धर्मशास्त्रांत सांगितलेल्या ‘आपद्धर्मा’नुसार गणेशोत्सव साजरा करा ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
सध्या कोरोनामुळे बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. अशा वेळी धर्माचा अभ्यास न करता प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना आणि तथाकथित पुरोगामी ‘मनाला वाटेल ते’ पर्याय गणेशोत्सवाविषयी सुचवत आहेत. उदा. वनस्पतीचे बीज असलेला गणपती, पंचगव्य, तुरटी वा कागदी लगदा यांनी बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे; गणेशमूर्ती सॅनिटाईज करणे; गणेशमूर्ती रोप लावतो त्या कुंडीमध्ये, अमोनियम बायकार्बोनेटमध्ये, कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करणे; यंदा मूर्ती विसर्जन न करता पुढच्या वर्षी तिचे विसर्जन करणे आदीं धर्मशास्त्रसंमत नसलेले पर्याय सुचवले जात असल्याने गणेशभक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या अशास्त्रीय आवाहनांना गणेशभक्तांनी बळी न पडता धर्मशास्त्रात सांगितलेल्या ‘आपद्धर्मा’नुसार गणेशोत्सव साजरा करावा आणि श्रीगणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले आहे. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या विशेष परिसंवादात बोलत होते.
श्री. राजहंस पुढे म्हणाले की, ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच दळणवळण बंदी नसेल, तेथे नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करावा. संसर्गजन्य आणि प्रतिबंधित ठिकाणी आपद्धर्म (आपत्काळात धर्मशास्त्राला मान्य असलेली कृती) म्हणून आपल्या घरातील उपलब्ध गणेशाची मूर्ती अथवा गणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करावे; मात्र पूजन करतांना ‘पूजेतील ‘प्राणप्रतिष्ठापना’ हा विधी करू नये. 6-7 इंचाची लहान गणेशमूर्तीचे पूजन केल्यास ती उत्तरपूजेनंतर मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये विसर्जित करावी. त्यानंतर माती अन् पाणी तुळशी वृंदावन, औदुंबर, आपटा, शमी, वड आदी वृक्षाजवळ अर्पित करावे. गणेशमूर्ती मोठी असल्यास ती देवघराजवळ किंवा अन्य सात्त्विक ठिकाणी ठेवून श्राद्धपक्ष काळानंतर गर्दी नसतांना सर्व शासनाचे नियमांचे पालन करत वहात्या पाण्यात विसर्जित करावी.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, ‘10 किलोच्या कागदी लगद्यामुळे 1000 लिटर पाणी प्रदूषित होते. त्यामुळे वर्ष 2016 मध्ये ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने कागदी लगद्याच्या मूर्तींवर बंदी आणली. त्यामुळे पर्यावरणपूरक या गोंडस नावाखाली या मूर्तींचा प्रसार करणे नियमाबाह्य आहे. विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर केल्याने विविध शारीरिक व्याधी होत असल्याने हा पर्यायही अपायकारक आहे. लाखो रुपये खर्च करून कृत्रित हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती रात्रीच्या वेळी पुन्हा तलाव, नदी वा समुद्रातच विसर्जित केल्याचे अनेकदा उघड झाल्याने हा पैसा वाया घालवण्याचा प्रकार आहे. यापेक्षा गणेशभक्तांना तेलंगणा राज्य सरकारप्रमाणे वाहतुकीची तथा वाहत्या जलस्त्रोतात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.’ या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर म्हणाले, ‘वर्षातील 365 दिवस अब्जावधी लिटर अतिदूषित सांडपाणी व कारखान्यातील विषारी पाणी यांमुळे होणार्या प्रदूषणावर काही न बोलता गणेशोत्सवाच्या वेळी जागे होणार्यांना जाब विचारला पाहिजे. तर विशिष्ट ठिकाणी मूर्तीविसर्जनाचा दबाव आणणार्यांवर कायदेशीर कारवाईसाठी गणेशभक्तांनी तक्रार करावी.’ ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्यात आलेला हा परिसंवाद 37 हजार लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर एक लाख लोकांपर्यंत हा पोचला.