Menu Close

स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीकडून गोव्यात क्रांतीकारकांविषयी ‘ऑनलाईन’ प्रदर्शनाचे आयोजन

पणजी : स्वातंत्र्यदिनानिमित्त गोव्यात पेडणे येथील विकास महाविद्यालय, बाळ्ळी येथील शासकीय माध्यमिक विद्यालय आणि काणकोण येथील मल्लिकार्जुन विद्यालय या विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी क्रांतीकारकांविषयीच्या ‘ऑनलाईन’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा १७५ हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी लाभ घेतला. या वेळी ‘गूगल मीट’ या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रदर्शन दाखवण्यात आले. भारतासाठी लढणारे विविध क्रांतीकारक आणि बालक्रांतीकारक यांची माहिती ‘गाथा शौर्याची’ या प्रदर्शनातून देण्यात आली, तसेच ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा’ या मोहिमेच्या अंतर्गत राष्ट्रध्वजाचे विविध माध्यमांतून होणारे विडंबन याविषयी जागृती करण्यात आली. ‘संपूर्ण प्रदर्शन खूप माहिती देणारे आणि इतिहासाविषयी अभिमान निर्माण करणारे आहे’, असा अभिप्राय अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

या वेळी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. वेदिका पालन म्हणाल्या, ‘‘आज भारत स्वतंत्र होऊन ७४ वर्षे झाली असली, तरी आपण खरोखरच स्वतंत्र आहोत का ? कारण लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेले स्वराज्य आज भारतात नाही. स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म यांविषयी आभिमान बाळगण्याऐवजी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आपण अजूनही वैचारिक गुलामगिरीत आहोत. ही वैचारिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजच्या युवा पिढीने आभिनेते, क्रिकेट खेळाडू यांच्याऐवजी क्रांतीकारकांचा आदर्श ठेवणे आवश्यक आहे. आपल्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात असून ते थांबवण्यासाठी सर्व युवकांनी पुढाकार घ्यायला हवा.’’

कार्यक्रमाविषयी अभिप्राय

श्रीमती शारदा देसाई, मुख्याध्यापिका, शासकीय माध्यमिक विद्यालय, बाळ्ळी – कार्यक्रम खूप छान झाला. १०० विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे स्वातंत्र्यासाठी बलीदान केलेल्या ज्ञात आणि अज्ञात अशा सहस्रो क्रांतीकारकांची माहिती मिळाली. युवा वर्गाला प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रम आवडल्याचे सांगितले. अशा प्रकारचे कार्यक्रम सर्व शाळांमध्ये आयोजित करून क्रांतीकारकांची माहिती सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन आणि कृतज्ञता !

श्रुती सूरज भैरेली – कार्यक्रम खरोखरच खूप चांगला होता. या वेळी मार्गदर्शन करणार्‍यांनी आम्हाला ‘राष्ट्रध्वजाचा मान कसा राखावा ?’, याविषयी सांगितले. स्वातंत्र्यलढा दिलेल्या नेत्यांची माहिती दिली. इतिहासातील काही सत्य गोष्टी आम्हाला ठाऊक नाहीत, त्या समजल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *