सर्वत्र गणरायाचे आगमन झाले असून वातावरण उल्हासित आहे. श्री गणेशचतुर्थीच्या आधीपासूनच सर्वांच्या उत्साहाला उधाण येते. हे सर्व चांगले असले, तरी गणेशोत्सवाच्या काळात अज्ञानामुळे वा कळत-नकळत श्री गणेशाचा अवमान होतो. गणेशचतुर्थीपूर्वी सामाजिक माध्यमांत प्रसारित होणार्या ‘पोस्ट’मधून श्री गणेशाचे मानवीकरण केल्याचे लक्षात आले. ‘श्री गणेश पृथ्वीवर येणार, तेव्हा शिव-पार्वती, कार्तिकेय त्यांना निरोप देत आहे’, अशी एक कविता ‘पोस्ट’मध्ये प्रसारित करण्यात आली होती. एका ‘पोस्ट’मध्ये ‘पार्वती श्री गणेशाला पृथ्वीवर कोरोना असल्याने विविध सूचना देत आहे’, असे दाखवले आहे. श्री गणेशाचे हे मानवीकरण सर्वथा अयोग्य आहे. श्री गणेश ही देवता असून गणेशोत्सवाच्या काळात तिचे माहात्म्य समजून घेणे, श्री गणेशाची भक्ती करणे अभिप्रेत आहे. नागपूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेशाला डॉक्टरांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. हेही श्री गणेशाचे विडंबनच आहे. कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी देवाला भक्तीभावाने प्रार्थना करणे अपेक्षित आहे. असे असतांना कल्पकतेच्या नावाखाली देवाचे मानवीकरण केल्यास श्री गणेश संकट दूर होण्यासाठी कधीतरी कृपा करील का ?
गणेशोत्सवाच्या काळात वाहिन्यांवर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदाही एका वृत्तवाहिनीने श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्याची स्पर्धा आयोजित करून त्यात विविध कलाकारांना सहभागी करून घेतले. या स्पर्धेत कणीक, धान्य आणि अन्य साहित्य अशा प्रकारच्या वस्तूंपासून श्री गणेशाची मूर्ती साकारण्यात आली. धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्ती शाडू मातीचीच असायला हवी, तरच तिचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. मूर्ती सुबक, तसेच रेखीव नसल्यास त्यातून अयोग्य स्पंदने प्रक्षेपित होतात, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे वृत्तवाहिन्यांनी अशा स्पर्धा आयोजित करणे टाळायला हवे; कारण सध्या कलाकारांचे अनुकरण करण्याचा पायंडा समाजात पडला आहे. त्यामुळे शास्त्रविरोधी संकल्पना समाजात पसरवल्या जातात. यातून श्री गणेशाचा अवमान केल्यासारखेच आहे.
गणपतीला मोदक प्रिय आहेत. मोदक हे आनंदाचे प्रतीक आहे. हे सर्व आताच्या पिढीला क्वचित्च ठाऊक असेल; कारण सध्या चॉकलेटचा मोदक, आंब्याचा मोदक, ‘जम्बो’ मोदक आदी प्रकारांमुळे मूळ धर्मशास्त्र समजण्यापासून आताची पिढी वंचित रहात आहे. धार्मिक घटकांचे व्यावसायिकरण झाले आहे. थोडक्यात समाजाला धर्मशिक्षण नसल्याने दिवसेंदिवस गणेशोत्सवातील भक्तीभाव हरवत चालला आहे. यामुळे मनुष्य देवतांच्या कृपेपासून दूर जात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने वेळीच समाजाला धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करायला हवी !
– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात