हिंदूंनो, या यशाविषयी श्रीगणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !
कोल्हापूर : कोल्हापूर येथील ‘झंवर उद्योग समूह’ आणि ‘टिम गणेशा’ यांच्या वतीने ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती श्री गणेशमूर्ती ‘अमोनियम बायकार्बोनेट’ वापरून घरीच विसर्जित कराव्यात’, असे हिंदु धर्मविरोधी आवाहन करण्यात आले होते. यासाठी शहरातील एका दुकानात भाविकांना विनामूल्य ‘अमोनियम बायकार्बोनेट’ उपलब्ध करून देण्यात आले होते. याला २६ ऑगस्ट या दिवशी विविध गणेशभक्त, हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना, कार्यकर्ते, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी दूरभाषद्वारे तीव्र विरोध नोंदवला. प्रारंभी ऐकण्यास सिद्ध नसलेल्या ‘टिम गणेशा’च्या सदस्यांनी हिंदूंच्या वाढत्या विरोधामुळे अखेर ‘अमोनियम बायकार्बोनेट’चे वितरण थांबवले.
या संदर्भात २६ ऑगस्ट या दिवशी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, अधिवक्ता प्रकाश खोंद्रे, शिवसेनेचे करवीर उपतालुकाप्रमुख डॉ. अनिल पाटील, शिवसेनेचे कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी यांसह हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांसह अनेकांनी भ्रमणभाष करून या उपक्रमास विरोध दर्शवला होता. ‘टिम गणेशा’च्या वतीने २६ ऑगस्ट या दिवशी एका दुकानात ‘अमोनियम बायकार्बोनेट’ विनामूल्य घेऊन जाण्यासाठी ठेवण्यात आले होते; मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या वाढत्या विरोधामुळे ‘टिम गणेशा’च्या सदस्यांनी ‘अमोनियम बायकार्बोनेट’ तेथून काढून घेतले.
(हिंदूंनी वैध मार्गाने विरोध केल्यास ‘अमोनियम बायकार्बोनेट’च्या माध्यमातून होणारी धर्महानी कशाप्रकारे रोखता येते, याचे हे आदर्श उदाहरण आहे ! याचप्रकारे गणेशभक्तांनी त्यांच्या परिसरात विविध मार्गांनी होणारे श्री गणेशाचे विटंबना रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
‘झंवर उद्योग समूह’ आणि ‘टिम गणेशा’ यांच्या वतीने करण्यात आलेले हिंदु धर्मविरोधी आवाहन
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात