Menu Close

डाव्यांची दादागिरी !

‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ या प्रकाशन संस्थेकडून देहली दंगलींवर प्रकाश टाकणारे ‘देहली रायट्स २०२० : दी अनटोल्ड स्टोरी’ (देहली दंगल २०२० : न सांगितलेली कथा) या पुस्तकाचे प्रकाशन मागे घेण्याची घोषणा केली आहे. नवी देहली येथे फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दंगलींविषयीची सत्य बाजू कथन करणारे हे पुस्तक असून हिंदुत्वनिष्ठ लेखकांनी त्याच्या पूर्ततेत सहभाग घेतला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नवी देहली येथे होणार होते आणि लेखिका मोनिका अरोरा, सोनाली चितळकर आणि प्रेरणा मल्होत्रा, तसेच भाजपचे नेते आणि माजी आमदार कपिल मिश्रा या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार होते. सामाजिक माध्यमांतून दबाव आल्यामुळे पुस्तक प्रकाशन मागे घेतले असे म्हटले जात आहे; मात्र यामागे मोठे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते.

‘ब्लूम्सब्युरी इंडिया’कडून याविषयी दिलेल्या निवेदनात ‘आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देत असलो, तरी आम्हाला समाजाप्रती असलेल्या दायित्वाचे सखोल भान आहे’, असे सांगितले आहे. येथे समाजाच्या म्हणजे ‘मुसलमान समाजा’च्या असे कदाचित् ‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ला म्हणायचे असावे; कारण याच प्रकाशन संस्थेने ‘शाहीन बाग : फ्रॉम अ प्रोटेस्ट टू अ मूव्हमेंट’ (शाहीन बाग : आंदोलनाकडून चळवळीकडे) हे दोन मुसलमान लेखकांनी लिहिलेले पुस्तक काही दिवसांपूर्वी मात्र प्रकाशित केले आहे.

पूर्वनियोजित देहली दंगल

देहली येथील दंगल पुष्कळ नियोजनपूर्वक घडवण्यात आली होती, हे आता त्याविषयी बाहेर येत असलेल्या माहितीतून लक्षात आले. या दंगलीमध्ये ५० हून अधिक जणांची हत्या करण्यात आली होती आणि हे बहुतांश हिंदूच होते. हिंदु परिवारांची कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती. अंकित शर्मा नावाच्या एका गुप्तचर खात्याच्या पोलिसाच्या अंगावर ४०० वार करून त्याचा मृतदेह नाल्यात टाकून देण्यात आला होता, तर आपचा नगरसेवक ताहीर हुसेन याच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये एका मुलीचे रक्ताने माखलेले कपडे सापडले आणि तिचा मृतदेही बाजूच्या नाल्यात टाकून देण्यात आला होता. ताहीर हुसेन याच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली. त्याने दिलेल्या स्वीकृतीत हुसेन याची भेट जे.एन्.यू.तील देशद्रोहाचे आरोप असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यासमवेत पी.एफ्.आय.च्या कार्यालयात झाली होती. त्यामध्ये खालिद याने हुसेन याला दंगलीसाठी आवश्यक ती सामग्री, तसेच पी.एफ्.आय., जामियाची समिती आणि अन्य मुसलमान संघटना इत्यादींकडून पैसे आणि अन्य साहाय्य देण्याचे मान्य केले होते, असे सांगितले आहे. या दंगलींसाठी आखाती देशांतून पैसा आला होता. ताहीर हुसेन याच्या अधिकोष खात्यात दीड कोटी रुपयांहून अधिक पैसा ओमान, कतार, संयुक्त अरब अमिराती, दुबई आणि सौदी अरेबिया येथून पाठवण्यात आला होता. हिंदूंना धडा शिकवण्यासाठीच दंगल करण्यात आली होती, असेही ताहिर हुसेनने मान्य केले आहे.

साम्यवादी आणि जिहादी यांचा दबाव

देहली येथील भीषण दंगलीचे खरे स्वरूप उघड करण्यासाठी लिहिलेल्या आणि हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडू पहाणार्‍या पुस्तकाचे प्रकाशनही भारतात होऊ दिले जात नाही, यावरून या दंगलींचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे लक्षात येते. पुस्तकाचे प्रकाशन मागे घेण्यात काही साम्यवादी आणि जिहादी विचारधारेच्या लोकांचा सहभाग आहे, असे समोर येत आहे. त्यांची नावे ठळकपणे सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत. साम्यवाद्यांचे शिक्षण, प्रकाशन क्षेत्र या ठिकाणी किती भक्कम पकड आहे, हे यातून दिसून येते. समाजाला माहिती देणारी प्रसारमाध्यमेही बर्‍याच अंशी साम्यवाद्यांच्या नियंत्रणात होती, काही अजूनही आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षणक्षेत्रावर साम्यवाद्यांचा प्रभाव ५० हून अधिक वर्षे राहिला. साम्यवादी आणि कट्टर इस्लामी यांनी पुस्तकांची अशा प्रकारे रचना केली की, त्यातून भारताचा आजपर्यंतचा इतिहास झाकोळला गेला आणि अत्याचारी, क्रूर अशा मोगलांचा इतिहास बहुसंख्यांकांच्या माथी मारण्यात आला. भारतीय राजांच्या पराक्रमाचा दैदीप्यमान इतिहास शिकण्यास न मिळाल्यामुळे जे.एन्.यू. युनिव्हर्सिटीतून बाबर आणि अकबर यांचे गुणगान करणारे अफझल निर्माण झाले आहेत. त्यांच्यात भारतीय संस्कृती, सभ्यता यांच्याविषयी जाण तर सोडाच प्रचंड घृणाच भरल्याचे निदर्शनास येते.

कारसेवकांना जिवंत जाळल्यानंतर गुजरात येथे मोठी दंगल उसळली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त यांची हानी झाली. साम्यवादी प्रसारमाध्यमांनी न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन यासाठी हिंदु राष्ट्रवादी नरेंद्र मोदी यांनाच उत्तरदायी ठरवून त्यांची मोठ्या प्रमाणात मानहानी केली, हिंदुत्वनिष्ठांच्या विरुद्ध अपप्रचार केला; मात्र सत्य फार काळ झाकोळले जाऊ शकत नाही, ते बाहेर येतेच. त्याप्रमाणे धर्मांधांनी कारसेवकांनी मारण्यासाठी किती जय्यत सिद्धता केली होती, हे उघड झाले होते.

राष्ट्रप्रेमींचे प्रत्युत्तर !

‘ब्लूम्सब्युरी इंडिया’च्या दमननीतीच्या विरोधात राष्ट्रप्रेमींकडून सामाजिक माध्यमांवर आवाज उठवण्यात येत आहे. अनेक राष्ट्रप्रेमी लेखकांनी त्यांची ‘ब्लूम्सब्युरी इंडिया’कडून प्रकाशित होणारी पुस्तके मागे घेतली आहेत आणि पुन्हा या प्रकाशन संस्थेकडून कोणतेही पुस्तक प्रकाशित न करण्याची घोषणा केली आहे. हे एक चांगले पाऊल म्हणावे लागेल. पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वर्ष १८५७ मध्ये झालेल्या भारतियांच्या उठावाविषियी ‘भारतियांचा स्वातंत्र्यलढा’ या नावाचे पुस्तक लिहिले; मात्र ब्रिटिशांनी त्यावर प्रकाशनापूर्वीच बंदी घातली. त्याच गोष्टीची आज आठवण होत आहे. बहुसंख्य हिंदू असूनही हिंदुहिताच्या गोष्टी करण्यास बंदी येणे, हे संतापजनक आहे. त्यामुळे हिंदूंचे हित जपणार्‍या हिंदु राष्ट्राची मागणी हिंदूंनी का करू नये ? तो हिंदूंचा अधिकार आहे आणि हिंदू ते साध्य करतीलच, हे साम्यवादी आणि जिहादी यांना निक्षून सांगण्याची हीच वेळ आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *