Menu Close

जपानमध्ये भूकंप : ३२ ठार, १००० जखमी

कुमामोटो : दक्षिण जपानमधील २ जबरदस्त भूकंपांनंतर वादळी पाऊस होण्याची भीती आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भूकंपामुळे एका विद्यापीठातील डॉर्मेटरी आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्ससह अनेक इमारतीचे रूपांतर ढिगाऱ्यात झाले असून कित्येक लोक बेपत्ता झाले आहेत. मुख्य सचिव योशिहिदे सुगा यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्हाला अशा अनेक ढिगाऱ्यांची माहिती मिळाली आहे, जेथे शेकडो लोक जिवंत गाडले गेले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न पोलीस, प्रशासन करीत आहे. जवळपास ७० हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यात एका धरणाजवळील ३०० लोकांचा समावेश आहे.

कुमामारो हे पहाडी क्षेत्र असून दरडी कोसळल्याने तेथील पूर्ण गावांचा संपर्क तुटला आहे. या एका भागातच हजारावर लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या गुरुवारीच जपानमध्ये ६.२ एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्या भूकंपासाठी बचाव कर्मचारी गेले असतानाच हा नवीन भूकंप झाला. या भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. अर्थात या ज्वालामुखीचा आणि भूकंपाचा काहीही संबंध नसल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

कुमामोटो आणि आसपासच्या क्षेत्रात भूकंपाचे आणखी हादरे बसत आहेत. विशेष म्हणजे या भागात यापूर्वी कधीही असा शक्तिशाली भूकंप झाला नव्हता. गुरुवारच्या भूकंपाने जुनी घरे कोसळून ९ जण मरण पावले होते; पण शनिवारच्या भूकंपाने उटो शहराच्या नगर परिषदेच्या कार्यालयासह अनेक नवीन इमारती पडल्या. कुमामोटो येथेच ३२ जण मरण पावले असून १ हजार लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी १८४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *