श्रावण मासाच्या सांगतेची वेळ आली आहे. चातुर्मास विविध सणांनी समृद्ध असतो. त्यामुळे श्रावण सरत आला, तरी पुढे गौरी-गणपति, नवरात्र, दिवाळी अशा सणांची पर्वणी आहे. सणांच्या माध्यमातून धर्माचरण अपेक्षित असते; परंतु हा मूळ हेतूच सध्या हरवत चालला आहे. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपतीचे मानवीकरण करण्यात येणार्या ‘पोस्ट’ मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरत आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच या कृती होतात. गेल्या मासातही याचे एक उदाहरण लक्षात आले होते. यंदाच्या नागपंचमीला ‘फेसबूक’च्या माध्यमातून एका हिंदूने नागपंचमी म्हणजे नागाचा वाढदिवस अशा संकल्पनेचे चित्र पोस्ट केले होते. त्यात त्याने नागाच्या वाढदिवसाला ‘भाईचा बर्थ डे’ अशी उपमा दिली होती. नागाला ‘भाई’ असे म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. एका पोस्टमध्ये तर नागाला ‘किंग’ असे संबोधण्यात आले होते. एका हिंदूने केलेल्या ‘पोस्ट’मध्ये म्हटले होते, ‘नागपंचमीच्या शुभेच्छांचे मला इतके ‘मेसेज’ आले की, आज गाडीने जाण्याऐवजी मी सरपटतच कार्यालयात आलो.’ सणाचे माहात्म्य काय आहे आणि आपण बोलतोय काय, हेही हिंदूंना आज कळेनासे झाले आहे. खेदाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या ‘पोस्ट’ वाचून त्याला ‘लाईक्स’ही पुष्कळ मिळतात; पण विरोध मात्र कुणीच करत नाही.
नागपंचमी या सणामागील धर्मशास्त्र समजून न घेता या सणाला नागाचा वाढदिवस म्हणणार्या हिंदूंंना नागदेवता, नागलोक आणि नागांची आराधना हे सर्व कसे कळणार ? नाग ही विष्णु आणि महेश यांच्याशी संबंधित देवता आहे. नागदेवता ही पृथ्वीचा मेरूदंड आहे. असे असतांना नागपंचमीच्याच दिवशी नागाची विटंबना करून त्याचे मानवीकरण करणार्यांवर नागदेवता कधीतरी कृपा करेल का ? हिंदूंनी आपले धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार आचरण केले पाहिजे. आपल्याला भगवंताने हिंदु धर्मात जन्माला घातले आहे. हा हिंदु धर्म किती महान आणि वैभवशाली आहे, हे धर्मशास्त्राचा अभ्यास केल्यासच कळू शकेल. प्रत्येक हिंदूला जन्मापासूनच धर्मशिक्षण मिळायला हवे, हे अत्यावश्यक आहे. नागपंचमीला ‘नागाचा बर्थ डे’ संबोधणारी पिढी आजची आहे. या पिढीचा आदर्श (?) घेऊन मोठी होणारी उद्याची पिढी भविष्यात नागपंचमी साजरी करील का ? कदाचित् तेव्हा ‘नागपंचमी’ हा सणच लुप्त झाला नसेल कशावरून ? इतकी भयंकर स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हिंदूंनी जागे व्हावे. धर्म जपणे आणि जोपासणे, हे केवळ अन् केवळ हिंदूंच्याच हातात आहे. नागपंचमीची एक प्रकारे विटंबना केली गेली. किमान गणेशोत्सवासारख्या यापुढील सणांच्या संदर्भात तरी असे होऊ नये, यासाठी हिंदूंनी धर्माभिमान अंगी बाणवून धर्मरक्षणासाठी सदैव सतर्क रहायला हवे !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात