चीनमधील प्राध्यापिका कायी शिया यांचा चीनला घरचा अहेर
बीजिंग (चीन) : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हाती अनियंत्रित सत्ता असल्याने चीन जगाचा शत्रू बनला आहे. त्यांची धोरणे देशाचा सर्वनाश करत आहेत, असा आरोप चीनच्या ‘सेंट्रल पार्टी स्कूल’मधून निलंबित करण्यात आलेल्या प्राध्यापिका कायी शिया यांनी केला. चीनमधील श्रीमंत आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या प्रशिक्षणासाठी चालू करण्यात आलेल्या ‘सेंट्रल पार्टी स्कूल’च्या कायी शिया या माजी प्राध्यापिका आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष हे ‘सेंट्रल पार्टी स्कूल’चे अध्यक्ष असतात. त्यामुळे कायी शिया यांची टीका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कायी शिया यांनी चीन सोडले आहे. जिनपिंग यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन’ने कायी शिया यांना निलंबित केले आहे. ‘कायी शिया यांच्या टीकेमुळे देशाच्या प्रतिमेला हानी पोचली असून त्यामुळे गंभीर राजकीय समस्याही निर्माण झाली आहे’, असे ‘सेंट्रल पार्टी स्कूल’कडून सांगण्यात आले आहे.
कारवाईच्या भीतीमुळे कुणी बोलत नाही !
‘चीनमधून बाहेर पडून मी खुश आहे. शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात चीनच्या प्रगतीची शक्ती उरली नाही. हे लोक चीनच्या विकासात अडसर बनले आहेत. केवळ मीच नाही, तर असे अनेक लोक आहेत, ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे आहे. जेव्हा आमचे मत मांडण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हता, तेव्हाच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. कम्युनिस्ट पक्षात अनेक अप्रसन्न लोक आहेत; परंतु कारवाईच्या भीतीने कुणीही बोलत नाही’, असा दावा सार्वजनिक धोरण तज्ञ असलेल्या कायी शिया यांनी ‘द गार्डियन’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केला.
जिनपिंग सर्व निर्णय घेत असल्याने त्यात चुका होतात !
कायी शिया पुढे म्हणाल्या की, जिनपिंग हेच सर्व निर्णय घेत असून त्यात आता चुका हा अनिवार्य घटक झाला आहे. जिनपिंग यांना ७ जानेवारीलाच कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी माहिती मिळाली होती; परंतु त्यांनी २० जानेवारीला ती सार्वजनिक केली. त्यांनी इतके दिवस वाट का पाहिली ? असाही प्रश्न कायी शिया यांनी उपस्थित केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात