|
|
थिरुवनंतपूरम् (केरळ) – कोरोनामुळे मंदिरांच्या उत्पन्नामध्ये खंड पडला असल्याने शबरीमला मंदिराचे सोने रिझर्व्ह बँकेकडे गहाण ठेवून त्यावर व्याज घेऊन त्याद्वारे मंदिराचा नियमित खर्च भागवण्याचा निर्णय त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने घेतला आहे. त्यानुसार आता बोर्डाने त्याच्या अंतर्गत येणार्या १ सहस्र २५० मंदिरांत असलेल्या सोन्याची माहिती घेऊन त्याच्या मूल्याचे आकलन करण्यास प्रारंभ केला आहे.
बोर्डाचा १ सहस्र किलो सोने गहाण ठेवण्याचा विचार आहे. यापूर्वी तिरुपती मंदिर समिती आणि शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थान यांनीही अशा प्रकारे सोने गहाण ठेवले होते. यातून मिळणार्या पैशांवर कर लागत नाही.
Faced with financial crunch, Sabarimala & 1,200 Kerala temples plan to monetise gold
ThePrint's @Rohini_Swamy reportshttps://t.co/DGW5poy0am
— ThePrintIndia (@ThePrintIndia) August 28, 2020
बोर्डाचे अध्यक्ष एन्. वासू यांनी सांगितले की,
१. रिझर्व्ह बँकेच्या ‘गोल्ड मॉनिटायजेशन’ या योजनेंतर्गत सोने गहाण ठेवण्याचा विचार केला जात आहे. १ सहस्र किलो सोन्याहून अधिक सोने गहाण ठेवले जाण्याची शक्यता आहे. यावर आम्हाला २.५ टक्के व्याज मिळेल, ज्यामुळे वर्षाला १० कोटी रुपये मिळतील; मात्र हे पैसे आमचा खर्च भागवण्यास पुरेसे ठरणार नाहीत.
२. आमच्या मंदिरांमध्ये ५ सहस्र नियमित कर्मचारी आहे. त्यांना वेतन देणे, तसेच ४ सहस्र निवृत्त कर्मचारी आहेत, त्यांना निवृत्तीवेतन द्यावे लागते. यासाठी प्रत्येक मासाला ४० कोटी रुपये खर्च होतात. पूजाविधींसाठी १० कोटी रुपये खर्च होतात. आम्हाला कोरोनामुळे आतापर्यंत ३०० कोटी रुपयांची हानी झाली आहे.
३. बोर्डाच्या अंतर्गत येणार्या मंदिरांपैकी शबरीमला मंदिराचे वार्षिक उत्पन्न ३५० कोटी रुपये इतके सर्वाधिक आहे; मात्र कोरोनामुळे हे उत्पन्न बंद आहे. सरकारने आम्हाला १०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्यांपैकी ५० कोटी रुपये मिळाले आहेत.
४. सोने गहाण ठेवण्याची अनुमती देण्यासाठी आम्ही केरळ उच्च न्यायालयात जाणार आहोत. या प्रक्रियेला २-३ मास लागू शकतात.
५. मूर्तींवर चढवण्यात येणारे दागिने आणि प्राचीन दागिने गहाण ठेवण्यात येणार नाही. केवळ भक्तांकडून अर्पण केलेले सोनेच गहाण ठेवले जाणार आहे, असेही वासू यांनी स्पष्ट केले.