बांधकाम व्यावसायिकाने संकुल बनवण्यासाठी मंदिरासह हिंदूंची २० घरेही पाडली
धर्मांध असो कि बांधकाम व्यावसायिक, हिंदूंची मंदिरे पाडण्यात येतात आणि पाक सरकार आणि भारतातील निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !
कराची (पाकिस्तान) : येथील लायरी भागात स्वातंत्र्यापूर्वी बांधण्यात आलेले श्री हनुमान मंदिर पाडण्यात आले. मंदिरातील मूर्ती गायब करण्यात आली आहे. याशिवाय या मंदिराच्या आसपास रहाणार्या २० हिंदूंची घरेही पाडण्यात आली आहेत. येथे एक बांधकाम व्यावसायिक गृहसंकुल बांधत असल्याने हे मंदिर पाडण्यात आले. यासाठी स्थानिक प्रशासनाचे साहाय्य घेण्यात आल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. ‘या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे’, असे पोलीस आयुक्त अब्दुल करीम मेमन यांनी सांगितले. याविषयी पाक सरकारने आतापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
१. हिंदु समुदायाचे नेते मोहन लाल म्हणाले की, ‘एवढे सर्व होऊनही बांधकाम व्यावसायिक आम्हाला हा परिसर सोडण्याची धमकी देत आहे. यावर पोलीस आणि प्रशासन गप्प आहेत.’
२. स्थानिक नागरिक हिरालाल म्हणाले की, ‘बांधकाम व्यावसायिकाने आमची फसवणूक केली आहे. ‘संकुल उभारतांना मंदिराला कोणतीही हानी पोचणार नाही’, असे आश्वासन त्याने आम्हाला दिले होते, तसेच आम्हाला पर्यायी घरेही देण्यात येतील, असेही सांगितले होते.’
३. मंदिराचे पुजारी हर्सी रडत म्हणाले की, ‘आधी आमची घरे उजाड केली. आता मंदिरही पाडले. श्री हनुमानाची मूर्ती कुठे आहे ?, याविषयी आम्हाला कुणीही काहीही सांगत नाही.’
४. हरेश यांनी सांगितले की, ‘दळणवळण बंदीमुळे कुणालाही मंदिरात जाण्याची अनुमती नव्हती. त्याचाच अपलाभ घेऊन मंदिर पाडण्यात आले. आता हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले पाहिजे.’
मंदिर पाडल्याचा बलोच समुदायाकडून निषेध
मंदिर पाडण्याच्या घटनेचा या भागात रहाणार्या बलोच समुदायाने निषेध केला आहे. बलोच नेते इरशाद बलोच म्हणाले की, ‘या घटनेमुळे आम्ही अत्यंत दुःखी आहोत. आम्ही लहानपणापासून मंदिर पहात होतो. ते आमच्या वारसाचे प्रतीक होते.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात