देशात नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काही समाजघटकांनी विशेषतः राजकारण्यांनी जनतेला शुभेच्छा देण्याच्या संदर्भात एक वेगळाच; पण तितकाच गंभीर प्रकार समोर आला. पहिल्या घटनेत गोवा प्रदेश महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी सामाजिक माध्यमांतून भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देणारी ‘पोस्ट’ प्रसारित करतांना त्यामध्ये भारताचा नकाशा (मानचित्र) काश्मीरविना दाखवला. दुसर्या घटनेत अलपुझा (केरळ) येथील काँग्रेसच्याच महिला आमदार शनिमोल उस्मान यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी फेसबूकवर ‘पोस्ट’ करून शुभेच्छा देतांना भारताच्या मानचित्रातून काश्मीरला वगळले. इतकेच नव्हे, तर या मानचित्रावर राष्ट्रध्वज आणि अशोक चक्र विभक्त केले. तिसर्या घटनेत प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांच्या केशकर्तनालयाच्या विज्ञापनात दाखवण्यात आलेल्या भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर वगळण्यात आले होते. यापूर्वीही जावेद हबीब यांच्या केशकर्तनालयाच्या एका विज्ञापनामध्ये हिंदूंच्या देवता केस कापण्यासाठी आल्याचे दाखवण्यात आले होते, ज्यासाठी नंतर त्यांना क्षमाही मागावी लागली होती. वरील सर्व घटनांतील समान धागा म्हणजे, हे सर्व जण अल्पसंख्य समाजातील आहेत. त्यात दोन्ही महिला या काँग्रेसच्या नेत्याही आहेत. आजपर्यंत काँग्रेसने स्वतःची उभी हयात अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यात घालवली. त्याआडून त्यांनी देशावर अनेक दशके राज्य केले. ‘अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे, त्यांचा आवाज दाबला जात आहे, लोकशाही धोक्यात आहे’, अशी ओरड काँग्रेस कायमच करत आलेली आहे; पण हे करत असतांना त्यांनी कधी वरील प्रवृत्तींना राष्ट्रकर्तव्याची जाणीव करून दिली आहे का ?, हे जनतेला कळले पाहिजे. ती करून दिली असती, तर आज असे चित्र पहायला मिळाले नसते. अशांना जाणीव करून देणे किंवा त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणे लांबच; पण हा उघडउघड राष्ट्रद्रोह करणार्यांना काँग्रेसने साधी समजही दिल्याचे ऐकिवात नाही. देशभरातील काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रतिमा कुतिन्हो आणि आमदार शनिमोल उस्मान यांचा एका शब्दानेही निषेध केलेला नाही. याचाच अर्थ ‘काँग्रेसींचाही काश्मीर वगळलेल्या या मानचित्रांना पाठिंबा आहे’, असा होतो.
काँग्रेसमुळेच भूभाग पाक आणि चीनकडे !
वास्तविक काँग्रेसमुळेच काश्मीरचा बराचसा भाग पाकने आणि चीनने गिळंकृत केला आहे. गेली ६ दशके काँग्रेसने हा भाग परत मिळवण्यासाठी काहीही केलेले नाही. जी काँग्रेस स्वतःच्या सत्ताकाळात देशाचा एवढा प्रचंड भूभाग शत्रूराष्ट्राकडे जाऊनही त्याविषयी अवाक्षर काढत नाही, ती काँग्रेस नकाशावरून देशाचा एखादा भूभाग वगळणार्या त्यांच्या नेत्यांविषयी कधी काही बोलेल का ?, हेसुद्धा एक सत्यच आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भाजपने भारतीय भूभाग चीनला दिल्याचा हास्यास्पद आरोप करत आहेत. तथापि स्वपक्षाच्या आमदारांनी नकाशातून संपूर्ण काश्मीरच पाकला देऊन टाकल्याच्या कृत्याविषयी राहुल गांधी गप्प का आहेत ?, हा खरा प्रश्न आहे. स्वतःच्या कृत्यासाठी कुतिन्हो यांनी क्षमा मागितली खरी; पण एवढ्या मोठ्या राष्ट्रद्रोहासाठी केवळ दोन शब्दांची क्षमा पुरेशी आहे का ?, याचाही विचार व्हायला हवा. आमदार उस्मान यांनी तर स्वतः अद्याप क्षमाही मागण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. याचा अर्थ ‘आपण चुकलो आहोत’, असे त्यांना वाटलेले नाही. जावेद हबीब यांनीही क्षमा मागितल्याचे ऐकिवात नाही.
हिंदु जनजागृती समितीकडून तक्रार प्रविष्ट
नकाशात काश्मीर न दाखवणे, म्हणजे ‘काश्मीर आपला नाही’, असे सांगण्यासारखे आहे. हा भाग शत्रूराष्ट्र पाकला देऊन टाकण्याचीच मनिषा यातून दिसून येते. असे लोक पाकिस्तानचे काम सोपे करत आहेत. नकाशातून काश्मीरचा भाग वगळल्याच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीने प्रतिमा कुतिन्हो आणि ‘जावेद हबीब हेअर स्टुडिओ’ यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. केरळच्या आमदार शनिमोल उस्मान यांच्या कृत्याविरुद्ध केरळमधीलच राष्ट्रप्रेमी श्री. बिनील सोमसुंदरम् यांनी ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर अॅक्ट’अंतर्गत मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करत आमदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खरे तर भाजप सरकारने अशांवर स्वतःहूनच कारवाई करणे अपेक्षित होते; परंतु भाजपच्या केवळ गोव्यातील एका नेत्याने कुतिन्हो यांचा निषेध केला. जावेद हबीब आणि शनिमोल उस्मान प्रकरणात मात्र भाजपने असा कुठलाही निषेध नोंदवल्याचे ऐकिवात नाही. नेमकी हेच वरील प्रवृत्तींना फावते आणि ते राष्ट्रद्रोही कृत्ये करत रहातात. भाजपच्या नेत्यांनी केवळ निषेध करणे किंवा टीका करणे अपेक्षित नाही, तर सरकारला संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी भाग पाडणे अपेक्षित आहे. आजवर पाठ्यपुस्तकांपासून व्यक्तींपर्यंत अनेक ठिकाणी देशाच्या नकाशातून काश्मीरचा भाग वगळल्याची चूक झाली आहे. तरीही आजपर्यंत एकावरही धडक कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. खरे तर केंद्रातील राष्ट्रवादी सरकारने हा राष्ट्रद्रोह कदापि सहन करता कामा नये; कारण तसे केले तर ‘एकीकडे आपणच स्वातंत्र्याच्या दिवशी देशासाठी बलीदान देणार्या क्रांतीकारकांना आदरांजली वहातो आणि दुसरीकडे देशाचा भूभाग शत्रूराष्ट्राला आंदण देण्याचा राष्ट्रद्रोह खपवून घेतो’, असे होईल. हा क्रांतीकारकांचा घोर अवमान आहे. कुणीही उठावे आणि कधी या देशाचा, कधी क्रांतीकारकांचा, तर कधी हिंदु देवतांचा अवमान करावा, हे चित्र सरकारी यंत्रणांना, तसेच देशवासियांना लज्जास्पद आहे. ते पालटायलाच हवे. राष्ट्र आणि धर्म यांच्याविरुद्ध कृत्ये करणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तरच अशी कृत्ये पुन्हा कुणी करू धजावणार नाहीत.