हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झोकून देऊन कृती करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार
रामनाथी (गोवा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतीवर्षी धर्मप्रेमींना दिशादर्शन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशन’ आयोजित केले जाते. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीत हे अधिवेशन ‘ऑनलाईन’ पद्धतीने पार पडले. अधिवेशन ‘ऑनलाईन’ असले, तरी धर्मप्रेमींचा उत्साह तसूभरही अल्प नव्हता. देशाच्या कानाकोपर्यातून प्रतिदिन ६०० हून अधिक धर्मप्रेमी या अधिवेशनामध्ये सहभागी होत होते. आगामी आपत्काळ आणि युद्धकाळ यांच्या पार्श्वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झोकून देऊन कार्य करण्याचा निर्धार सहभागी धर्मप्रेमींनी व्यक्त केला.
अधिवेशनाच्या समारोपाच्या मार्गदर्शनात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी आगामी काळात नेतृत्वगुण, नियोजनक्षमता आणि निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ‘कार्य करतांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन आणि गुणांचा आध्यात्मिक स्तरावर विकास होणे आवश्यक आहे’, असे ते म्हणाले.
चार दिवस चाललेल्या या अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना’, ‘चांगला धर्मप्रेमी बनण्यासाठी काय करावे ?’, ‘साधना आणि आध्यात्मिक उपाय’, ‘सुराज्य अभियान’, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा ‘ऑनलाईन’ प्रसार आणि भावी काळाचे उपक्रम’, ‘आगामी आपत्काळाच्या दृष्टीने कौशल्यविकास’ आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
अधिवेशनाच्या समारोप सत्रात धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात मला निमित्तमात्र म्हणून जे दायित्व असेल, ते मी सेवाभावाने करीन !
आतापर्यंत मी जीवन नुसते व्यतित करत होतो; पण हिंदु जनजागृती समितीशी संपर्क झाल्यापासून मी खर्या अर्थाने ‘जीवन जगू लागलो’, असे वाटत आहे. अधिवेशनामध्ये दैवी गुण वाढवण्याच्या संदर्भात जे मार्गदर्शन मिळाले, ते ऐकून ते श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणेच आहे, असे वाटले. समितीशी जोडल्यापासून माझा आत्मविश्वास वाढला आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात मला निमित्तमात्र म्हणून जे दायित्व असेल, ते मी सेवाभावाने करीन. – श्री. भागवत एप्रे, पुणे, महाराष्ट्र.
मी ‘साधक’ आहे, हा भाव माझ्यामध्ये निर्माण झाला आहे !
हिंदु जनजागृती समितीशी संपर्क आल्यापासून माझ्या स्वभावामध्ये परिवर्तन झाले आहे. माझा चिडचिडेपणा न्यून होऊन स्वभाव शांत झाला आहे. पूर्वी मला धर्मकार्यासाठी निधी मागण्यासाठी संकोच वाटायचा; पण आता तसे वाटत नाही. मी एक ‘व्यापारी’ आहे, यापेक्षाही ‘साधक’ आहे, हा भाव माझ्यामध्ये निर्माण झाला आहे.
– श्री. धीरज भोळे, जळगाव, महाराष्ट्र.
धर्मकार्यातून आनंद मिळत आहे !
८-१० वर्षांपासून मी हिंदुत्वाचे कार्य करत आहे; पण गेल्या ८-१० मासांपासून हिंदु जनजागृती समितीशी जोडल्यापासून मला धर्मकार्याविषयी स्पष्ट दिशा आणि मार्गदर्शन मिळत आहे. गेल्या ३ मासांपासून मी साधना करण्याचा प्रयत्न करत आहे. आता धर्मकार्यातून आनंद मिळत आहे. माझ्याकडून होणारे प्रत्येक कार्य धर्म आणि राष्ट्र हिताचेच व्हावे, अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो.
– श्री. अनिल सोलुनकर, कर्नाटक
अधिवेशनाच्या माध्यमातून ‘सोशल मिडिया’चा प्रभावी उपयोग कसा करायचा, हे शिकायला मिळाले. मी माझ्या परीने हिंदु राष्ट्रासाठी मी संपूर्ण सहकार्य करीन.
– श्री. बिनिल सोमसुंदरम्, केरळ
हिंदु जनजागृती समितीशी संपर्क आल्यापासून धर्मकार्य करण्याची तळमळ वाढणे
पूर्वी केवळ मी व्यवसायामध्ये गुरफटलो होतो. हिंदु जनजागृती समितीशी संपर्क आल्यापासून माझी धर्मकार्य करण्याची तळमळ वाढली आहे. देवतांच्या झालेल्या विडंबनाच्या विरोधात एकदा मी पोलीस तक्रार केली. पोलिसांनीही माझ्या या प्रयत्नांचे कौतुक केले.
– श्री. दीपक केशरी, धनबाद, झारखंड.
माझ्या कौशल्यानुरूप मी धर्मकार्यात जे कार्य करू शकतो, ते दायित्व घेऊन करीन.
– श्री. दीपक तिवारी, लक्ष्मणपुरी, उत्तरप्रदेश