आजच्या घडीला सर्व राष्ट्रे आपल्या अणूशक्तीचा डंका करत आहेत. प्रचंड संहारक अस्त्रांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. कोणता देश सेनादलांसाठी आणि शस्त्रसज्जतेसाठी किती खर्च करतो, याविषयीही बरीच चर्चा केली जात आहे. असे असले, तरी प्रत्यक्ष युद्धात होणार्या हानीच्या कल्पनेनेही सर्वच राष्ट्रे धास्तावलेली आहेत. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धानंतर सर्वच देशांची प्रचंड हानी झाली, हे कुणी विसरलेले नाही. त्यामुळेच आता काही राष्ट्रे समंजस पावले उचलतांना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे ध्रुवीकरण चालू आहे. ती तिसर्या महायुद्धाची सिद्धता असली, तरी प्रत्येक देश स्वतःच्या देशातील हानी टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. एक पाऊल मागे येऊन राजनैतिक आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्यातून एकमेकांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत.
इस्लामी राष्ट्रांचे एक पाऊल मागे !
गेल्या ७२ वर्षांत एकमेकांविषयी शत्रुत्वाची भावना असलेले इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित होत आहेत. नुकतेच इस्रायलचे पहिले विमान संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवर उतरले. वास्तविक बाजूच्या सर्व इस्लामी राष्ट्रांच्या कुरघोड्यांना पुरून उरलेले राष्ट्र म्हणून इस्रायलचा परिचय आहे. ‘कितीही प्रयत्न केला, तरी इस्रायलची कोणतीही हानी करू शकणार नाही आणि इस्रायलने ठरवले, तर कडवा प्रतिकार करून तो आपल्या देशाची मोठी हानी करण्यास मागे-पुढे पहाणार नाही’, हे आता इस्लामी राष्ट्रांनीही जाणले आहे. संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलसमवेत संबंध प्रस्थापित करण्यासाठी विविध करार केले आहेत. सौदी अरेबियानेही त्याच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यास इस्रायलच्या विमानांना अनुमती दिली आहे. यासाठी इराण आणि अन्य देश यांनी थयथयाट केला असला, तरी सौदी अरेबियानेही ही चांगली भूमिका घेतली आहे. सौदी अरेबियाने अजून एक चांगले पाऊल उचलले आहे. ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ ही ५७ मुसलमान देशांची संघटना आहे. काश्मीर आणि कलम ३७० रहित केल्याच्या प्रश्नी चर्चा करण्यासाठी या संघटनेची बैठक बोलवावी, या मागणीसाठी पाककडून सौदी अरेबियावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात येत आहे. असे असले, तरी सौदी अरेबियाने या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात रस दाखवलेला नाही. उलट पाकचे विदेशमंत्री शाह महंमद कुरेशी यांनी ही मागणी ज्या शब्दांत केली, त्यावरून नाराज होऊन सौदी अरेबियाने पाकशी केलेल्या ६.२ बिलियन डॉलरचा करार (४५ सहस्र ४१२ कोटी ६४ लाख ४० सहस्र रुपयांचा करार) रहित केला. कच्चे तेल आणि गॅस यांचाही पुरवठा करण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबियाने पाकचा दबाव झुगारतांना उचललेल्या या पावलांमुळे ‘सौदी अरेबिया आणि अर्थात्च तो ज्या ५७ इस्लामी देशांचे नेतृत्व करत आहे, ते देश काश्मीर प्रश्नावर बोलू इच्छित नाहीत आणि भारताने कलम ३७० रहित केले आहे, त्यावर त्यांचा कोणताही आक्षेप नाही’, असे सहज म्हणता येते.
एकीकडे पाकिस्तानने काश्मीरचे सूत्र स्वतःसाठी प्रतिष्ठेचे बनवले आहे. अर्थात् त्यातून जिथे-तिथे काश्मीरचे सूत्र उपस्थित करून प्रतिष्ठा कमावण्याऐवजी सर्व स्तरांवर प्रतिष्ठा गमावण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे, हा वेगळा भाग ! पण पाकिस्तानचे मत म्हणजे सर्व इस्लामी राष्ट्रांचे मत नाही, हे सौदीने यातून दाखवून दिले आहे. या केवळ त्या २ देशांत घडलेल्या घटना नाहीत, तर आंतरराष्ट्रीय राजकारणातील ध्रुवीकरण यातून दिसून येते.
चीन आणि अन्य देशांत वितुष्ट !
इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामधील तणाव निवळण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. सौदी अरेबियाही त्यांच्याशी सहमत झाला आहे. अमेरिकेचा दक्षिण कोरियाला पाठिंबा आहे. भारतानेही यापूर्वी कोरियातील युद्धकाळात अमेरिकी सैन्याच्या साहाय्यासाठी आपले वैद्यकीय पथक पाठवले होते. त्यामुळेच या सर्व देशांचा सध्याचा कल पहाता येणार्या काळात युद्ध पेटलेच, तर हे देश भारताला पूरक भूमिका घेतील. जागतिक महासत्ता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने अत्यंत खालच्या स्तरावर गेलेल्या चीनचे सध्याचे धोरण पाहिले, तर त्याने सर्वांना दुखावण्याचा एककलमी कार्यक्रम गेल्या काही वर्षांत राबवला आहे. याच कालावधीतील भारताचे धोरण पाहिले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांना भेटी देऊन, तसेच त्यांच्या प्रतिनिधींचे भारतात विशेष आदरातिथ्य करून सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अनेक देशांनी भारतात गुंतवणूक करून येथे रोजगारच्या संधी आणि आर्थिक चलनवलन चालू करण्याच्या दृष्टीने करार केले आहेत. उलट चीनचे गेल्या काही मासांत उघड झालेले रूप पहाता अनेक देशांनी चीनमधील गुंतवणूक अन्य देशांत हालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यात वाक्युद्ध पेटले आहे आणि त्याचे लवकरच गंभीर परिणाम होणार आहेत. जपाननेही चीनला सोडून भारत किंवा बांगलादेश या देशांमध्ये गुंतवणूक करण्यास आरंभ केला आहे. लहान राष्ट्रेही चीनचा दबाव झुगारण्याचा प्रयत्न करत आहेत. हाँगकाँग आणि चीन यांच्यातील संघर्ष आता सर्वश्रूत झाला आहे. तैवाननेही चीनशी फारकत घेतली आहे. अशा प्रकारे आता सर्वांना उपरती येत असतांना पाक, नेपाळ आणि श्रीलंका हे अजूनही चीनच्याच वळचणीला थांबले आहेत. लवकरच त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. जी राष्ट्रे काळाची पावले ओळखून अनुकूल भूमिका घेतात, त्यांचे भविष्य उज्ज्वल असते. पाकिस्तान्यांना भविष्याची चिंता नाहीच; उलट ते त्यांचे वर्तमानही भारतद्वेषापोटी नासवत आहेत. चीनच्या जोरावर पाकने भारतीय सीमेवर कितीही कुरघोड्या केल्या तरी योग्य वेळ बघून भारत त्याचा समूळ नायनाट करणार आहेच. चीनलाही धडा शिकवणार आहे. भारताची सेनादले सक्षम आहेत. सध्या तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनपेक्षा भारताला सहानुभूती अधिक आहे. भारताचे उज्ज्वल भवितव्य आम्हाला खुणावत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणार्या या घडामोडी ही त्याची नांदी आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात