आस्थागुरु या लिलाव करणार्या संस्थेकडून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर
भगवान शिवाचे विवस्त्र आणि अश्लाघ्य चित्र रेखाटून घोर अवमान !
- हिंदूंनो, ‘आस्थागुरु’ असे आध्यात्मिक नाव धारण करून हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या संस्थांपासून सावध रहा !
- म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढून ती विक्रीसाठी ठेवली होती, तसेच कोट्यवधी भारतियांचे श्रद्धास्थान असलेल्या भारतमातेचे नग्न चित्र विकून आणि २६/११ च्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘भारतमातेचा बलात्कार’ (रेप ऑफ इंडिया) नावाचे चित्र रेखाटून भारतमातेचा अवमान केला होता. या विरोधात देशभरात लाखो नागरिकांनी प्रखर जनआंदोलन करून १ सहस्र २५० हून अधिक पोलीस तक्रारी आणि अनेक खटले न्यायालयात प्रविष्ट केले होते. त्यामुळे कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी हुसेन भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान करून कतार या इस्लामिक देशात पळून गेले आणि भारतीय नागरिकत्व सोडून, कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते. ते शेवटपर्यंत भारतात येऊ शकले नाहीत !
- हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणारी चित्रे लाखो रुपये देऊन तुम्ही खरेदी करणार का? अशा चित्रांच्या खरेदीवर बहिष्कारच घालायला हवा आणि अशा चित्रांचा लिलावाचा वैध मार्गाने निषेध नोंदवायला हवा !
मुंबई, : ‘आस्थागुरु’ या लिलाव करणार्या प्रसिद्ध संस्थेकडून आंतरराष्ट्रीय चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा ‘ऑनलाईन’ लिलाव करण्यात आला. या चित्रांमध्ये हुसेन यांनी श्री गणेशाचे विकृत पद्धतीने रेखाटलेले चित्र, तसेच भगवान शिवाचे विवस्त्र चित्र यांचा समावेश आहे.
ऐन गणेशोत्सवात अशा पद्धतीने श्री गणेश आणि भगवान शिव यांची अवमानकारक चित्रे ‘आस्थागुरु’ या आस्थापनाद्वारे लिलावात ठेवण्यात आल्यामुळे हिंदु धर्मप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. २९ आणि ३० ऑगस्ट असे २ दिवस ‘ऑनलाईन’ पद्धतीने हा लिलाव करण्यात आला. (हिंदूंच्या श्रद्धेची अवहेलना करण्यात आलेली अशी चित्रे लिलावात ठेवून ‘आस्थागुरु’ने एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमानच केला आहे. अशा पद्धतीची अन्य धर्मियांची धार्मिक भावना दुखावणारी चित्रे लिलावासाठी ठेवण्याचे धाडस ‘आस्थागुरु’ने दाखवले असते का ? हिंदु सहिष्णु असल्यामुळेच ‘मॉडर्न आर्ट’च्या नावाखाली हिंदूंच्या देवतांना नग्न, हिडीस पद्धतीने दाखवणारे अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांना असे दाखवण्याचे धारिष्ट्य करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
यातील श्री गणेशाच्या चित्राला ‘ओम श्री गणेश नमन’, असे नाव देण्यात आले आहे. या चित्रात श्री गणेशाच्या समोर सरस्वती वीणावादन करत असल्याचे दाखवण्यात आले असून श्री गणेशाला बिथरलेले आणि भयभीत झालेले दाखवले आहे. ‘शंकरा’ नावाच्या चित्रामध्ये भगवान शिवाचे अत्यंत अयोग्य पद्धतीने बसलेले अश्लाघ्य चित्र आहे आणि त्याच्या बाजूला उभा नाग त्याच्याकडे पहात असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये भगवान शिवाला विवस्त्र दाखवण्यात आले आहे. तसेच भगवान शिवाचे मुख एखाद्या प्राण्याप्रमाणे दाखवण्यात आले आहे. यामध्ये श्री गणेशाच्या चित्राचे मूल्य ७५ ते ८८ लाख रुपये इतके आहे, तर भगवान शिवाच्या चित्राचे मूल्य ७० ते ८० लाख रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
जागरूक धर्मप्रेमींकडून ‘आस्थागुरु’ संस्थेकडे निषेध
हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. प्रकाश सावंत, श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी दूरभाष करून या प्रकरणी आयोजकांकडे वैध मार्गाने निषेध नोंदवला. पनवेल येथील श्री. गिरीश ढवळीकर यांनी ‘आस्थागुरु’ संस्थेला ‘ई-मेल’ करून लिलावाचा निषेध केला. (असे जागृत हिंदूच हिंदु धर्माची शक्ती आहे. समस्त हिंदूंनी आता आपल्या श्रद्धास्थानांच्या अवमानाविषयी जागरूकता दाखवून वैध मार्गाने लढा देण्यासाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
हिंदूंनी आता आणखी किती सहन करावे ? – प्रभाकर भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी, मुंबई.
म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अवमानकारक चित्रे काढली. आता ‘आस्थागुरु’ संस्था म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांच्या रेखाटलेल्या अवमानकारक चित्रांचा लिलाव करत आहे. हिंदूंनी आता आणखी किती सहन करावे ? समस्त हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने याला विरोध करावा.
अधिवक्त्या पूनम जाधव यांची आयोजकांना कायदेशीर नोटीस
हिंदूंच्या देवतांची विकृत आणि अश्लील चित्रे लिलावासाठी ठेवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी घाटकोपर येथील धर्मप्रेमी अधिवक्त्या पूनम जाधव यांनी या ‘ऑनलाईन’ लिलावाचे आयोजन करणार्या ‘आस्थागुरु’ या संस्थेला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवली आहे. (हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान करणार्या ‘आस्थागुरु’ संस्थेच्या विरोधात कायदेशीर लढा देणार्या अधिवक्त्या पूनम जाधव यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
हिंदुद्वेष्टे म.फि. हुसेन या विकृत मनोवृत्तीच्या चित्रकाराने रेखाटलेली श्री गणेश, भगवान शिव आणि अन्य देवतांची अवमानकारक चित्रे ऐन गणेशोत्सवात लिलावासाठी ठेवून ‘आस्थागुरु’ या संस्थेने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर केला आहे. धार्मिक भावना दुखावणार्या अशा प्रकारच्या चित्रांमुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ही अश्लाघ्य चित्रे जप्त करावीत आणि आयोजकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी ३० ऑगस्ट या दिवशी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. याविषयी त्यांनी ‘ऑनलाईन’ तक्रार केली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आस्थागुरु’ आस्थापनाला ३० एप्रिल या दिवशी ‘ई-मेल’द्वारे पत्र पाठवून ‘हिंदुद्वेष्ट्ये चित्रकार म.फी. हुसेन यांच्या चित्रांचा ‘ऑनलाईन’ लिलाव त्वरित थांबवावा’, अशी मागणी करण्यात आली.
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी चित्रे लिलावातून त्वरित हटवण्याची धर्मप्रेमींची मागणी !
‘आस्थागुरु’ आस्थापनाच्या या हिंदुद्रोही कृत्याविषयी धर्मप्रेमी (०२२) २२०४८१३८/३९/४० या क्रमांकावर दूरभाष करून निषेध व्यक्त करत आहेत.
संयत मार्गाने निषेध करा !
निषेधामागचा मुख्य उद्देश वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कुणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्याला चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा दृष्टीकोन निषेधामागे हवा !
वाचकांना निवेदन : ही छायाचित्रे कुणाच्या धर्मिक भावना दुखावण्यासाठी प्रसिद्ध केलेली नाहीत, तर श्री गणेश आणि शिव यांचे कशाप्रकारे विडंबन केले आहे, हे समजण्यासाठी प्रसिद्ध करत आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात