-
पुणे महापालिका प्रशासनाचा भयंकर प्रताप !
-
मनसेचे शहर प्रमुख अजय शिंदे यांनी विरोध केल्यानंतर गणेशमूर्ती विसर्जनासाठीचे फिरते हौद काढून टाकले
पुणे महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कचरापेट्या उपलब्ध करणे हा श्री गणेशाचा अवमान आहे. नागरिकांना अशास्त्रीय रासायनिक पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कोट्यवधी रुपयांचे अमोनियम बायकार्बोनेट देणारी पुणे महापालिका विसर्जनासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकत नाही, हे तिला लज्जास्पद आहे.
पुणे : गणेशोत्सवानिमित्त दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून फिरत्या हौदांची सोय करण्यात आली; परंतु ही सोय नसून गणेशभक्तांची चेष्टाच करण्याचा पालिकेचा कारभार उघडकीस आला आहे. फिरते हौद निर्मितीसाठी पालिका प्रशासनाने चक्क कचरापेट्यांचा उपयोग केला आहे. येथील मनसेचे शहरप्रमुख श्री. अजय शिंदे यांनी यासंदर्भात सामाजिक प्रसारमाध्यमांतून पालिकेचा निषेध करत कचरापेटीची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. यापूर्वीही पालिका प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जनाविषयी घेतलेल्या ढिसाळ भूमिकेवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात सर्व नियम पाळून गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्यासाठी नागरिकांनी इच्छा व्यक्त केली असतांना त्यांना स्थानिक पोलीस प्रशासनाकडून रोखण्यात आले आणि त्यांना अकारण मनस्ताप झाला. त्यातच पालिका प्रशासनाने केलेल्या या गैरकारभाराने गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. श्री. अजय शिंदे यांनी घाटावर जाऊन हा प्रकार पत्रकारांसमोर उघड केल्यानंतर पालिका प्रशासनाने फिरते हौद काढून टाकले आहेत. मनसेचे प्रभागाध्यक्ष श्री. राकेश क्षीरसागर, मनसेचे शहर उपाध्यक्ष श्री. प्रल्हाद गवळी यांसह काही कार्यकर्त्यांनी नदीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करत ‘नागरिकांना वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी साहाय्य करणार’, असे जाहीरपणे सांगितले.
पिंपरी-चिंचवड येथे पत्रे लावून विसर्जन घाट बंद करून मूर्तीदान घेण्याचा अशास्त्रीय प्रकार
श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करणे ही धर्मशास्त्रीय कृती आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात सर्व नियम पाळून विसर्जन करण्यासाठी येणार्या नागरिकांना सोय उपलब्ध करून देण्याऐवजी प्रशासनाने बिर्ला रुग्णालयाजवळील घाट, रावेत घाट यांसह अन्य विसर्जन घाटांवरील नदीत उतरण्याचे रस्ते पत्रे लावून बंद केले आहेत. देवतांची मूर्ती दान घेणे ही अशास्त्रीय कृती असतांना ‘संस्कार प्रतिष्ठान’ या संघटनेने घाटांवर मूर्तीदान घेण्याचा उपक्रम चालवला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. मूर्तीदान घेतल्यानंतर त्या व्यवस्थित विसर्जित होणार का ? इतक्या मोठ्या प्रमाणात मूर्ती घेतल्यानंतर त्यांची पुन्हा विक्री करून भ्रष्टाचार होणार नाही ना ?, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या या कारभाराविषयी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
कचरापेटीपासून कृत्रिम हौद निर्माण करणे दुर्दैवी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
कचरापेटीपासून कृत्रिम हौद निर्माण करणे आणि नागरिकांना त्यात मूर्ती विसर्जनासाठी आवाहन करणे याहून दुर्दैवी काही नाही. सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून गणेशभक्त धर्माचरणासाठी नैसर्गिक स्रोतात वहात्या पाण्यात विसर्जन करणार असतील, तर त्यांना रोखणे हा त्यांचा धार्मिक अधिकार हिरावून घेण्यासारखे आहे. लोकप्रतिनिधींनी गणेशभक्तांच्या भावना लक्षात घेऊन ज्याप्रमाणे अन्य विसर्जनाच्या सोयी उपलब्ध केल्या, त्याचप्रमाणे सर्व नियम पाळून नैसर्गिक स्रोतांत विसर्जन करू इच्छिणार्या गणेशभक्तांना थेट विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.