जिल्ह्यातील युवा धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ ‘शौर्यगाथा’ व्याख्यानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाविषयी प्रबोधन
सिंधुदुर्ग : क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेताना स्वत:चे वय, शिक्षण यांचा विचार न करता केवळ देशाची म्हणजेच मातृभूमीची स्वतंत्रता एवढाच विचार केला होता. भारताला शौर्याचा इतिहास लाभला आहे. हेच शौर्य जागवून आणि क्रांतीकारकांचा आदर्श ठेवून आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपले योगदान दिले पाहिजे. एकाही क्रांतीकारकाचा इतिहास आपण विसरता नये. क्रांतीची प्रेरणा अखंड मनात साठवून ठेवूया. आपल्याला धर्मकार्य करायचे आहे. त्यासाठी भगवान श्रीकृष्ण शक्ती देणारच आहे. आपण उपासना करून ईश्वराचे भक्त बनूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले.
क्रांतीकारकांच्या त्यागाची युवकांना जाणीव करून देणे, युवकांमधील शौर्य जागृत करणे, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी जागृती करणे, युवा धर्मप्रेमींना राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कृतीप्रवण करणे, या उद्देशाने ‘स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ११ ऑगस्ट २०२० या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ ‘शौर्यगाथा’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला ७० युवा धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ पद्धतीने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा धुरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री. हर्षद खानविलकर यांनी युवकांना केलेले आवाहन
१. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ ऐका. हे राष्ट्रीय गीत सर्व युवकांपर्यंत पोचवा.
२. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी दिवसातून किमान १ घंटा वेळ द्या.
३. हिंदु राष्ट्राचे विचार मांडणारे ‘सनातन प्रभात’ नियतकालिक प्रत्येक घरापर्यंत पोचवा.
४. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी धर्मावरील आघातांविषयी समाजामध्ये जागृती करा.