नवी देहली : ‘देल्ली रायट्स २०२० : द अनटोल्ड स्टोरी’ (देहली दंगल २०२० : न सांगितलेली कथा) या पुस्तकाचे प्रकाशन डाव्या आणि इस्लामवाद्यांच्या दबावाखाली प्रकाशक ‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ने मागे घेतल्यानंतर आता ‘गरुड प्रकाशन’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.
अधिवक्ता मोनिका अरोरा, सोनाली चितळकर आणि प्रेरणा मल्होत्रा यांनी हे पुस्तक लिहिले आहे. लेखकांनी केलेले संशोधन आणि घेतलेल्या मुलाखती यांवर आधारित हे पुस्तक पुढील मासात प्रकाशित होणार होते. आता ते अंकुर पाठक यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रांत सानू यांनी स्थापना केलेल्या ‘गरुड प्रकाशन’ हे भारतीय प्रकाशनगृह प्रकाशित करणार आहे.
पुस्तकाच्या लेखिका अधिवक्ता मोनिका अरोरा यांनी सांगितले की, ‘लोकांच्या मागणीनुसार या पुस्तकाचे प्रकाशन आता ‘गरुड प्रकाशन’ करणार आहे. ‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ने केवळ दूरभाष करून लेखकांना माहिती दिली की, ‘पुस्तक मागे घेण्यात आले आहे.’ तथापि करार संपुष्टात आणण्यासाठी औपचारिक पत्र पाठवले नाही.’ हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदी या भाषांत प्रकाशित होणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात