हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन
पुणे : मूर्तीदान (गणेशमूर्ती संकलन) उपक्रम त्वरित थांबवावा आणि दान घेतलेल्या गणेशमूर्तींची विक्री करण्याची अशासकीय संस्थांना अनुमती देणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, यांविषयी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ सप्टेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
१. पुणे महानगरपालिकेने राबवलेला मूर्तीदान (गणेशमूर्ती संकलन) उपक्रम म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचाच प्रकार असल्याचे उघड झाले असून या संदर्भात ३१ ऑगस्ट या दिवशी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन समितीने तिची भूमिका जाहीर केली आहे.
२. पुण्यातील विमाननगर भागातील ‘स्प्लेंडिड व्हिजन’ या नोंदणीकृत नसणार्या सामाजिक संस्थेने महापालिकेला पत्र पाठवून दान केलेल्या मूर्ती संकलित करण्याची आणि पुढील वर्षी विक्री करण्याची अनुमती मागितली होती. या पत्रानुसार महापालिकेचे सहआयुक्त राजेश बनकर यांनी ‘स्प्लेंडिड व्हिजन’ला अनुमती दिल्याचे पत्रही दिले असून या संस्थेकडे २० सहस्र मूर्ती असल्याचे समजत आहे.
३. या आधीही महापालिका प्रशासनाने कृत्रिम हौद, ‘अमोनियम बायकार्बो’नेट यांसारखे अशास्त्रीय उपक्रम राबवले होते. यंदाच्या वर्षी ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन फिरता रथ’ अर्थात ‘फिरता कृत्रिम हौद’ यासाठी सजावट करून कचराकुंड्या वापरून गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांना ठेच पोचवली आहेच.
४. पालिका प्रशासनाकडून मूर्ती खाणीत टाकणे, मूर्तींवर ‘बुलडोझर’ फिरवणे, हौदातील मूर्ती पुन्हा नदीपात्रात टाकणे आदी प्रकार झाले आहेत. आता मूर्ती विकण्याचा प्रकार आम्ही कदापि सहन करणार नाही. या प्रकरणी पालिका प्रशासनाने नोंद घेतली नाही आणि गणेशभक्तांच्या भावना दुखावल्याने काही परिस्थिती उद्भवली, तर त्याला पालिका प्रशासन उत्तरदायी असेल, याची पालिकेने नोंद घ्यावी.
निवेदनात पुढील काही मागण्या करण्यात आल्या आहेत.
१. मूर्तीदान घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दान घेतलेल्या मूर्तींची विक्री करून हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्या प्रशासकीय अधिकार्यांचे निलंबन करण्यात यावे.
२. आतापर्यंत किती मूर्ती कोणत्या संस्थांनी संकलित केल्या आहेत ?, त्यांचे पुढे काय केले आहे ?, किती मूर्तींची विक्री केली आहे ? या सर्व गोष्टींचा लेखाजोखा पालिका प्रशासनाने पुणेकरांसमोर मांडावा.
३. हिंदूंच्या धार्मिक कृतींमध्ये ‘सेक्युलर’ प्रशासनाने ढवळाढवळ करू नये.