वर्षभर नदी प्रदूषणासाठी काही न करणार्यांचा केवळ गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत असल्याचा कांगावा !
कोल्हापूर : कोल्हापूर येथील ‘झंवर उद्योग समूह’ आणि ‘टिम गणेशा’ यांच्या वतीने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या घरगुती श्री गणेशमूर्ती अमोनियम बायकार्बोनेट वापरून घरीच विसर्जित कराव्यात, असे हिंदु धर्मविरोधी आवाहन करण्यात आले आहे. यासाठी २६ ऑगस्ट या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथील एका दुकानात ‘अमोनियम बायकार्बोनेट’चा पुडा विनामूल्य उपलब्ध करून देऊन ‘नागरिकांनी येऊन घेऊन जावे’, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ, श्री गणेशभक्त, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी तीव्र विरोध दर्शवला. या संदर्भात निषेध नोंदवणारे दूरभाष ‘टिम गणेशा’च्या कार्यकर्त्यांना करण्यात आले. (‘अमोनियम बायकार्बोनेट’चा पाण्याशी संपर्क आला की, अमोनिया हा वायू निर्माण होतो. तो घसा, श्वसननलिका, त्वचा, तसेच डोळे यांना हानीकारक आहे. या रसायनाची ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’सह रासायनिक प्रक्रिया झाल्यावर ‘कॅल्शियम कार्बोनेट’ म्हणजे चुना आणि ‘अमोनियम सल्फेट’ हे पदार्थ सिद्ध होतात. त्यांपैकी ‘अमोनियम सल्फेट’ हे खत म्हणून वापरू शकतो, असे सांगितले जाते; पण ते ‘अॅसिडिक’ आहे आणि तीव्र मात्रेत असल्याने बागेतील झाडांना ते हानीकारक ठरू शकते ! एकीकडे केंद्रस्तरावर सेंद्रीय खतांचा वापर करावा, असे सांगितले जाते, तर दुसरीकडे कथित पर्यावरणवादी रासायनिक खते वापरा असे म्हणतात, हे अनाकलनीय आहे ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
या संदर्भात काही हिंदुत्वनिष्ठांनी केलेले प्रबोधन
शिवसेनेचे कागल शहरप्रमुख किरण कुलकर्णी यांच्या प्रबोधनानंतर ‘टिम गणेशा’चे सदस्य अतुल इंगळे यांच्याकडून चूक मान्य !
या संदर्भात शिवसेनेचे कागल शहरप्रमुख किरण कुलकर्णी यांनी दूरभाष करून ‘टिम गणेशा’चे सदस्य अतुल इंगळे यांचे प्रबोधन केले. ‘अमोनियम बायकार्बोनेट’चा वापर करून आपण कशाप्रकारे धर्मद्रोह करत आहोत, हे श्री. कुलकर्णी यांनी इंगळे यांच्या लक्षात आणून दिले. यामुळे इंगळे यांनी चूक मान्य करत ‘अमोनियम बायकोर्बोनेट’चे वितरण थांबवत असल्याचे मान्य केले, तसेच ‘भाविकांना देण्यात आलेले पुडेही परत घेण्याचा प्रयत्न करतो’, असेही सांगितले.
मुसलमानांंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते, त्या वेळी तुमचे सदस्य कुठे असतात ? – शिवसेनेचे करवीर उपतालुकाप्रमुख डॉ. अनिल पाटील यांचा परखड प्रश्न
या संदर्भात दिंडनेर्ली येथील शिवसेनेचे करवीर उपतालुकाप्रमुख डॉ. अनिल पाटील यांनी ‘टिम गणेशा’चे सदस्य प्रशांत मंडलिक यांचे प्रबोधन केले. या संदर्भात डॉ. अनिल पाटील म्हणाले की, साखर कारखान्यांची रासायनिक मळी नदीत जाते, तेव्हा तुमचे सदस्य काय करतात ? मुसलमानांच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते, तेव्हा तुम्ही कुठे असता ? हिंदूंच्या सणांवरच तुमचे लक्ष का ? रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हे विडंबन आहे, असे परखड प्रश्न उपस्थित केल्यावर प्रशांत मंडलिक निरुत्तर झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात