सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. त्या अनुषंगाने घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कसा साजरा करावा ? असा प्रश्न सामान्यांसह गणेश मंडळांच्या प्रतिनिधींच्या मनात आहे. सध्या कोरोनाच्या वा तत्सम आपत्काळातही हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. ते पर्याय नेमके काय आहेत, तसेच अन्य दिशादर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यावर एका विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या संवादाचे सोमवार, 17 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 7 ते 8.30 या वेळेत ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांवरून थेट प्रसारण केले जाणार आहे.
या संवादाद्वारे गणेशभक्तांच्या मनात येणार्या पुढील प्रकारच्या प्रश्नांवर धर्मशास्त्रीय उत्तरे दिली जातील :
1. सध्या कोरोना महामारी असल्याने श्री गणेशचतुर्थीच्या ऐवजी माघी गणेशजयंतीला मूर्ती प्रतिष्ठापना करावी का ?
2. बाजारातून आणलेली मूर्ती ‘सॅनिटाइझ’ करावी का ?
3. कोरोना महामारीमुळे पुरोहितांना घरी बोलावण्यास मर्यादा आहेत. अशा स्थितीत काही ठिकाणी पुरोहित ‘ऑनलाईन’ माध्यमातून पूजा सांगणार आहेत. अशी ‘ऑनलाईन’ पूजा योग्य कि अयोग्य आहे ?
4. कोरोना महामारीच्या काळातील मूर्ती विसर्जनाची बंधने लक्षात घेऊन काय करावे ?
5. प्रदूषित नदीत मूर्तीविसर्जन करणे योग्य आहे का ?
या संवादात पर्यावरणतज्ञ श्री. विकास भिसे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे ‘फेसबूक लाईव्ह’ आणि ‘यू-ट्यूब लाईव्ह’ या माध्यमातून संबोधित करणार आहेत. तरी याचा नागरिक, गणेश मंडळांचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. या विशेष संवादाचे थेट प्रसारण पुढील ‘लिंक्स’वरून केले जाणार आहे.