, याची जाणीव असल्यामुळेच काँग्रेसवाल्यांना देव आठवत आहे. हिंदूंची चुकून जर एखादा दगड भिरकावला असता, तर मूर्ती यांनी धर्मांधांना असाच सल्ला दिला असता का ?
स्वतःवर झालेल्या अन्यायालाही वाचा फोडू न शकणारे काँग्रेसचे लोकप्रतिनिधी कधी जनतेवरील अन्यायाला वाचा फोडतील का ?
काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती म्हणाले की, काही अज्ञातांनी माझ्या घराला आग लावली, तसेच घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले. पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे. जर एका आमदाराच्या बाबतीत असे होत असेल, तर सामान्य लोकांचे काय होत असेल ? तथापि मी याविषयी कुणाच्याही विरोधात तक्रार करणार नाही. देव त्यांना पाहून घेईल.’
कायदा हातात घेऊ नये ! – काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार
मी या हिंसाचाराचा निषेध करतो. कुणीही कायदा हातात घेऊ नये. सरकारने दंगलखोरांसह त्या व्यक्तीवरही कारवाई करावी, ज्याने आक्षेपार्ह पोस्ट केली होती, अशी प्रतिक्रिया कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात