काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काळातील योजना महाविकास आघाडी करणार कार्यान्वित
- गुणवत्तेऐवजी धार्मिक आधारावर योजना राबवणे, ही राज्यघटनेतील ‘सर्वधर्मसमभाव’ या तत्त्वाची पायमल्ली होय !
- अल्पसंख्यांकांच्या नावाखाली बहुसंख्य हिंदूंवर आणखी किती पक्षपात केला जाणार आहे, असा प्रश्न हिंदूंना पडल्यास चूक ते काय ?
मुंबई : अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना राबवणार आहे. वर्ष २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शासनाच्या काळातील ही योजना महाविकास आघाडीचे शासन कार्यान्वित करणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील १०० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शासनाकडून निवड करण्यात आलेल्या या उमेदवारांना खासगी प्रशिक्षण संस्थेद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये न्यूनतम ३० उमेदवार असले, तरी या संस्थेला प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थी ३० असले, तरी प्रशिक्षकांसाठी तेवढेच वेतन देण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. वर्ष २००९ मध्ये ही योजना राज्य अल्पसंख्यांक आयोगाद्वारे राबवण्यात येणार होती. आता यामध्ये सुधारणा करून ती अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे राबवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी २ मास इतका असणार आहे. यामध्ये उमेदवारांना पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षेच्या पूर्वसिद्धतेसाठी मराठी भाषा, सामान्य ज्ञान, लेखी परीक्षा, मानचित्र अभ्यास, मुलाखत कौशल्य यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यांसह ‘फायरिंग’, दोरीने चढणे, गोळाफेक, लांब उडी आदी मैदानी चाचण्या, तसेच प्रथमोपचार, व्यक्तीमत्त्व विकास, आपत्ती निवारण व्यवस्थापन आदी प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
मुसलमान समाजातील उमेदवारांचा ७० टक्के समावेश
एकूण प्रशिक्षणार्थींची निवड करतांना ७० टक्के उमेदवार मुसलमान समाजातील, २० टक्के बौद्ध समाज, ४ टक्के ख्रिस्ती, ४ टक्के जैन, आणि शीख अन् पारसी या समाजातील प्रत्येकी १ टक्का उमेदवाराची निवड केली जाणार आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. याविषयी वर्ष २००९ मध्ये काढलेल्या शासकीय आदेशानुसार या योजनेसाठी २ कोटी १७ लाख २५ सहस्र रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. यातून प्रशिक्षणार्थींना दरमहा १ सहस्र ५०० विद्यावेतन, गणवेशासाठी १ सहस्र रुपये, प्रशिक्षकासाठी प्रतिमास १५ सहस्र रुपये आदी व्यय केला जाणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात