Menu Close

प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांच्या विज्ञापनातील भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर वगळले

भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीरला वगळणारे जावेद हबीब यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवा ! यामागे राष्ट्रविरोधी शक्तींचा हात नाही ना, याचेही शासनाने अन्वेषण करावे !

यापूर्वीही विज्ञापनातून हिंदु देवतांचे अवमानकारक चित्र केले होते प्रदर्शित !

मुंबई : प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांच्या केशकर्तनालयाच्या विज्ञापनात दाखवण्यात आलेल्या भारताच्या मानचित्रातून (नकाशातून) जम्मू-काश्मीर वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जावेद हबीब यांच्या भोपाळ येथील न्यू मार्केटमधील उषा प्रीत कॉम्प्लेक्समधील एक विज्ञापन सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे मानचित्र जम्मू-काश्मीरविना दाखवण्यात आले आहे.

यापूर्वीही जावेद हबीब यांच्या केशकर्तनालयाच्या एका विज्ञापनामध्ये हिंदूंच्या देवता केस कापण्यासाठी आल्याचे दाखवण्यात आले होते. याविषयी हबीब यांच्या विरोधात वाराणसीमध्ये गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या प्रकारानंतर हबीब यांनी सार्वजनिकरित्या क्षमा मागितली होती.

त्या वेळी क्षमा मागतांना त्यांनी ‘माझा कोणताही धर्म नाही. कात्री हाच माझा धर्म आहे. मी केवळ भारतीयत्व मानतो’, असा उल्लेख केला होता. या वेळी ‘हे विज्ञापन माझ्या साथीदाराने मला न दाखवताच प्रसारित केले’, असे सांगितले होते.

यानंतर आता पुन्हा हबीब यांच्या केशकर्तनालयाचे अशाप्रकारे देशाचा अवमान करणारे वादग्रस्त विज्ञापन प्रसारित करण्यात आले आहे. हे विज्ञापन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रसारित करण्यात आले असून यामध्ये १५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विशेष सवलत घोषित करण्यात आली आहे. हबीब हे प्रसिद्ध केशरचनाकार असून भारतभरात त्यांची ५०० हून अधिक केशकर्तनालये आहेत. (हिंदु देवता आणि भारताचे मानचित्र यांचा अवमान करणारे हबीब यांच्या केशकर्तनालयावर देशप्रेमी नागरिकांनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यांचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. चित्रपटसृष्टीतील बहुतांश कलाकार हबीब यांच्या केशकर्तनालयात येतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *