यज्ञाच्या नावाखाली प्राण्यांची हत्या होत असल्याची आणि पुरोहितांविषयी द्वेष पसरवणार्या माहितीचा धड्यात समावेश होता !
कर्नाटकचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांची माहिती
अशा प्रकारचा धडा पुस्तकात घेणार्या संबंधितांवरही कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे इतरांवर वचक बसेल अन्यथा अशा प्रकारचे धडे येतच रहातील !
उडुपी (कर्नाटक) : कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली. या धड्याविषयी शहरातील श्रीकृष्ण मठाचे ईशप्रियतीर्थ यांनी त्यांचा आक्षेप सचिवांकडे नोंदवला होता. (संत-महंतांना धर्महानी रोखण्यासाठी पुढे यावे लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
काय आहे या धड्यात ?
१. वेदोत्तर काळात यज्ञ-यागाच्या नावाखाली शेतीसाठी उपयोगी असणार्या प्राण्यांची हत्या करण्यात येत होती. (यज्ञात प्राण्यांची हत्या होत असल्याचा कुठेही उल्लेख नाही. हिंदु धर्मात सांगितलेल्या यज्ञकर्माविषयी अशी धादांत चुकीची माहिती अंतर्भूत करणार्यांना कारागृहात डांबा ! यावरून ‘कर्नाटक शिक्षण मंडळात हिंदुद्वेष्ट्यांचा भरणा आहे’, असे म्हणण्यास वाव आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे आहार धान्याचे उत्पादन न्यून झाले.
२. ‘यज्ञ-यागामुळेच मुक्ती मिळते’, अशा श्रद्धेने जनसामान्यांच्या मनात घर केले होते. ‘संस्कृत’ नावाच्या पुरोहितांच्या भाषेत हे सर्व होत असल्याने सरळ मार्गाने मुक्ती प्राप्त करण्यासाठी नवीन धर्माची लोकांना अपेक्षा होती’, असे या धड्यात लिहिण्यात आले होते. (यावरून संस्कृत ही केवळ ब्राह्मणांपुरती मर्यादित भाषा होती, हे येथे दाखवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. यावरून संस्कृत आणि ब्राह्मण यांच्याविषयी कशा प्रकारे द्वेष पसरवला जातो, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात