‘इंडिया टुडे’ वृत्तसमूहाचे मार्गदर्शक संपादक राजदीप सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांचे अधिवक्ता विकास सिंह यांना त्यांची सुशांतसिंह प्रकरणात भूमिका मांडण्यासाठी बोलावले होते. या वेळी सरदेसाई यांनी अधिवक्ता विकास सिंह यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ‘तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जाऊन मतप्रदर्शन करून या प्रकरणी ‘मिडिया ट्रायल’ कसे करू शकता ? याद्वारे तुम्ही उद्या निर्णय देणार्या न्यायाधिशांवर एकप्रकारे दबावच टाकत आहात. मागील काही आठवड्यांपासून सीबीआयकडे हे अन्वेषण देण्याची मागणी होत आहे; मात्र जणू रिया स्वत: आरोपी आहे, या दृष्टीने हे प्रकरण हाताळले जात आहे’, असे प्रश्न विचारले. अधिवक्ता विकास सिंह यांनी शांतपणे सरदेसाई यांची ही सर्व सूत्रे ऐकून घेतली आणि त्यांना सांगितले, ‘तुम्ही जर माध्यमांमध्ये येऊन मत व्यक्त करणे, याला ‘मिडिया ट्रायल’ समजत असाल, तर मला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही. मला त्याविषयी काही वाटणार नाही. तुमच्यासारखेच लोकच माझ्या मागे येऊन मत विचारतात’, असे सांगून विकास सिंह यांनी ‘इअर फोन’ आणि ‘माईक’ काढून ठेवला.
अधिवक्ता विकास सिंह यांना सरदेसाई यांनी ‘मला तसे म्हणायचे नाही, तुम्ही मत मांडा’, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; मात्र सिंह थांबले नाहीत. अधिवक्ता सिंह यांनी सरदेसाई यांना एकप्रकारे सणसणीत चपराकच लगावली. ‘इंडिया टुडे’ सारख्या मोठ्या माध्यम समूहाचे मार्गदर्शक संपादक असणारे सरदेसाई यांची बाष्कळ बडबड सुपरिचित आहे. ते आधी एन्.डी.टी.व्ही. वृत्तवाहिनीवर वृत्तनिवेदक होते. नंतर ‘न्यूज १८’ या वाहिनीवर पत्रकारिता केली. एन्.डी.टी.व्ही. वाहिनीचा तेव्हा भारतात दबदबा होता; मात्र नंतर ज्याला ‘बायस्ड’ (पक्षपाती) पत्रकारिता म्हणतात, तिचा आजार तिला झाला. यातील प्रणव रॉय आदी कंपू म्हणजे पुरोगामी विचारवंतांचाच प्रकार. जे देशाच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचे, त्यावर टीका करायची आणि ते अयोग्य म्हणून लोकांसमोर मांडायचे. मोदी शासनाशी तर त्यांचा ३६ चा आकडा. एकेकाळी दबदबा असणारी ही वाहिनी आता हिंदूंनी झिडकारल्यामुळे घराच्या एका कोनाड्यात पडलेल्या वस्तूप्रमाणे झाली आहे. येथे पत्रकारिता करतांनाच आणि नंतर ‘न्यूज १८’ची पत्रकारिता करतांना ‘पक्षपाती’ पत्रकारितेचाच सरदेसाई यांनी प्रत्यय दिला.
सरदेसाई यांचा पक्षपातीपणा
गुजरात येथे निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी उभे असतांना, याच सरदेसाई यांनी तेथे जाऊन मोदीविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गुजरात दंगलींचा आधार घेतला. नरेंद्र मोदी गुजरात येथील दंगलींसाठी कसे उत्तरदायी आहेत आणि मुसलमानांवर त्यांनी कसे (तथाकथित) अत्याचार केले आहेत, याच्या कहाण्या रंगवून रंगवून सांगून मोदींविरुद्ध घृणा उत्पन्न केली; मात्र लोकांनी मोदींनाच मते दिली.
अगदी काल-परवा झालेल्या नवी देहली येथील धर्मांधांनी घडवलेल्या भीषण दंगलीनंतर तेथे जाऊन वार्तांकन करण्यासाठी गेल्यावर भाजपचे नेते आणि माजी आमदार ‘कपिल मिश्रा यांच्यामुळेच दंगल घडली का ?’, असा प्रश्न सरदेसाई लोकांना विचारू लागले. लोकांनी सरळ ‘नाही’, असे उत्तर दिले, तरी महाशयांचा निष्कर्ष काढण्याचा प्रकार थांबेना. ‘पडलो तरी नाक वर’ याप्रमाणे सरदेसाई यांचे वागणे होते. लोकांनीच त्यांचा पाणउतारा केला. वर्ष २०१४ मधील गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमकीच्या प्रकरणाचे चुकीचे वार्तांकन करत तत्कालीन गृहमंत्री आणि पोलीस यांनाच आरोपी ठरवण्याचा निंदनीय प्रयत्न त्यांनी केला. नंतर एक पोलीस अधिकारी न्यायालयात गेल्यामुळे सरदेसाई यांना प्रतिज्ञापत्र लिहून ‘स्वत: खोट्या बातम्या देत अपकीर्ती करण्याची मोहीम चालवत होतो’, अशी स्वीकृती दिली. एखाद्या संपादकावर भारतात अशी वेळ येणे ही नामुष्कीच म्हणावी लागेल आणि ते बहुधा पहिलेच संपादक-पत्रकार असतील ज्यांना अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र द्यावे लागले. अविश्वासार्ह अथवा एकांगी पत्रकारितेचे अन्य दुसरे उदाहरण असू शकते का ?
‘फेक न्यूज’ म्हणजे खोट्या बातम्यांचे ढळढळीत उदाहरण म्हणजे सरदेसाई यांनी दिलेली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आजारपणात त्यांच्या निधनाची दिलेली बातमी ! १३ ऑगस्टला स्वत:च्या वैयक्तिक ‘ट्विटर हँडल’द्वारे त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याचे जाहीर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचे हे ‘ट्वीट’ काही वेळांमध्येच मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. प्रणव मुखर्जी यांच्या मुलाला यामुळे पुष्कळ मनस्ताप झाला आणि त्यांना ‘माझे वडील अद्याप जिवंत असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत’, असे सांगावे लागले. चुकीची बातमी देणे आणि नंतर क्षमापत्रे देणे म्हणजे सरदेसाई यांची पत्रकारिता आहे कि काय असे जणू वाटावे. मागील वर्षी भाजप खासदाराची एका चुकीच्या वार्तांकनासाठी त्यांनी क्षमा मागितली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते गुजरातमध्ये कार्यरत असतांना केलेल्या निराधार आरोपांची क्षमा मागणे तेवढे शेष राहिले आहे. सरदेसाaई ज्या माध्यमात पत्रकारिता करतात त्यांची प्रतिष्ठा अशा वार्तांकनामुळे धुळीला मिळवतात. ‘इंडिया टुडे’ हा तसा मोठा वृत्तसमूह आहे. ते तेथे कार्यरत असल्यामुळे सुशांतसिंह यांच्या अधिवक्त्यांकडून त्यांचा झालेला अपमान लोकांनी डोळ्यांनी पाहिला आणि सरदेसाई यांची ‘कशी जिरली’ याच्या ट्वीट त्यांना जाणणार्या पत्रकारांनी केला. एकूणच लोकांप्रमाणे पत्रकारांमध्येही त्यांची प्रतिमा नसल्यातच जमा आहे. निर्दोषाला दोषी आणि दोषीला निर्दोष ठरवण्यासाठी सरदेसाई यांनी केलेली पत्रकारिता ही पत्रकारिता कशी नसावी ? याचे उदाहरण आहे. त्यांच्या या अयोग्य कार्यशैलीमुळे ते ‘इंडिया टुडे’चेही पानिपत कधी करतील याचा नेम नाही. सागरिका घोष, बरखा दत्त, राणा अयुब्ब हा पत्रकारितेतील असा प्रतिष्ठित कंपू आहे की, ज्यांनी राष्ट्रीय भावना, हिंदुत्व यांना नेहमीच नावे ठेवली आहेत. कालौघातात त्यांचे खेळ उघड झाले आहेत आणि ते अडगळीत टाकलेल्या वस्तूंप्रमाणे झाले आहेत. ‘कालायै तस्मै नम:’ हेच खरे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात