हिंदुत्वनिष्ठांचा विरोध
चिपळूण : येथील ५ दिवसांचे श्री गणेशमूर्ती विसर्जन होत असतांना नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कोरोना महामारीचे कारण देत काही ठिकाणी कृत्रिम हौद आणि निर्माल्य जमा करण्यासाठी मंडप बांधण्यात आले आहेत. याशिवाय काही भागांतून गाडीतून फिरते कृत्रिम हौद आणि श्री गणेशमूर्ती जमा केल्या गेल्या. आजही नगरपरिषदेने कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्या गाड्यांचा वापर हिंदूंनी श्रद्धेने पूजलेल्या श्री गणेशमूर्तींच्या वाहतुकीसाठी शहरातील पाग परिसर आणि अन्य ठिकाणी केला. नगरपरिषदेच्या कृत्रिम हौद मंडपाच्या ठिकाणी विसर्जनासाठी येणारे आणि कर्मचारी यांच्याकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन केले जात नव्हते.
आजही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते नगरपरिषद प्रशासनाने विसर्जनासाठी वापरण्यात येणार्या कचरा गाडीच्या वापराविषयी विरोध दर्शवण्यासाठी नगरपरिषदेत गेले होते; मात्र मुख्याधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
प्रशासनाने आमचे मत विचारत घेतले नाही ! – एका नगरसेविकेची माहिती
एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या महिला पदाधिकार्यांनी ‘कचरा वाहतुकीच्या गाडीचा वापर का केला जात आहे ?’, असे नगरपरिषदेच्या कर्मचार्यांना विचारल्यावर त्यांनी ‘या गाड्या स्वछ धुवून वापरल्या जात आहेत’, असे त्यांना सांगितले. एका पक्षाच्या नागरसेविकेने ‘प्रशासनाने आमचे मत विचारात न घेता हा निर्णय घेतला असून येत्या बैठकीत आम्ही याविषयी प्रशासनाला विचारू’, असे उत्तर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना दिले.
कृत्रिम हौद विसर्जन’ ही हिंदूंच्या धर्मशास्त्राची चेष्टा ! – धर्मप्रेमींची प्रतिक्रिया
विसर्जनासाठी कृत्रिम हौदाचा वापर प्रशासनाने केवळ देखाव्यासाठी केला. भाविक त्यांना देत असलेल्या मूर्तींचा केवळ लाकडी पाट पाण्यात भिजवून मूर्तींचे विसर्जन हौदात न करताच त्या कचर्याच्या गाडीत ठेवण्यात येत होत्या. त्यामुळे ‘कृत्रिम हौद विसर्जन’ ही केवळ नगरपरिषद प्रशासनाने हिंदूंच्या धर्मशास्त्राची केलेली चेष्टा आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया धर्मप्रेमींनी या वेळी व्यक्त केली. ‘कृत्रिम हौद संकल्पनेसाठी नगरपरिषदेने मग लाखो रुपये खर्च कशासाठी केला ?’, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात