ग्वाल्हेर येथील ‘आय.टी.एम्.’ महाविद्यालयामध्ये ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवनाचे रहस्य’ विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) : सध्या कोरोना महामारीमुळे अभ्यास, नोकरी यांविषयी युवकांच्या मनात भविष्याची चिंता असणे स्वाभाविक आहे. तणावामुळे शारीरिक व्याधी, तसेच अभ्यास आणि दिनचर्या यांवरही परिणाम होतो. निराशेमुळे काही युवक व्यसनाच्या आहारी जातात. अशा विपरित चक्रातून बाहेर पडण्यासाठी युवकांनी स्वयंसूचना आणि अध्यात्म यांचा आधार घ्यावा. स्वयंसूचनेमुळे मन सकारात्मक होऊन आपण तणावमुक्त होऊ शकतो. अध्यात्म मनाला सकारात्मक ठेवते आणि आनंदी जीवन जगायचे शिकवते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथील आय.टी.एम् महाविद्यालयाच्या वतीने ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवनाचे रहस्य’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला संबोधित करतांना ते बोलत होते. या व्याख्यानाचा लाभ १७० विद्यार्थ्यांनी घेतला.
या व्याख्यानासाठी ‘राष्ट्रीय सेवा योजने’चे प्रमुख तथा महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) विभागाचे साहाय्यक प्रा. नरेंद्रकुमार वर्मा यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे संचालन कंपनी सेक्रेटरी विभागाच्या प्राध्यापिका सौ. अर्चना तोमर यांनी केले. सूत्रसंचालन कु. अनुष्का राजपूत हिने, तर समन्वय कु. नीती खांडेकर हिने केला. या वेळी प्रा. वर्मा म्हणाले, ‘‘तणावामुळे विद्यार्थी डगमगून जातात. आपण शिकण्याचा भाग ठेवला, तर सकारात्मक स्थितीत राहू शकतो. आम्हाला बरेच काही शिकायचे आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये असे कार्यक्रम नेहमी घेतल्यास आमच्या मुलांना योग्य दिशेने जाण्याची प्रेरणा मिळेल.’’ कार्यक्रमानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांनी शंकानिरसन करून घेतले.
बुद्धीअगम्य गोष्टींचे उत्तर केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
फळ खाली पडतांना आपण सर्वच जण पहातो; परंतु न्यूटनच्याच मनात ‘हे गुरुत्वाकर्षण आहे’, असा विचार का आला ? ‘पृथ्वी वस्तूंना गुरुत्वाकर्षणाने स्वत:कडे ओढते’, हा सिद्धांत त्यालाच का लक्षात आला ? त्सुनामी किंवा भूकंप यांसारख्या संकटाच्या वेळी प्राण्यांना पूर्वसूचना कशी मिळते ? जे प्राण्यांना समजते, ते विज्ञान आणि मनुष्य यांना का कळत नाही ? नॉस्ट्रेडॅमस जवळ असे काय होते की, त्याने फार पुढचे पाहून भविष्य लिहून ठेवले. याचे उत्तर केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. साधनेने आपणही आपले सहावे इंद्रिय जागृत करू शकतो. विज्ञानाशी तुलना होत नाही; म्हणून अध्यात्माला नाकारणे अयोग्य आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, पूर्वी अध्यात्म होते; परंतु विज्ञान नव्हते. सध्या अध्यात्माला विज्ञानाच्या कसोटीवर सर्वांसमोर ठेवण्याची आवश्यकता आहे.